Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

टेनिसच्या खेळात तंत्रज्ञानाची प्रमुख भूमिका

Read time: १ मिनिट
टेनिसच्या खेळात तंत्रज्ञानाची प्रमुख भूमिका

टेनिसच्या खेळात माहिती व प्रसारण तंत्रज्ञानावर भर असतो असे अभ्यासात दिसून आले आहे.

२०१९ मध्ये, सर्वात मोठी टेनिस स्पर्धा मानल्या गेलेल्या विंबल्डन स्पर्धांना वृत्तांनुसार पाच लाख लोकांनी हजेरी लावली होती, पण त्याचे विडिओ मात्र ३८ करोड दर्शकांनी ऑनलाईन पाहिले. घटनास्थळी रोबॉटिक कॅमेरा आणि आभासी मुलाखत कक्ष उभे केले गेले होते. हल्ली टेनिसच्या सामन्यामध्ये केवळ स्टेडिअम मधील लोक सहभागी आहेत असे होत नाही. खेळाडू, प्रशिक्षक, पंच, बॉल घेऊन येणारे, संयोजक आणि चाहत्यांच्या बरोबरीने तंत्रज्ञान सुध्दा एक घटक बनले आहे. शिवाय समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे, मैदानावरील प्रत्येक हालचाल जगभरातील लोकांकडून पाहिली जाते आणि त्याची चिकित्सा केली जाते.

विविध डिजिटल व्यासपीठे, सोशल मिडिया आणि आभासी विश्वात संवाद साधण्यासाठी असलेले तंत्रज्ञान, ज्यांना माहिती व प्रसारण तंत्रज्ञान (information and communication technology अथवा ICT) असे संबोधले जाते, ते सर्व आता टेनिस सारख्या खेळांचा अविभाज्य घटक बनले आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील डॉ. विद्या सुब्रमण्यन आणि इन्स्टिट्युट फॉर रिसर्च अँड इनोवेशन इन सोसायटी (IFRIS), फ्रांस येथील डॉ. मारिआन नोएल यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या गटाने नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की ICT हा खेळाचा केवळ एक निष्क्रिय भाग नसून त्याचा संबंधित लोकांच्या जीवनावर आणि त्याच्याशी निगडित असलेल्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो.

डॉ. सुब्रमण्यन सांगतात “आपल्या आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर आता तंत्रज्ञानाचा एक अदृश्य पटल असतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करणे, त्याचे स्वरूप समोर आणणे आणि त्याचा आपल्या वैयक्तिक व एकत्रित जीवनावर असलेला प्रभाव समजून घेणे हे गरजेचे झाले आहे.”

टेनिसच्या सामन्यांच्या वेळी फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मिडियावर सामने, स्पर्धा, कार्यक्रम आणि खेळाडूंबद्दल चर्चा नेहमी रंगतात. सदर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना तसाच कल व्हॉट्सॲप वरील ग्रूप वर सामन्यांबद्दल चर्चा करणाऱ्या भारतातील क्रिडाप्रेमींमध्ये सुद्धा दिसून आला. या माध्यमांचे असंख्य वापरकर्ते असतात म्हणून त्यांवर आपल्या उत्पादन किंवा सेवांची जाहिरात करून त्याचा फायदा अनेक उद्योग-व्यवसाय उठवतात. ह्या जाहिरातदारांमार्फत जमणाऱ्या निधीचा वापर संबंधित संरचना, कार्यक्रम किंवा खेळाडूंना प्रायोजित करण्यासाठी होऊ शकतो. टेनिस केवळ एक मनोरंजन किंवा खेळ नसून तंत्रज्ञानाच्या आधारे चालणारी एक जिवंत अर्थव्यवस्था आहे.

संशोधकांनी, २०१७ च्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धांच्या वेळी रोलान गारोस स्टेडियमला भेट देऊन तंत्रज्ञानाच्या मोठ्या स्पर्धांवर पडणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला. त्यांच्या या भेटीमध्ये त्यांना असे दिसून आले की प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञान सक्रिय आहे - अगदी ऑनलाइन तिकिट विक्रीपासून ते दर्शकांचा मागोवा घेता यावा यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या मनगटावरील रेडिओ वारंवारिता-युक्त (RFID) ओळख पट्ट्या किंवा खेळाच्या पद्धतीपर्यंत.

आपला खेळ सुधारावा यासाठी खेळाडू सुधारित रॅकेट व बुटांवर अवलंबून असतात, शिवाय सरावादरम्यान फिजियोथेरपीचा वापर करतात. सामन्यादरम्यान चेंडूच्या मार्गावर नजर ठेवण्याकरिता ‘हॉक-आय’ नावाचे मार्गनिरिक्षण करणारे तंत्रज्ञान वापरले जाते, ज्यामुळे पंच म्हणून काम करताना होऊ शकणाऱ्या ढोबळ चुका टळतात. परंतु, तंत्रज्ञान देखील पूर्णतः दोषरहित नसते आणि त्याबद्दल देखील काही वादविवाद होत असतात.

