Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आता ऑनलाइन

Read time: १ मिनिट
भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आता ऑनलाइन

भारताच्या समृद्ध संस्कृतीने वर्षानुवर्षे देश-विदेशातील अनेकांना भुरळ घातली आहे. इथला इतिहास, संस्कृती आणि कलेचा अफाट खजिना पहायला तर एक जन्म सुद्धा अपुरा पडेल. भारताची भौगोलिक व्याप्ती आणि विविधता दोन्ही प्रचंड असल्याने या सर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायला मर्यादा येणारच. सध्या जगात सगळीकडे डिजिटल माध्यमांकडे कल वाढतो आहे. भविष्यात अनेक आघाड्यांवर डिजिटल माध्यमे उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांना कुठेही न जाता घरबसल्या हा सांस्कृतिक संग्रह “ऑनलाईन” बघता आला तर? या पार्श्वभूमीवर ऑनलाईन संग्रहालय सुरु करणे हे त्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल ठरेल. शिवाय भारताच्या अनमोल सांस्कृतिक खुणा डिजिटल माध्यमांतून एकत्रित करणे शक्य होईल. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने राष्ट्रीय आभासी पुस्तकालय योजना (नॅशनल वर्चुअल लायब्ररी ऑफ इंडिया -एनव्हीएलआय) प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत विकसित केले गेलेले इंडियन कल्चर पोर्टल संकेतस्थळ एक प्रचंड मोठे आणि अभिनव आभासी दालन आहे.

भारतातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती देशभरातून एकत्रित करणे, त्याची शहानिशा करणे आणि त्याचे डिजिटल रूपांतर करून ती विविध विभागांमध्ये जनतेपुढे सादर करण्याचे काम आव्हानात्मक तर आहेच शिवाय त्याचा आवाकाही खूप मोठा आहे. एनव्हीएलआय मार्फत भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई)च्या सहाय्याने हे शिवधनुष्य संस्कृती मंत्रालयाने पेलायचे ठरवले आहे. एनव्हीएलआयच्या गटाने विविध भारतीय संस्थांमधून माहिती गोळा केली आहे. अनेक विभागांत वर्गीकृत केलेली ही माहिती विनाशुल्क “इंडियन कल्चर पोर्टल” संकेतस्थळावर बघता येते. हे संकेतस्थळ सर्वांना पाहता येईल असे ज्ञान आणि माहितीचे प्रचंड कायमस्वरूपी प्रदर्शन आहे. विशेषतः इतिहास आणि समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि संशोधकांसाठी अनेक लेखी आणि दृश्य संदर्भ इथे उपलब्ध आहेत. एरवी केवळ ठराविक संग्रहालये किंवा संस्थांमध्ये उपलब्ध असलेले, व तिथेच जाऊन बघावे लागत असलेले काही खास दुर्मिळ संदर्भ त्यांना इथे सापडू शकतात. “ज्ञान सर्वांसाठी आहे आणि ते मुक्त असले पाहिजे हे इंडियन कल्चर पोर्टलचे तत्व आहे. संस्कृती बद्दल माहिती आणि चर्चा-संवाद हे सर्वांसाठी खुले असलेच पाहिजे,” असे एनव्हीएलआय प्रकल्पाचे सल्लागार प्राध्यापक प्रदीप वर्मा यांनी सांगितले.

इंडियन कल्चर पोर्टल संकेतस्थळ डिसेंबर २०१९ मध्ये सुरु केले गेले. शिवाय “इंडियन कल्चर” नावाचे अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रकारचे सुरक्षित मोबाईल ॲप्स देखील उपलब्ध आहेत. संकेतस्थळ आणि ॲप्स केव्हाही, कुठेही आणि विनामूल्य वापरता येतात. कोणत्याही वापरकर्त्याला यात नाव नोंदवण्याची अट नाही. माहिती शोधण्यासाठी अत्याधुनिक “सर्च” आणि खऱ्या पुस्तकाची पाने उलटावी त्याप्रमाणे स्क्रीन वर पाने उलटत वाचता येणे (डिजिटल फ्लिप-बुक्स) ही येथील खास वैशिष्ट्ये आहेत. समाज माध्यमांमध्ये शेअर करता येणे आणि क्यूआर कोडच्या आधारावर माहिती शेअर करता येणे हे पर्याय देखील इथे उपलब्ध आहेत. माहिती प्रस्तुत करण्यासाठी लेखी, चित्र व दृक -श्राव्य अश्या अनेक माध्यमांचा उपयोग केला आहे.

