भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.

आयआयटी मुंबईच्या गटाचे यश: ब्लॉकचेन क्षेत्रात संशोधनासाठी अल्गोरॅन्ड अनुदान मिळाले

Read time: 1 min
मुंबई
13 ऑक्टोबर 2022
आयआयटी मुंबईच्या गटाचे यश: ब्लॉकचेन क्षेत्रात संशोधनासाठी अल्गोरॅन्ड अनुदान मिळाले

हल्ली ‘क्रिप्टोकरन्सी’ आणि ‘ब्लॉकचेन’ हे शब्द सर्रास आपल्या कानावर पडतात. ब्लॉकचेन म्हणजे संगणकांच्या नेटवर्कच्या माध्यमातून वितरित असलेला मोठा माहितीसाठा आहे, अर्थात एक प्रकारचा डिस्ट्रीब्युटेड डिजिटल डेटाबेस आहे. या संगणकांच्या जाळ्यात क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन), जमीन मालमत्ता किंवा मालसाठा यांच्या मालकीच्या नोंदी ठेवल्या जातात. शिवाय त्यांच्या व्यवहाराच्या आणि मालकी बदलल्याचा नोंदी पण या डेटाबेसमध्ये  ठेवल्या जातात.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मधील (आयआयटी मुंबई) संशोधकांच्या गटाला अल्गोरॅन्ड फाउंडेशनचे अनुदान जाहीर झाले आहे. अनुदानासाठी दहा संघ निवडले गेले ज्यातील मेगा-एसीइ संघामध्ये आयआयटी मुंबईचा गट समाविष्ट आहे. आयआयटी मुंबई गटाचे नेतृत्व संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे प्रा. मनोज प्रभाकरन करत आहेत. या दहा संघांची निवड अल्गोरॅन्ड सेंटर्स ऑफ एक्सलन्स (एसीइ) (अल्गोरॅन्ड प्राविण्य केंद्र) या उपक्रमासाठी झाली आहे. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे प्रा. विनय रिबेरो आणि प्रा. उमेश बेल्लूर या गटाचे सह-नेतृत्व करत आहेत. एसीइ उपक्रमाअंतर्गत ५ करोड अमेरिकी डॉलर (साधारण ४०० करोड रुपये) पाच वर्षाच्या कालावधी मध्ये दहा संघांना देण्यात येणार आहेत. अल्गोरॅन्ड उपक्रमासाठी ७७ प्रस्ताव आले ज्यात ४६ देशांमधून ५५० हून जास्त लोक सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील २७ तज्ञ मंडळींनी त्यांचे परीक्षण केले आणि दहा विजेत्यांची निवड केली. 

क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे आधारभूत तंत्रज्ञान आहे. जगभरात आभासी चलनाचा वापर आता खूप वाढू लागला आहे. मात्र सध्या लोकप्रिय असलेल्या बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी वापरणे संगणन क्षमतेच्या दृष्टीने 'महाग' असू शकते. केवळ एखाद्या व्यवहाराची नोंद करण्यासाठी देखील नेटवर्क मधील अनेक संगणकांवर खूप मोठ्या प्रमाणात संगणन प्रक्रियेची गरज असते. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते ज्यामुळे खूप प्रमाणात कर्ब उत्सर्जन होते. त्यामुळे अशा क्रिप्टोकरन्सीचा वापर पर्यावरणास हानिकारक असल्याचे मानले जाऊ लागले आहे.

