Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

भारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतोय का?

Read time: एक मिनट
भारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतोय का?

भारतातल्या तरुण महिला करत असलेल्या नोकऱ्या अथवा व्यवसाय त्यांच्या मातांपेक्षा चांगल्या नाहीत असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असे आपण अभिमानाने म्हणू शकतो. गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जी डी पी) दर ६ ते ७ टक्के इतका झाला आहे. भारतीय महिलांना कामाच्या बाबतीत पुरुषांच्या बरोबरीची वागणूक दिली गेली, तर हा दर २७ टक्क्यांपर्यंत म्हणजेच तिपटीपेक्षा जास्त वाढू शकतो असा अंदाज आहे. आज फक्त २६.९७ टक्के भारतीय महिला नोकरी-व्यवसाय करत आहेत, आणि देशातील लैंगिक असमानतेचे प्रमाण इतके अधिक आहे की संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) २०१८ च्या लैंगिक असमानता सूचकांकानुसार, भारत खूप पिछाडीवर असून, १८९ देशांमध्ये त्याचा १२७ वा क्रमांक आहे. नोकरीच्या क्षेत्रात तरुण महिला ह्या त्यांच्या मातांपेक्षा सरस ठरतात का? शैलेश जे. मेहता प्रबंधन विद्यालय (स्कूल ऑफ मॅनेजमेंट), भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात, काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ सोशल इकॉनॉमिक्स  या कालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी, ‘आंतरपिढीय व्यावसायिक गतिशीलता’ ह्या विषयावर प्रकाश टाकला आहे. भारतीय तरुण महिला करत असलेले नोकरी-व्यवसाय त्यांच्या माता करत असलेल्या नोकरी-व्यवसायांच्या तुलनेत कसे बदलले आहेत याचा अभ्यास त्यांनी केला. या अभ्यासात असे आढळून आले आहे की ७१.२ टक्के भारतीय महिलांना त्यांच्या मातांपेक्षा अन्य क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या आहेत. मात्र त्यातील अप्रिय बाब अशी आहे की आजच्या महिला त्यांच्या मातांपेक्षा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या निम्न स्वरूपाचे नोकरी व्यवसाय करत आहेत, असे या अभ्यासाचे प्रमुख संशोधक तसेच, शैलेश जे. मेहता प्रबंधन विद्यालयाचे प्राध्यापक आशिष सिंग सांगतात.

संशोधकांनी आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, मुंबई आणि लोकसंख्या परिषद, नवी दिल्ली संचलित “भारतीय युवा - परिस्थिती आणि गरजा” ह्या उपक्रमाच्या २००६ आणि २००७ च्या सर्वेक्षणातील माहितीचा वापर केला. सर्वेक्षणात १५ ते २४ वर्ष वयोगटातील, विवाहित-अविवाहित, तरुण स्त्रीपुरुष तसेच ग्रामीण-शहरी भागातील बिहार, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड आणि पूर्वीच्या आंध्रप्रदेश येथील एकूण ५०८४८ लोकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.

ह्या अभ्यासाच्या निष्कर्षावरून असे लक्षात आले आहे की सुमारे ३९% माता आणि ६४% मुली नोकरी व्यवसाय करत नाहीत. ही टक्केवारी ग्रामीण भागा पेक्षा शहरी भागात जास्त आहे. संशोधकांच्या मते ह्या मागे दोन कारणे असू  शकतात - एक म्हणजे शहरातील पती त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देत असल्याने ते महिलांना बाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करण्यापासून परावृत्त करतात आणि दुसरे म्हणजे शहरातील बऱ्याच मुली उच्च शिक्षण घेत असल्याने नोकरी करत नाहीत. तसेच नोकरी व्यवसाय न करणाऱ्या मातांच्या पोटी जन्मलेल्या साधारण ८० टक्के मुली नोकरी व्यवसाय करत नाहीत.