इंडियन कल्चर संकेतस्थळावर काही दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखिते, दस्तऐवज, संग्रहालयांमधून मिळालेली माहिती आणि देशातील विविध भागांमधून कला, संगीत, वस्त्रोद्योग, खाद्यसंस्कृती हे आणि असे विभाग आपण पाहू शकतो. काही ऐतिहासिक स्मारके, किल्ले आणि शहरांबद्दल लेख संकेतस्थळावर सापडतात. अमूर्त सांस्कृतिक वारसा विभागात काही मौखिक प्रथा आणि पारंपरिक कलाकौशल्य यांना देखील स्थान दिलेले आहे. आणखी विभाग आणि नवनवीन माहितीची भर घालून विस्तार करणे सातत्याने चालू असते.

भारतीय संस्कृतीचा शोध घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याबद्दल विचारले असता, प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक कन्नन मौद्गल्य यांनी सांगितले, “भारत युगानुयुगे संस्कृतीने नटलेला देश आहे. इथे प्रत्येक गावात, तालुक्यात अनेक स्मारके, मंदिरे आणि एकापेक्षा एक सुरस कहाण्या सापडतात. हा वारसा जगासमोर प्रदर्शित करायची संधी आपल्याला या निमित्ताने मिळाली आहे.” उदाहरणादाखल त्यांनी असेही नमूद केले की “रचनाशास्त्राचे अद्भुत नमुने असलेली कितीतरी प्राचीन मंदिरे आहेत. यातून वैज्ञानिक आणि स्थापत्यशास्त्राची कितीतरी माहिती जगाला मिळू शकेल.”

इंडियन कल्चर या संकेतस्थळावर डिजिटल रूपात देशातील विविध सहभागी संस्थांकडून थेट मिळवलेले अनेक हस्तलिखित दस्तऐवज, संशोधनात्मक निबंध, संग्रहित वस्तूंची छायाचित्रे अशा प्रकारचे संदर्भ आहेत. या व्यतिरिक्त उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक माहितींवर आधारित चित्रात्मक निबंध, प्रसिद्ध स्थळांची आभासी यात्रा, कथा-कहाण्या आणि किस्से अशी काही खास सदरे देखील कार्यरत गटांनी सादर केली आहेत. भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागारातून (नॅशनल आर्काइव्हस ऑफ इंडिया) प्राप्त झालेल्या दस्तऐवजांच्या आधारे कहाण्या सांगितल्या आहेत. त्या वाचताना संदर्भासाठी काही महत्वाच्या शब्दांना लिंक दिलेल्या आहेत ज्यावर क्लिक केले असता अभिलेखागारातील इतर संबंधित संदर्भ पाहता येतात. उदाहरणार्थ कोहिनूर हिऱ्याच्या कहाणीमध्ये अनेक ऐतिहासिक पुरावे आणि हस्तलिखित माहिती लिंक करण्यात आली आहे. भारतीय संस्कृती बद्दल विविधांगी संक्षिप्त लिखाण असलेले “स्निपेट” सदर देखील इथे आहे.

दुर्मिळ पुस्तकांच्या विभागात काही पुस्तके अगदी चौदाव्या शतकातील सुद्धा आहेत. या विभागात अनेक विषयांवर पुस्तके आहेत - जसे की साहित्य, खाद्य संस्कृती, वनस्पतीशास्त्र आणि वास्तुशास्त्र. ह्या वर्गातील दुर्मिळ पुस्तके डाउनलोड करता येतात.

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त विभागांमध्ये “स्वातंत्र्य संग्रामाचा संग्रह” याची भर घातली गेली. यामध्ये स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित चित्रे, छायाचित्रे, दुर्मिळ पुस्तके, वृत्तपत्रांची कात्रणे आणि स्वातंत्र्य लढ्यातील वीर नायक-नायिका व ठिकाणांची माहिती एकत्रित केली आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेले पण फारसे परिचित नसलेल्या आणि गौरविले न गेलेल्या व्यक्तिमत्वांवर देखील एक विभाग समर्पित आहे. “डिड यू नो?” अर्थात “आपणास माहित आहे का?” या सदरामध्ये रोज प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि इतिहासातील वेगवेगळी सुरस माहिती दिली जाते.

