संशोधकांनी द्विमितीय पदार्थांचा वापर करून ट्रान्झिस्टर तयार केला आणि स्वायत्त यंत्रमानवांसाठी त्यावर आधारित अतिनिम्न ऊर्जाचालित कृत्रिम चेतापेशी सर्किट निर्माण केले.

शहरी जल प्रणालींच्या शाश्वत भविष्यासाठी प्रस्ताव: ‘प्रवर्धित विकेंद्रीकारण’

Read time: 1 min
Mumbai
3 नवेंबर 2023
A small-scale wastewater treatment plant. Photo: H. S. Sudhira

पाण्याची वाढती मागणी, विषम परिस्थिती किंवा आपत्तींशी सामना करण्याची सक्षमता, संसाधनांचा शाश्वत वापर आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम आटोक्यात ठेवणे अशा आव्हानांमुळे जगभरातील शहरांवर ताण पडतो. या परिस्थितींमध्ये पाण्याच्या पायाभूत सुविधांसाठी असलेली केंद्रिकृत रचना शाश्वत नाही अशी टीका सध्या होत आहे. शहरी जल संरचना म्हणजे पाण्याशी संबंधित पायाभूत सुविधा ज्यात पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवथापन प्रणाली व जल प्रक्रिया केंद्र (शुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रे) समाविष्ट असतात.

बहुतांश शहरांमध्ये जल संरचना सुविधा ‘केंद्रीकृत’ पद्धतीच्या असतात. म्हणजेच एक किंवा अगदी मोजक्या स्रोतांमधील पाण्यावर एकाच केंद्रात प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर ते पाणी जलवाहिन्यांमधून शहराला पुरवले जाते. याशिवाय शहरी जल संरचना केंद्रीकृत असली की सांडपाणी एकत्रित करून त्यावर शहराच्या सीमेबाहेर मोठ्या सांडपाणी प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केली जाते.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) मध्ये नुकताच केलेला एक अभ्यास असे दर्शवतो की शहरी जल संरचना शाश्वत आणि परिवर्तनशील बनवायची असेल तर नियंत्रण केंद्रित असावे या दृष्टिकोनात बदल करून प्रवर्धित विकेंद्रित (scaled decentralised) जल प्रणालींचा उपयोग केला पाहिजे. जल प्रणाली एकाच वेळेस शाश्वत आणि परिवर्तनशील असावी असे सदर संशोधनातून अधोरेखित होते.

आयआयटी मुंबई मधील सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड इंजिनियरिंग (CUSE) येथील या शोधनिबंधाचे लेखक प्रा. प्रदिप काळबर आणि कु. श्वेता लोखंडे यांनी प्रचलित केंद्रीय जल प्रणालींबाबत काही चिंता या अभ्यासात व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “पुरासारख्या आपत्ती किंवा एखाद्या भागाच्या बंद पडण्यामुळे केंद्रीय जल प्रणाली कोलमडून पडू शकते. प्रत्येक क्षेत्राच्या विशिष्ट गरजा भागवायला अश्या प्रणाली सक्षम नसतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी सांडपाणी पुनर्प्रक्रिया स्थानिकपणे राबवता येण्याची संधी केंद्रीय प्रणालीत मिळत नाही. उपलब्ध पायाभूत सुविधांचा पुरेपूर वापर न होणे ही या प्रणालींमधली आणखी एक कमतरता आहे. यामुळे जलशुद्धीकरण केंद्रे, पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे कार्य प्रभावीपणे होत नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की “मोठ्या केंद्रीय जल प्रणाली स्थापन करताना त्यातील गुंतवणुकीचा एक लॉक-इन कालावधी असतो. नवप्रवर्तनामुळे मिळणाऱ्या परिवर्तन-सुलभतेस ह्यात संधी मिळत नाही. शिवाय एका ठराविक परिमाणाच्या पलिकडे या प्रणालींच्या वापरातून तितकेसे आर्थिक फायदे होत नाहीत. उलट केंद्रिय जल प्रणालींना खूप ऊर्जा आणि संसाधनांची आवश्यकता असते ज्यामुळे पर्यावरणावर ताण येतो.”

