तेल शुद्धीकरण कारखान्यातील अपशिष्ट पाणी वाळूमधून वाहिल्यानंतर त्यात प्रदूषकभक्षी जीवाणूंचे थर (बायोफिल्म) तयार झाले व या थराने पाण्यातील घातक संयुगे नष्ट केली.

हँडपंपला जोडता येणारे आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र

Read time: 1 min
मुंबई
6 डिसेंबर 2018

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी ग्रामीण भागात वापरण्यासाठी कमी खर्चाचे, सोप्या पद्धतीने देखरेख करता येण्यासारखे आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र विकसित केले आहे.

अधिक प्रमाणातील ‘आर्सेनिक’ मुळे पेयजल विशाक्त होते ज्यामुळे कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह आदी रोग व गर्भवती महिलांच्या होणाऱ्या बाळांचा मेंदू कमजोर होऊ शकतात. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र विकसित केले आहे जे पिण्याच्या पाण्यातील आर्सेनिक यथायोग्य प्रमाणात कमी करते. 

भारतात २१ प्रांतातील जवळ जवळ २४ कोटी लोक अत्यधिक प्रमाणात आर्सेनिक असलेल्या पेय जलाचा वापर करतात. त्यापैकी बहुतांश लोक गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात राहणारे आहेत जिथे उपलब्ध असलेल्या नलकूप विहिरीतील पाण्यात हे कर्करोगजन्य आर्सेनिक अधिक प्रमाणात असते. उन्नत देशांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये आर्सेनिकसह अन्य गाळ गाळून शुद्ध पाणी निर्माण करणारी केंद्रीभूत संयंत्रे असतात. पण ग्रामीण भागात वस्त्यांचा आकार लहान असतो व विस्तार खूप असतो ज्यामुळे केंद्रीभूत पेयजल शुद्धीकरण संयंत्र बसवणे व्यवहार्य नसते. तसेच विकेंद्रित शुद्धीकरण प्रक्रिया खूप महाग, अकार्यक्षम असते व ती चालवण्यासाठी कुशल कामगार आवश्यक असतात म्हणून ती बसवणे पण शक्य नसते.

प्रा. संजीव चौधरी व त्यांच्या पर्यावरण विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील संशोधकांनी भारतात सर्वत्र उपलब्ध असलेल्या हँडपंपनाच जोडता येण्यासारखे आर्सेनिक गाळणारे संयंत्र विकसित केले आहे. या संयंत्रात लोखंडी खिळ्यातील मूलद्रव्य लोखंड, आर्सेनिक व प्राणवायू यांची रासायनिक अभिक्रिया होऊन आर्सेनिक वेगळे केले जाते. या प्रक्रियेमध्ये कुठल्याही हानिकारक रासायनिक पदार्थाचा वापर नाही व अन्य अशाच प्रक्रियांच्या तुलनेत २० पट कमी लोखंड वापरले जाते.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नव्याने विकसित केलेल्या या संयंत्रामुळे आर्सेनिकचे प्रमाण १०० पट कमी होते.  हे संयंत्र जवळजवळ २०० कुटुंबांना आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे शुद्ध पेयजलाचा रोज पुरवठा करण्यासाठी वापरता येऊ शकेल. आर्सेनिक गाळण्याच्या या संयंत्रात आवश्यकतेप्रमाणे बदल करून मोठ्या शुद्धीकरण संयंत्राला पण जोडता येते. निर्माण झालेला आर्सेनिक गाळ जवळजवळ ५ वर्षापर्यंत गळती शिवाय राहू शकतो ज्यामुळे हे संयंत्र सुरक्षित पण असते. संयंत्र फक्त तीन महिन्यातून एकदा स्वच्छ करावे लागते, याखेरीज सतत देखरेख करण्याचीही आवश्यकता नसते.

आर्सेनिक गाळणारे संयंत्र स्थानिक जनसमूह देखील उभारू शकतो. “बंगालमध्ये फक्त दोन मुलांनी स्थानिक गवंडी व नळ जोडणी करणाऱ्यांच्या मदतीने जल शुद्धीकरण सयंत्र उभे केले” असे प्रा. संजय चौधरी सांगतात. “त्याच प्रमाणे बलिया जिल्ह्यामध्ये एका स्थानिक व्यक्तीने गवंडी व नळजोडणी करणाऱ्याच्या मदतीने संयत्र उभे केले" असे  ते सांगतात.