अल्गोरॅन्ड ही ब्लॉकचेन तंत्रज्ञान निर्माण करणारी एक कंपनी आहे. कमी ऊर्जेचा वापर करणारी ब्लॉकचेन पद्धत विकसित करून कर्बोत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम रोखणे या हेतूने अल्गोरॅन्ड काम करत आहे. विविध क्षेत्रांमध्ये अल्गोरॅन्ड ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कर्ब-ऋण (कार्बन-निगेटिव्ह) ब्लॉकचेन परिसंस्था उभी करायचा प्रयत्न अल्गोरॅन्ड फाउंडेशन करत आहे. “अल्गोरॅन्ड ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची रचना आणि मार्गदर्शक नियमांमुळे बिटकॉइन व इथिरियम सारख्या अन्य क्रिप्टोकरन्सींच्या तुलनेत हे तंत्रज्ञान कमी ऊर्जेत काम करते. यामुळे अल्गोरॅन्ड पद्धत कार्बन-निगेटिव्ह असते,” असे प्रा. रिबेरो यांनी नमूद केले. या शिवाय प्रत्येक अल्गोरॅन्ड आधारित व्यवहारामागे अल्गोरॅन्ड कंपनी मिळालेल्या व्यवहार शुल्काचा काही भाग कार्बन ऑफसेटिंग साठी राखते. (औद्योगिक किंवा अन्य मानवी हालचालींमुळे होणारे कर्बोत्सर्जन कमी करणाऱ्या योजनांमध्ये सहभागी होऊन कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यास कार्बन ऑफसेटिंग म्हणतात.) पर्यावरणाची हानी कमी होईल अशा हरित ब्लॉकचेन तंत्रज्ञानाविषयी संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी या कंपनीने जगभरात विविध ठिकाणी अल्गोरॅन्ड सेंटर्स ऑफ एक्सलन्स (एसीइ) उभे करायला सुरु केले आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानात संपत्तीच्या (मालमत्ता किंवा क्रिप्टोकरन्सी) मालकीत झालेले बदल किंवा व्यवहाराच्या नोंदी ब्लॉक्स (डिजिटल खंड) वर केल्या जातात. ज्याप्रमाणे बँकेतील व्यवहार विशिष्ट पानांवर नोंदवले जातात त्याप्रमाणे सदर ब्लॉक्स डिजिटल नोंदींसाठी वापरले जातात. ब्लॉक्सच्या साखळी मध्ये प्रत्येक ब्लॉक मध्ये एका विशिष्ट ओळखीच्या (युनिक आयडी) आधारे आधीच्या ब्लॉककडे निर्देश करणारा एक परस्परसंबंध संचित केलेला असतो ज्याला हॅश व्हॅल्यू म्हणतात. या पद्धतीला हॅश पॉइंटरच्या आधारे केलेले ‘क्रिप्टोग्राफिक चेनिंग’ म्हणतात. असे ब्लॉक्स जोडून एक मोठी साखळी तयार होते त्याला ब्लॉकचेन म्हणतात. संपत्तीच्या मालकीबद्दल ब्लॉकचेनमध्ये नोंदवलेली माहिती स्वैरपणे कधीही बदलता येत नाही त्यामुळे माहिती विश्वासार्ह पद्धतीने संचित राहते. हॅश पॉइंटरच्या वापरामुळे सर्व व्यवहारांची मागील सर्व माहिती देखील सुरक्षित राहते. या सर्व व्यवहारांच्या नोंदी असलेल्या डेटाबेसला लेजर म्हणतात. लेजर कोणत्याही एका केंद्रित सर्वर वर नसून बरेच सहभागी लोक त्याला एकत्रित बाळगतात आणि त्याची देखभाल करतात. या सहभागींना त्यांच्या या सेवेकरता क्रिप्टीकरन्सीच्या रूपाने मोबदला मिळतो. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांच्या नोंदींसाठी ब्लॉकचेन बहुश्रुत आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग सध्या मोठ्या प्रमाणात त्या नोंदी सुस्थितीत ठेवण्यासाठी होतो.

आयआयटी मुंबईचा गट अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या मेगा-एसीइ बहु-संस्थात्मक संघाचा भाग आहे. मेगा-एसीइ मध्ये पर्ड्यू ब्लॉकचेन लॅबच्या संयोजनाअंतर्गत अनेक विद्यापीठे आंतर-विद्याशाखीय सहकार्य करत आहेत. यात जगातील उत्तमोत्तम विद्यापीठांचा सहभाग आहे. मेगा-एसीइ संघामध्ये आशिया मधून मुंबई आणि चेन्नई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर विद्यापीठांबरोबर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका मधील विद्यापीठांचा समावेश आहे.