बऱ्याचश्या माता शेतकरी किंवा शेत मजूर म्हणून काम करत होत्या, त्यांपैकी ७० टक्के महिलांच्या मुली गृहिणी असल्याचे दिसून आले. “ह्या बदलामुळे महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभागावर विपरीत परिणाम झाला परंतु त्यामुळे व्यवसायातील सर्वसामान्य गतिशीलतेचा दर वाढला आहे.” असे लेखक म्हणतात. अजून एक वैशिष्ठ्य पूर्ण बाब अशी की प्रशासकीय अथवा व्यवस्थापकीय सेवेत असलेल्या मातांपैकी ९२ टक्के मातांच्या मुली त्यांच्यापेक्षा निम्नस्तरावर काम करतांना दिसून येतात, यावरून व्यावसायिक अधोगामी गतिशीलता दिसून येते.

“भारतीय महिलांची शैक्षणिक अधोगती त्यांच्या नोकरी व्यवसायातील अधोगामी गतिशीलतेशी निगडित आहे. बऱ्याच भारतीय महिलांनी आपल्या सुशिक्षित मातांना गृहिणी बनताना पाहिले आहे, त्यामुळे आपण कितीही शिकलो तरीही आपल्याला गृहिणीच व्हावे लागणार आहे असे गृहीत धरून त्या शिक्षणावर फारसा खर्च करत नाहीत”, असे प्राध्यापक सिंग सांगतात.

महिलांचे निवासी राज्य तसेच जात यांचा नोकरी व्यवसायाच्या गतिशीलतेवर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास संशोधकांनी केला. त्यांना आढळून आले की अनुसूचित जाति-जमाती सारख्या ऐतिहासिकदृष्ट्या वंचित जातीतील महिलांची उच्च जातीच्या महिलांच्या तुलनेत नोकरी व्यवसायातील गतिशीलता कमी उच्चस्तरीय आहेत. याशिवाय, बिहार आणि झारखंड सारख्या गरीब राज्यांतील तरुण महिलांना तमिळनाडुसारख्या समृद्ध राज्यांच्या तुलनेत खूपच कमी उच्चस्तरीय नोकरी-व्यवसाय मिळतात. संशोधकांच्या मते, वंचित पार्श्वभूमी असलेल्या महिलांना सामोरे जावे लागत असलेली नोकरी व्यवसायातील व्यापक असमानता याला कारणीभूत आहे.

तर महिला अश्या मागे राहिल्यामुळे देशाचे नेमके कसे नुकसान होत आहे? “महिलांच्या अशा लक्षणीय अधोगतीशीलतेमुळे देशाला अनेक गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. लैंगिक असमानतेचा नोकरी-व्यवसायाच्या  संधी उपलब्ध होण्यावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल, त्यामुळे देशातील लैंगिक आर्थिक असमानता आणखी बिघडेल.” असे प्राध्यापक सिंग बजावतात.

संशोधकांनी महिलांची नोकरी व्यवसायातील गतिशीलता वाढवण्यासाठी काही सुधारात्मक उपाय सुचवले आहेत. “मुलींना डोळ्यासमोर ठेऊन शैक्षणिक आणि आर्थिक धोरणे आखणे आवश्यक आहेत, जेणेकरून समाजातील सर्वस्तरातील लोकांना ती वापरता येतील”, असे प्राध्यापक सिंग सुचवतात. याशिवाय ते असेही म्हणतात की पुरुष आणि महिलांनी घरातील कामे विभागून घेण्यासाठी समाज संवेदनशील बनवला पाहिजे, ज्यामुळे महिलांना नोकरी व्यवसाय करण्यास पोषक वातावरण निर्माण होईल. “नोकरदार महिलांच्या लहान मुलांसाठी नोकरीच्या ठिकाणी पाळणाघर, पुरेशी प्रसूती रजा, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती रजेनंतर नोकरीची हमी तसेच प्रगती आणि प्रसूती दरम्यान नोकरीचा राजीनामा देणाऱ्या महिलांना नोकरीत परत आणण्यासाठी धोरणे आखणे यामुळे मोठा फरक पडेल.” असे प्राध्यापक आशिष सिंग म्हणतात.