Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

पक्ष्यांना शहरांपेक्षा शांत ग्रामीण परिसर अधिक आवडतो का?

Read time: १ मिनिट
पक्ष्यांना शहरांपेक्षा शांत ग्रामीण परिसर अधिक आवडतो का?

जगभरातील संशोधक शहरीकरणामुळे जैवविविधतेवर होणार्‍या दुष्प्रभावाबाबत लेख लिहित असतानाच असे लक्षात आले आहे की या शहरीकरणाच्या विळख्यातून पक्षी देखील सुटलेले नाहीत. अलीकडे, केटीएच रॉयल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी स्वीडन, बॉम्बे नॅच्युरल हिस्टरी सोसायटी मुंबई, आर्हस विद्यापीठ डेन्मार्क, आयसीपीओ "बायोलॉजिस्ट्स फॉर नेचर कंसर्वेशन" रशिया, आणि यूनिवर्सिटी ऑफ वॉशिंग्टन यूएसए येथील संशोधकांनी पक्ष्यांच्या विविधतेवर शहरीकरणाच्या परिणामाचा अभ्यास केला. हा अभ्यास “जर्नल ऑफ ट्रॉपिकल इकोलॉजी” मासिकात प्रकाशित झाला आहे.

संशोधकांनी महाराष्ट्रातील अमरावती शहरात आणि आसपासच्या परिसरातील, ग्रामीण जंगल, शहरी वस्ती, अशा विविध प्रकारच्या ५ क्षेत्रात पक्ष्यांच्या विविधतेचे मूल्यांकन केले. २०१० पासून २०१३ सालापर्यन्त दर वर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात त्यांनी हा अभ्यास  केला.

संशोधकांना अभ्यास क्षेत्रात ८९ जातिंचे ११२,८२९ पक्षी आढळले. सर्वाधिक विविधता ग्रामीण जंगल क्षेत्रात आढळून आली. तिथे ७३ जाति आढळून आल्या; मात्र अमरावती शहराच्या मध्यभागी मात्र फक्त २९ जाति दिसल्या. अभ्यास क्षेत्रातल्या पक्ष्यांच्या जातिंबाबत बोलताना संशोधक म्हणाले, "शहरीकरण अधिक असलेल्या भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत पक्ष्यांच्या छोट्या आकाराच्या जाति, फलाहारी व सर्वभक्षी असलेल्या जाति अधिक तर कीटकभक्षी जाति कमी  आढळल्या."

त्याच क्षेत्रात आणि अवधीत केलेल्या अशाच एका अभ्यासात पक्ष्यांच्या विविध वसाहती मधील स्थलीय नात्याचे निरीक्षण केले गेले. संशोधकांना त्यात केवळ जंगल क्षेत्रात आढळणार्‍या पक्ष्यांच्या २० जाति दिसल्या पण केवळ निम-शहरी आणि शहरी भागात आढळणार्‍या जाति दिसल्या नाहीत. अभ्यासाच्या पहिल्या वर्षात संशोधकांना असे पण आढळले की विकसित होणार्‍या औद्योगिक क्षेत्रात आणि वन क्षेत्रात पक्ष्यांची विविधता जवळजवळ सारखीच असते. मात्र नंतरच्या काही वर्षातच औद्योगिक क्षेत्रातील पक्ष्यांची विविधता लक्षणीय प्रमाणात कमी झालेली दिसते.  कबूतर व पोपट यांसारख्या काही पक्ष्यांनी वाढत्या शहरी भागात घरटी बनवून अन्न मिळण्याच्या संधींचा फायदा घेतल्याने त्यांची संख्या वेगाने वाढलेली दिसून आली.

शहरीकरणाचा पक्ष्यांच्या संख्येवर कसा दुष्परिणाम होतो व काही जाति कायमच्या कश्या नष्ट होतात यावर वरील दोन अभ्यासांनी प्रकाश टाकला आहे. मात्र इतर अशाच अभ्यासात आढळणारी सकारात्मक गोष्ट म्हणजे अजूनही शहरांमध्ये जैवविविधतेचे प्रमाण चांगले आहे. ज्या क्षेत्रात अनेक पक्षी आढळतात तिथला अभ्यास करून इतर शहरात पण तसेच घटक निर्माण केल्यास आपल्या आसपासच्या पक्ष्यांची संख्या नक्कीच वाढेल.

सारांश: एका अभ्यासात, केटीएच रॉयल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी स्वीडन, बॉम्बे नॅच्युरल हिस्टरी सोसायटी मुंबई, आर्हस विद्यापीठ डेन्मार्क, आयसीपीओ "बायोलॉजिस्ट्स फॉर नेचर कंसर्वेशन" रशिया, आणि यूनिवर्सिटी ऑफ वॉशिंग्टन यूएसए येथील संशोधकांनी शहरीकरणाचा पक्ष्यांच्या विविधतेवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.