तारा ॲपद्वारे देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये घेतल्या गेलेल्या वाचनाच्या चाचण्यांमध्ये ७ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग.

धुक्याच्या दुलईला भगदाड पाडणारी शहरे

Read time: 1 min
मुंबई
25 ऑक्टोबर 2018
भारत आणि पाकिस्तानावर पसरलेली धुक्याची भगदाडे. दिल्ली आणि सिंधू -गंगा नदीच्या पठारी प्रदेशातील अनेक शहरांवरील मोठाल्या भगदाडांचे चित्रण येथे दिसून येते. हे छायाचित्र नासाच्या मोडीस (MODIS) या उपग्रहाने ३० जानेवारी २०१४ रोजी घेतले आहे. स्थानिक वेळ - सकाळी १० वाजता

उत्तर भारतातील हिवाळे हा कायमच चर्चेचा विषय आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये दाट धुके आणि गोठवणाऱ्या शीत लहरीमुळे आगगाड्या, विमान वाहतूक आणि अनेकांचे दैनंदिन आयुष्यही विस्कळीत होते. धुक्याचा अचूक अंदाज वर्तवणे हे या भागातील वाहतुकीच्या आणि इतर चलनवलनाच्या आखणीच्या दृष्टीने आवश्यक असते. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की उपरोक्त घटकांव्यतिरिक्त शहरातील तापमानवाढ हा धुक्यावर परिणाम करणारा आणखी एक घटक आहे. जमिनीच्या वाढलेल्या तापमानामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरावरील धुक्याचे आवरण जास्त वेगाने विखुरले जाते. त्यामुळे अवकाशातून पाहिले असता धुक्याच्या आवरणाला अक्षरशः त्या त्या शहराच्या आकाराची भगदाडे पडलेली दिसतात.  

वातावरणाच्या खालच्या थरात, आर्द्रतेच्या द्रवीभवनामुळे तयार झालेला ढग म्हणजे धुके. शेतजमिनींमुळे आणि पाण्याच्या साठ्यांमुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारी आर्द्रता आणि तिला मिळालेली संथ वाऱ्यांची जोड यामुळे उत्तर भारतात दाट धुके तयार होते. क्वचित त्रासदायक ठरणारे हे धुके या प्रदेशाच्या परीस्थितीकीत (इकॉलॉजी) महत्त्वाची भूमिका बजावते, तसेच काही विशिष्ट फळझाडांच्या वाढीस पोषक ठरते.

संशोधकांनी मॉडरेट रेझोल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडीओमीटर (मोडीस) या नासाच्या उपग्रहाने काढलेल्या चित्रांमधून आलेला १७ वर्षांचा (२००० ते २०१६) डेटा तपासला. त्यात गंगेच्या खोऱ्यातील शहरांवर त्यांना “धुक्याची भगदाडे” आढळून आली. त्यातील सर्वात मोठे भगदाड हे दिल्ली शहरावर दिसले.

जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार असे दिसून येते की, धुक्याच्या भगदाडाचा भौगोलिक आवाका फार मोठ्या प्रमाणात शहराच्या लोकसंख्येशी निगडीत आहे. शहराची लोकसंख्या जितकी जास्त तितके हे धुक्याला पडलेले भगदाड मोठे. या अभ्यासगटाचे नेतृत्व करणारे आयआयटी मुंबईतील माजी प्राध्यापक रितेश गौतम म्हणाले, “अमेरिका, युरोप आणि आशियातील १३ प्रातिनिधिक शहरांमधून धुक्याचे भगदाड आणि लोकसंख्या यातील घनिष्ठ संबंध दिसून आला. जागतिक पातळीवर तुलना केली असता दिल्लीतील शहरी उष्णतेचा धुक्यावर सर्वात जास्त परिणाम झाला आहे.”

धुक्याच्या निर्मितीवर उष्णतेचा नक्की कसा काय परिणाम होतो? ग्रामीण भागात हवामान त्यामानाने थंड असते. तसेच झाडी जास्त असल्याने हवेत पुरेशी आर्द्रता देखील असते. अतीव शहरीकरणामुळे, विशेषतः थंडीच्या दिवसात, शहरे सहसा ग्रामीण भागापेक्षा उष्ण असतात. शिवाय शहरात झाडी, पिके किंवा गवत यांचीदेखील कमतरता असते. याचा परिणाम म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सापेक्ष आर्द्रता कमी असते. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात तयार होणाऱ्या धुक्यात टोकाचा फरक पडू शकतो.

प्राध्यापक गौतम म्हणतात, “धुक्याच्या भगदाडांचा विशेषतः दिल्लीवर होणारा परिणाम इतका तीव्र आहे की, गेल्या सतरा वर्षांच्या काळात (२०००-२०१६) आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा दिल्लीत धुके पडण्याच्या घटना ५०% ने कमी झाल्या आहेत.”

या अभ्यासातून असेही स्पष्ट झाले आहे की हवेतील सूक्ष्मतुषारांमुळे (एरोसोल्स – म्हणजेच शहरातील प्रदूषकांमधून बाहेर पडणारे आणि हवेत तरंगणारे बारीक कण) धुके अधिक दाट होते किंवा वाढते. मात्र, शहरांच्या तापमानवाढीचा परिणाम सूक्ष्मतुषारांच्या परिणामापेक्षा अधिक प्रभावशाली आहे. त्यामुळे सूक्ष्मतुषार असूनही  धुक्याला भगदाडे पडतात असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या शोधाचा धुक्याच्या अनुमानावर परिणाम होऊ शकतो. “या अभ्यासातून समोर आलेल्या बाबी धुक्याच्या संदर्भातल्या प्रक्रिया अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच शहरातील तापमानवाढीचा धुक्यावर होणारा विशिष्ट परिणाम त्या अधिक ठळकपणे दर्शवतात. हवेचे प्रदूषण आणि शहरीकरण या दोन्ही गोष्टींचा परिणाम लक्षात घेणारी एक विकसित अनुमान प्रणाली तयार केल्यास धुक्याचे अनुमान करण्याची क्षमता सुधारू शकते”, असेही प्राध्यापक गौतम म्हणतात.

धुक्याची भगदाडे तयार होण्याच्या प्रक्रियेवर शहरातील तापमानवाढीचा काय परिणाम होतो याचा पुरावाच या निष्कर्षांमधून मिळतो. प्राध्यापक गौतम म्हणतात त्याप्रमाणे, “धुके हा केवळ स्थानिक मुद्दा नसून प्रादेशिक मुद्दा आहे.” पारिस्थितीकीच्या दृष्टीने धुके महत्त्वाचे असते ही वस्तुस्थिती आहे. धुक्यामुळे उत्तरेच्या पठारी प्रदेशातील जीवनावर मोठाच परिणाम होतो. म्हणूनच धुके निर्माण होण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच केवळ दिल्लीपुरते नव्हे तर उत्तर भारतातील इतर प्रदेशातदेखील हवेच्या प्रदूषणाचा आणि शहरीकरणाचा धुक्यावर काय परिणाम होतो याचा सखोल अभ्यास करणे निकडीचे ठरते.