गावोगावी सहज उपलब्ध असलेल्या हँडपंपला लिफ्ट अँड फोर्स यूनिट जोडून अथवा इंडिया मार्क-२ पम्पामध्ये थोडा सुधार करून आर्सेनिक गाळणारे संयंत्र जोडता येते. शुद्धीकरण संयंत्रात दोन टाक्या असतात. प्रत्येक टाकीचे दोन भाग असतात. त्यापैकी एकामध्ये लोखंडाचे खिळे आणि दुसर्‍या भागात दगडाची खडी असते. लोखंडी खिळे पाण्यात विरलेल्या प्राणवायूच्या मदतीने आर्सेनिक वेगळा करता येवू शकेल असा क्षार निर्माण करतात जो खिळ्यांवरच राहतो. दगडाच्या खडीच्या टाक्यात अन्य कण व अशुद्धी गाळल्या जातात. दोन टाक्यामुळे संयंत्र कधीच बंद पडत नाही (फेल सेफ सिस्टेम), एक टाकी जरी बंद पडली तरी दुसरी चालू राहते.

संयंत्र उभारणीसाठी लागणार्‍या खर्चाबाबत शास्त्रज्ञ सांगतात की ही रक्कम संयंत्राचे स्थान व दळण वळण खर्चावर अवलंबून असते आणि १०० ते २०० कुटुंबांच्या समूहाकरिता सुमारे ₹४०००० ते ₹७५००० खर्च येतो. दर वर्षी संयंत्र स्वच्छ करणे इत्यादीसाठी अंदाजे ₹ १००० खर्च येतो. पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला आर्सेनिक मुक्त पेय जलासाठी या प्रमाणे एक रुपया प्रति महिना पेक्षाही कमी खर्च येतो.

शास्त्रज्ञांनी प्रयोगासाठी पश्चिम बंगालच्या ४ खेड्यांमध्ये आर्सेनिक गाळणारी सयंत्रे २००८ साली बसवली. यश मिळाल्यामुळे त्यांनी गंगेच्या खोऱ्यात ६० अन्य जागी ही संयंत्रे बसविली, ज्यापैकी २७ उत्तर प्रदेशमध्ये, २१ बिहारमध्ये, ४ असममध्ये व ८ पश्चिम बंगालमध्ये आहेत. वेळोवेळी गावकर्‍यांच्या अभिप्राय व सूचनांप्रमाणे संयंत्राच्या रचनेत बदल करून ते अधिक कार्यक्षम केले. संशोधकांच्या मते आर्सेनिक गाळणारे संयंत्र उभारण्यात प्रमुख आव्हान म्हणजे गावकर्‍यांमध्ये या संयंत्राविषयी असलेली अनभिज्ञता. सरकारने या विषयी अधिक जनजागृती करून संयंत्र  उभारणीसाठी प्रचार केला पाहिजे. पूर्वीच्या जल शुद्धीकरण प्रक्रिया अधिक गुंतागुंतीच्या अथवा जास्त खर्चाच्या होत्या व या पुर्वानुभवामुळे लोक नवीन संयंत्र उभारणीस कदाचित अनिच्छा दर्शवतात. यद्यपि नवीन संयंत्रात हे मुद्दे विचारात घेतले आहेत तरीही काही तांत्रिक अडचणींचा सामना करावाच लागतो, जसे खेड्यांमधील हँडपंपचा दर्जा!  “आमचे आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र चांगल्या दर्जाचे शुद्ध पाणी देण्यास सक्षम आहे परंतु अधिक वापरामुळे हँडपम्प जर वरचेवर नादुरुस्त राहिले तर अंततः संयंत्राचा वापर बंद होतो“ असे डॉ. चौधरी सांगतात.

शास्त्रज्ञांच्या मते जागृकतेच्या अभावे देखील संयंत्राच्या व हँडपम्पच्या देखरेखीकडे दुर्लक्ष होते. “प्रारंभी आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र निशुल्क दिले होते परन्तु पुढे गावकर्‍यांनी हँडपम्पच्या देखरेखीसाठी खर्च करण्यास नकार दिला” असे प्रा. चौधरी म्हणाले. ”ज्या ठिकाणी जनता जागरूक आहे त्या ठिकाणचे आमचे आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र अजूनही काम करत आहेत. म्हणून संयंत्राचे यश हे जागरूकता व खर्चाची तयारी असण्यावर अवलंबून आहे“ असे त्यांचे मत आहे.