“ब्लॉकचेन पद्धतीवर आणखी अभ्यास करण्यासाठी अनेक करणे आहेत,” असे प्रा. प्रभाकरन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले “एकतर ब्लॉकचेन तंत्रज्ञान अजून अपरिपक्व आहे. त्यावर आधारित बरेच अल्गोरिदम किंवा प्रणालींची रचना पद्धतशीर नसून जशी गरज पडेल तशी रचली गेली आहे. अल्गोरॅन्ड तंत्रज्ञान इतरांपेक्षा वेगळे ठरते कारण त्यात क्रिप्टोग्राफिक तंत्र वापरून बिटकॉइन मध्ये असणारे अवजड आणि पर्यावरणास घातक संगणन तंत्र टाळलेले आहे. पण एवढ्यावरच थांबून चालणार नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञान अधिक मजबूत आणि कार्यक्षम बनवण्यासाठी आम्ही आयआयटी मुंबई मध्ये काम करत आहोत. सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्ट्या कार्यक्षम असणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सुरक्षित बहुपक्षीय (मल्टी-पार्टी) संगणन सारखी प्रगत क्रिप्टोग्राफिक तंत्रे वापरून क्रिप्टोकरन्सी सारख्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि गोपनीयता यात समतोल राखण्यातील अडचणी आम्हाला दूर करायच्या आहेत. या शिवाय मेगा-एसीइ कार्यक्रमात जगातील खरेखुरे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन आणि प्रत्यक्ष वापरता येतील असे ब्लॉकचेन आधारित तोडगे शोधायचा संशोधकांचा मानस आहे. या व्यतिरिक्त, प्रत्यक्षात जेव्हा क्रिप्टोकरन्सी धारकांना ती वापरायला उद्युक्त केले जाते तेव्हा त्या मागे लागणाऱ्या गेम-थिअरीच्या तर्कशास्त्रावर पण लक्ष दिले जाईल.”

प्रा. मनोज प्रभाकरन थिअरिटीकल क्रिप्टोग्राफी वर काम करणाऱ्या संशोधकांपैकी एक आहेत. याच संशोधकांच्या समुदायातून मेगा-एसीइ संघाचे बीज पेरले गेले. डिस्ट्रीब्युटेड डेटा रेपॉसिटरिज या विषयातील संशोधनात ते कार्यरत आहेत. प्रा. रिबेरो आणि प्रा. बेल्लूर यांचे संशोधन ब्लॉकचेनचा वेग वाढवण्यावर केंद्रित आहे, जसे प्रति सेकंद अधिक व्यवहार करता येणे आणि एखाद्या व्यवहाराची खातरजमा (कन्फर्मेशन) होण्यासाठी लागणारा अवधी कमी करणे. “ब्लॉकचेन तंत्रज्ञान अनेकविध तंत्रज्ञानांचे मिश्रण आहे. आयआयटी मुंबईमध्ये सैद्धांतिक दृष्ट्या आणि व्यावहारिक उपयोग या दोन्हीवर काम करणारे तज्ञ आहेत त्यामुळे दोन्ही अंगांनी समतोल साधता येईल,” असे प्रा. बेल्लूर यांनी नमूद केले.

मेगा-एसीइ प्रकल्पाला मिळणाऱ्या साधारण ८० लाख अमेरिकी डॉलर (साधारण ६४ करोड रुपये) पैकी साधारण ३.५ लाख डॉलर(साधारण २.८ करोड रुपये) आयआयटी मुंबईच्या वाट्याला येणार आहेत. जगभरातील अनेक विद्यार्थ्यांना विविध भाषांमधून ब्लॉकचेन संदर्भातील शिक्षण देण्याचा मेगा-एसीइचा हेतू आहे. आयआयटी मुंबई आणि इतर सहभागी संस्थांमध्ये कार्यशाळा, प्रशिक्षणे, हॅकॅथॉन आणि ब्लॉकचेन दिन असे सहकार्यात्मक उपक्रम राबवून ब्लॉकचेन संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. अल्गोरॅन्ड परिसंस्थेच्या आधारे पायाभूत सुविधांच्या समस्या सोडवायला मदत होऊ शकते. मेगा-एसीइ गटातील आयआयटी मुंबई सारख्या संस्था ज्या देशांमध्ये स्थित आहेत तिथल्या स्थानिक समस्या सोडवायला या पद्धतीने मदत करण्याचा देखील मेगा-एसीइ संघाचा विचार आहे.

“ब्लॉकचेन तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. सध्या त्याचा वापर बऱ्यापैकी प्रायोगिक तत्वावर असला तरी भारतातील उद्योग-व्यवसाय आणि सरकार त्यात बराच रस दाखवत आहेत. भविष्यात जेव्हा हे तंत्रज्ञान आणखी सामर्थ्यशाली होईल आणि त्या आधारित डिजिटल व्यवहार आणखी कार्यक्षम व पारदर्शक होतील तेव्हा या तंत्रज्ञानाचा व्यापक स्वीकार होऊ शकेल,” असे प्रा. रिबेरो म्हणाले.