Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

हवामानातील बदलांमुळे मध्य हिमालयात आढळणारे धुरचुक नष्ट होत आहेत

Read time: १ मिनिट
हवामानातील बदलांमुळे मध्य हिमालयात आढळणारे धुरचुक नष्ट होत आहेत

बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम जगात सगळीकडे दिसून येत आहेत. अर्थातच, मोठ्या प्रमाणात जैव-विविधता असलेले हिमालयातील नाजुक स्थलतंत्रही यापासून सुरक्षित नाही. सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपुर आणि सोसायटी फॉर कंझर्विंग प्लॅनेट अँड लाइफ, उत्तराखंड येथील संशोधकांनी हिमालयातील बदलत्या हवामानाचा धुरचुक या वनौषधीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे.

भारतात जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, हिमालयाच्या पूर्वेतील राज्य आणि उत्तराखंड येथील बर्फाळ प्रदेशात धुरचुक (हिप्पोफे सॅलिसीफोलिया) आढळते. ही वनौषधी अत्यंत थंड हवामान सहन करू शकते आणि उतारांवरील माती सुरक्षित ठेवून तिचे संवर्धन करण्यात याची मोठी भूमिका असते. अन्न, पेय, औषधे, सौन्दर्यप्रसाधने आणि आरोग्यवर्धक टॉनिक निर्माण करण्यासाठी धुरचुक अत्यंत उपयोगी आहे. मात्र हवामानातील बदलाचा या वनौषधीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास अजून झालेला नाही.

संशोधक म्हणतात, "भविष्यात होणार्‍या हवामानातील बदलांमुळे धुरचुकच्या संख्येवर काय परिणाम होईल हे जाणून घेण्याचा, आमचा अभ्यास हा पहिला प्रयत्न आहे. धुरचुकच्या संवर्धन आणि व्यवस्थापन योजना निर्माण करण्यासाठी असा अभ्यास आवश्यक आहे". इकोलॉजिकल इन्फॉर्मॅटिक्स या मासिकात प्रकाशित झालेल्या वर नमूद अभ्यासाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून आंशिक आर्थिक मदत प्राप्त झाली आहे.

व्यापक पातळीवर केलेल्या क्षेत्र सर्वेक्षणाच्या आधारे संशोधकांनी उत्तराखंडमधील मध्य हिमालय क्षेत्रात सध्या ही वनौषधी कुठे आढळते याचा अंदाज लावला. गोळा केलेली ही माहिती व तापमान आणि पर्जन्यमान यांचे अभिलेख वापरुन त्यांनी 'स्पीशीस डिस्ट्रिब्यूशन मॉडेलिंग' पद्धतीने भविष्यात ही वनौषधी कुठे आढळेल हे वर्तवण्याचा प्रयत्न केला.

संशोधकांच्या मतानुसार २०५० सालपर्यंत या वनौषधीची ८७.२% निवास क्षेत्र नष्ट होतील. संशोधक स्पष्टीकरण देताना म्हणाले, "आमचा अंदाज आहे की वनौषधीचे निवास क्षेत्र समुद्रसपाटीपासून १७०० मीटर उंची पर्यन्त जाईल." त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील काही दशकात योग्य हवामानाच्या शोधात ही वनौषधी अजून अधिक उंचीवर स्थापित होईल.

संशोधकांच्या असे ही लक्षात आले की पूर, ढगफुटी, भूस्खलन, व मागील काही दशकात या क्षेत्रात झालेले बांधकाम आणि इंधन, कुंपण व फळे यासाठी झालेली या वनौषधीची कापणी यामुळे धुरचुकच्या निवास क्षेत्रावर दुष्प्रभाव पडला आहे.

या पार्श्वभूमीवर, ज्या वनस्पतींचे निवास क्षेत्र हवामान बदलामुळे त्यांच्या सामान्य निवास क्षेत्रापेक्षा वेगळे होऊ शकते,  त्यांच्यासाठी हवामान-अनुकूल व्यवस्थापन पद्धत वापरायला पाहिजे असे संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधकांना आशा आहे की या वनौषधीसाठी दीर्घकालीन संवर्धन योजना निर्माण करताना सदर अभ्यासातील निष्कर्ष वापरता येतील.