फ्रेंच ओपन स्पर्धेला दिलेल्या भेटीत संशोधकांना जाणवले की त्यांचा तेथील प्रत्येक अनुभव हा तंत्रज्ञानाशी जोडलेला होता आणि चहूबाजूंना, सामने, गुणसंख्या आणि पुढील सामन्यांची माहिती दाखवणारे अनेक मोठे पडदे होते. अनेक जागा जाहिरातींनी व्यापलेल्या होत्या, अगदी पंचांची खुर्ची सुद्धा. येणाऱ्या टेनिसप्रेमींवर अधिक प्रभाव पाडण्यासाठी स्थानिक खेळाडूंवर चित्रित केलेल्या जाहिराती झळकत होत्या.

संयोजकांनी येणाऱ्यांची भेट अधिक आरामदायी होण्यास खास ॲप दिलेले होते आणि भेट देणाऱ्यांना त्यांचे फोन चार्ज करायला सौर ऊर्जेवर आधारित चार्जिंग स्टेशन सुद्धा उपलब्ध होते. विविध कंपन्यांतर्फे प्रायोजित केलेले आभासी विश्व (virtual reality world) घटनास्थळी उभे केलेले होते. तिथे येणारे लोक प्रश्नमंजुषेत भाग घेऊ शकत होते, सेल्फी काढून अपलोड करू शकत होते किंवा आभासी अवतारात होलोटेनिसचा वापर करून टेनिस खेळू शकत होते.

संशोधकांच्या गटाने विविध समाज माध्यमे न्याहाळली आणि पाहिले की आघाडीचे बरेचसे टेनिसपटू, संयोजक व चाहत्यांच्या संपर्कात रहायला ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या समाज माध्यमांचा वापर करतात. २०१६ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेदरम्यान टेनिसपटू त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून ट्विट्सद्वारे स्वतः प्रतिनिधित्व करत असलेल्या ब्रँड्सचा प्रचार करत होते.

“खेळाडू त्यांची मते व पडद्यामागील माहिती देतात आणि एरवी वृत्तांपर्यंत न पोहचणारी छायाचित्रे शेअर करतात. अनेक खेळाडूंच्या सोशल मिडियावरील फीडच्या बातम्या बनून जातात.”, ट्विटरचा वापर खेळाडू कसा करतात याबाबत सांगताना डॉ. सुब्रमण्यन म्हणतात.

आता खेळाडू आणि चाहत्यांमध्ये केवळ काही क्लिकचे अंतर असते. त्यामुळे खेळाडूंचे सार्वजनिक आयुष्य आणि खाजगी आयुष्य ह्यातील सीमारेषा धूसर झालेली आहे. काही वेळा सामन्याच्या परिणामामुळे समाज माध्यमांमधून खेळाडूंवर अत्यंत नकारात्मक आणि वैयक्तिक टीका केली गेल्याने, खेळाडूंना मानसिक आघात आणि नैराश्याला सामोरे जावे लागले आहे आणि त्यातून पुढे त्यांनी खेळ सोडून दिला असेही झाले आहे.

सदर अभ्यासातून असा निष्कर्ष निघतो की तंत्रज्ञान खरोखर क्रिडेस चालना देते आणि अगदी खेळाडू सुद्धा क्रिडा अर्थचक्राच्या अनेक भागांपैकी निव्वळ एक भाग आहेत. डॉ. सुब्रमण्यन म्हणतात “कुठल्याही खेळात तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप हलगर्जीपणाने न होता समजून-उमजून आणि विचारपूर्वक केला गेला तर ते खेळाडू आणि प्रेक्षक दोघांच्या हिताचे ठरेल.”

या शिवाय तंत्रज्ञानाचा क्रिडा स्पर्धा आयोजनातील बाबींवर आणि खेळाचे व स्पर्धेचे नियम बनविणाऱ्या संघटनांवर काय प्रभाव आहे हे पाहण्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे असे संशोधकांचे मत आहे.

डॉ. सुब्रमण्यन शेवटी म्हणतात, “भारतात सर्वच खेळांच्या, विषेशतः क्रिकेटच्या, प्रशासकिय आणि अंतर्गत कामकाजाचा अभ्यास करण्यास भरपूर वाव आहे. क्रिडाक्षेत्रात जसजशी तंत्रज्ञानाची भूमिका वाढत जाईल आणि माहिती सामुग्रीची वाढ होईल, तसतसे क्रिडा धोरण आणि क्रिडा प्रशासनाने खेळात तंत्रज्ञान कसे अंतर्भूत होत आहे याकडे अधिक जगरुकतेने लक्ष दिले पाहिजे”.