Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे प्राध्यापक चंद्र एम. आर. वोला यांनी उत्प्रेरकांवरील त्यांच्या कामासाठी नासी तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर

Read time: १ मिनिट
आरेदथ सिद्धार्थ, नंदिनी भोसले, हसन कुमार गुंडू, कम्युनिकेशन डिझाईन , आयडीसी, आयआयटी मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक असलेल्या चंद्र एम. आर. वोला यांनी रासायनिक विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या संशोधयासाठी नासी तरुण वैज्ञानिक पुरस्कार २०१८ जाहीर करण्यात आला आहे. उत्प्रेरकाशी संबंधित असलेल्या त्यांच्या या कार्यबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. एखादी रासायनिक अभिक्रिया जलद होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात.

भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स इंडिया, एनएएसआय, नासी) तर्फे दिल्या  जाणाऱ्या नासी तरुण वैज्ञानिक पुरस्काराद्वारे भारतातील तरुण शास्त्रज्ञांमधील कल्पकता आणि उत्कृष्टता यांचा गौरव केला जातो. या वार्षिक पुरस्कारात एक अवतरण, एक पदक आणि रु. २५,००० रोख पारितोषिक दिले जाते. २००६ पासून, भारतातील १४३ संशोधकांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे.

प्रा. वोला आणि त्यांच्या गटाने तांब्याचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करून क्विनोलिन साधित पदार्थांचे संश्लेषण करण्यासाठी नव्या आणि अत्यंत कार्यक्षम अभिक्रिया विकसित केल्या आहेत. क्विनोलिन हा बऱ्याच औषधांच्या उत्पादनासाठी लागणारा एक आवश्यक घटक आहे. त्याचप्रमाणे, या गटाने औषधनिर्मिती क्षेत्रात विषाणू प्रतिबंधक आणि शोथविरोधी गुणधर्मांसाठी उपयोगी असलेल्या बेंजोक्साझिनोन्स आणि ऑक्साडियाझोलच्या संश्लेषणासाठी उत्प्रेरक म्हणून ऱ्होडियम (II) वापरून सोयीस्कर आणि सोपी पद्धत विकसित केली. रासायनिक प्रक्रियेदरम्यान घातक टाकावू पदार्थांचे उत्पादन कमी करण्यात या नवीन पद्धतींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे ज्यायोगे हिरव्या रसायनशास्त्रासाठी प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत.

प्रो. वोला म्हणतात, "भिन्नाणुवलयी साधित संयुगांच्या (हेट्रोसायक्लीक डेरिव्हेटिव्ह्जच्या) संश्लेषणासाठी नवीन पद्धती विकसित करणे आमच्या कामाचा केंद्रबिंदू आहे". कार्बन आणि हायड्रोजन बरोबर इतरही मूलद्रव्याचे अणू यापासून भिन्नाणुवलयी साधित संयुगांचे वलयाकृती रेणू बनलेले असतात. ही संयुगे औषध रसायनशास्त्रात वापरली जातात. त्याच्या संशोधन व्याप्ती बद्दल बोलताना ते सांगतात "रासायनिक प्रतिमनाची मूलभूत अभिक्रियशीलता जाणून घेण्यासाठी या पद्धती पूर्णपणे शैक्षणिक रूपात विकसित करण्यात आल्या आहेत ".

नासी समितीचे आभार मानताना प्रा. वोला हे यश त्यांच्या गटाला देतात. "मी ऑक्टोबर २०१४ मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईमध्ये येथे रुजू झालो, आणि त्यानंतरचा हा प्रवास उत्कृष्ट होता. याचे श्रेय माझ्या गटाला जाते. हा पुरस्कार माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांचा आहे असे मी मानतो." असे ते व्यक्त करतात.

प्रा. वोलांचे सध्याचे संशोधन केवळ शैक्षणिक आहे, त्याचे मूर्त उपयोजन सध्या नाही, तरी पुढच्या काही वर्षांत त्या दिशेने काम करण्याचा त्यांचा विचार आहे. "उत्प्रेरण हा आमच्या प्रयोगशाळेतील कामाचा  मूलभूत विषय आहे. तथापि, काही सहयोगी गटासोबत काम करून आम्ही अनुप्रयोग-केंद्रित संशोधन करू इच्छितो ज्यात उत्प्रेरकांचा वापर दीर्घ काळापर्यंत निराकरण न झालेल्या समस्या सोडवण्यासाठी होऊ शकेल". असे भविष्यातील वाटचालीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले.

रासायनिक अभिक्रियांचे इष्टतमीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे उपयोजन-केंद्रित संशोधन उपयोगी होऊ शकते. रासायनिक अभिक्रियांच्या पायऱ्या कमी करण्याच्या पद्धती विकसित करण्याची गरज इथे आहे.

"अभिक्रियेतल्या खूप पायऱ्या संयुगे टिकवून ठेवत नाहीत आणि टाकाऊ पदार्थ देखील तयार करतात, त्यामुळे प्रत्येक पायरीला उत्पन्न घटक शुद्ध करावे लागतात शिवाय टाकाऊ पदार्थांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. पायऱ्या कश्या कमी करता येतील या दृष्टीने मला प्रयत्न करायचे आहे कारण याचे उद्योगिक आणि शैक्षणिक, असे दोन्ही क्षेत्रात फायदे आहेत.”  असे प्रा.वोला यांनी सांगतले.