आयआयटी मुंबईच्या संघात विषयातील तज्ञ आणि संकेतस्थळ विकसनासाठी असलेला गट असा सुमारे ५० जणांचा समावेश आहे. या संघाने संस्कृती मंत्रालयाच्या अख्त्यारीत असलेल्या संग्रहालयांतून आणि इतर विविध संस्थांच्या संग्रहांतून माहिती गोळा केली आहे. बहुतांश नोंदी किंवा संग्रह वस्तुरुपी असल्याने विविध संस्थांकडून हे सर्व डिजिटल स्वरूपात प्राप्त करणे हे एक मोठे आव्हान आहे. एखाद्या डिजिटल माहितीसंचाचे वर्णन करणाऱ्या माहितीला मेटाडेटा म्हणतात. डिजिटल स्वरूपातील वरील नोंदींचे महत्व सांगणारा मेटाडेटा संकेतस्थळासाठी गरजेचा असतो. या प्रकारचा मेटाडेटा शक्यतो माहिती देणाऱ्या संस्थांकडून पुरवला जातो. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) सुरवातीच्या काळात मेटाडेटा जमवण्याच्या व नोंद करण्याच्या कामात सक्रिय होते.

डिजिटल नोंदी आणि संबंधित मेटाडेटा पोर्टलसाठी असलेल्या ठिकाणी एकत्रित करण्याच्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. या प्रक्रियेमध्ये सर्व माहिती विभागानुसार एकत्रित करून मेटाडेटाच्या सहाय्याने त्याचे तपशील मांडले जातात. भारताचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा या विषयांतील तज्ञ मंडळी माहितीची शहानिशा करून ती खात्रीलायक असल्याची पडताळणी करतात आणि त्यानंतरच ही सर्व माहिती अपलोड करून सर्वांना उपलब्ध करून दिली जाते.

इंडियन कल्चर पोर्टल आयआयटी मुंबई येथील सर्व्हर्स मध्ये स्थित आहे. ३ पेटाबाईट साठवणूक क्षमता असलेल्या या सर्व्हर्समध्ये, आजमितीस ०. ८ पेटाबाईट माहितीसाठा समाविष्ट आहे (१ पेटाबाईट म्हणजे दहा लाख गिगाबाईट). “आम्ही सुरवातीपासूनच पोर्टलच्या माहितीसंचासाठी मोठा क्लाउड साठा उभा केला. त्यामुळे अजून काही काळ या विस्तारत चाललेल्या साठ्याला सहज पुरेल एवढी जागा सर्व्हर्स मध्ये आहे,” अशी माहिती प्रा. मौद्गल्य यांनी दिली. आजवर २२४ देशांमधून वीस लाखाहून अधिक लोकांनी या पोर्टलला भेट दिली आहे, ज्यात भारतातून सर्वाधिक लोकांचा समावेश आहे.

भविष्यात विविध विभागांमध्ये सांस्कृतिक माहिती वाढवण्याचा या गटाचा मानस आहे. शिवाय वापरकर्त्यांना सुलभ आणि आकर्षक पोर्टलचा अनुभव मिळावा, पोर्टल वर हवी ती माहिती सहज शोधता यावी आणि एकमेकांशी निगडित आंतरविभागीय माहितीच्या लिंक्स जोडलेल्या असाव्यात यासाठी गट प्रयत्नशील असेल. नवीन विभाग सुरु करणे आणि वापरकर्त्याच्या निवडीप्रमाणे माहिती प्रस्तुत करणे याचे देखील प्रयोजन आहे. सध्या पोर्टल वर इंग्रजी आणि हिंदी मधून माहिती उपलब्ध आहे. गटामध्ये संबंधित कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश करून या गटाला अनेक भारतीय भाषांमध्ये पोर्टल सुरु करायचे आहे, ज्यायोगे आणखी लोकांपर्यंत पोर्टलचा अनुभव पोहोचू शकतो. संकेतस्थळावरील लेखी माहिती श्राव्य माध्यमातून तिथे वाचून दाखवली जाईल असा विकल्प विकसित करण्याचे काम सुरु आहे.

इंडियन कल्चर संकेतस्थळ लोकप्रिय करणे गरजेचे आहे या विचाराशी प्रा. मौद्गल्य सहमत आहेत. तरुण पिढीला भारताच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाची जाणीव तीव्र करून देणे आणि त्याचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले. त्यांचा गट विविध समाज माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या हा गट त्यासाठी आवश्यक काम करणाऱ्या माणसांच्या शोधात आहे.