प्रचलित शहरी जल संरचनेमध्ये “घ्या-वापरा-फेका” (टेक-मेक-डिस्पोज) तत्वावरची रेषीय व्यवस्था असते – अर्थात चक्रीय व्यवस्थेच्या अभावामुळे संसाधनांचा पुनर्वापर नसतो. सतत वापरण्यासाठी सातत्याने स्वच्छ पाण्याचा उपसा केला जातो. बऱ्याचदा प्रक्रिया न करताच टाकाऊ पाणी नैसर्गिक जल स्रोतांमध्ये पुन्हा सोडले जाते. प्रचलित पद्धती मधील मुख्यत: ही बाब चिंताजनक आहे. संसाधनांची टंचाई आणि पर्यावरणाची चिंता दोन्ही वाढत चालले आहे आणि त्यामुळे प्रचलित पद्धत अजिबात शाश्वत नाही. सदर अभ्यासात जल व्यवस्थापनात पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया ही तत्वे समाविष्ट करून चक्रीय व्यवस्थेकडे झुकणारे मॉडेल प्रस्तुत केलेले आहे.

हवामान बदलामुळे येणारा शहरीकरणाशी निगडित ताण आणि अनिश्चितता यांच्याशी सामना करायला पायाभूत सुविधांचे नियोजन करताना परिवर्तनशीलता किती महत्वाची आहे ते या अभ्यासाने अधोरेखित केले आहे. मोठ्या विस्तारित शहरांना अनिश्चिततेचा धोका सर्वाधिक असतो. तिथे बदलत्या स्तरावर सेवा पुरवू शकणाऱ्या आणि आणीबाणीच्या स्थिती हाताळू शकणाऱ्या परिवर्तनशील जल प्रणाली स्थापन करणे आवश्यक आहे.

आतापर्यंत केलेल्या तुरळक अभ्यासांमध्ये शहरी जल प्रणालींच्या व्यवस्थापनात शाश्वततेबरोबर परिस्तिथिनुसार परिवर्तनशीलताही विचारात घेणाऱ्या प्रणाली विकसित करण्याचा दृष्टोकोन दिसतो. शाश्वत विकासाच्या तत्वांमध्ये परिवर्तनशीलतेचा समावेश अलीकडेच झालेला आहे. त्यातून कोणत्याही पायाभूत संरचना परिवर्तनशील बनवायच्या असतील तर मोठी गुंतवणूक लागते. नेमका याच दृष्टीने शहरी जल व्यवस्थापन केंद्रीकृत ऐवजी विकेंद्रीकृत (विभागलेले) करण्याचा आधारभूत बदल फायद्याचा ठरू शकतो.

या बदलाचे महत्व समजावताना प्रा. काळबर आणि कु. लोखंडे यांनी नमूद केले की, “शहरी जल सरचनांचे नियोजन करताना शाश्वत तत्वे आणि परिवर्तनशीलता दोन्ही ध्यानात घेणे अत्यावश्यक आहे. निव्वळ तांत्रिक आणि आर्थिक बाबींच्या आधारे याकडे बघणे योग्य नाही. याशिवाय, शहराच्या व्याप्तीनुसार योग्य अशी विकेंद्रीकृत संरचनेची व्याप्ती असावी. शहराची व्याप्ती ठरवताना त्यात एकूण निर्माण होणारे सांडपाणी लक्षात घ्यावे असा आमचा सल्ला आहे.”

शहरी जल संरचनेच्या केंद्रीकृत पद्धतीची संकल्पना १९००च्या शतकाच्या सुरवातीस मांडली गेली होती, पण त्यात आजच्या घडीला शहरात होणाऱ्या बदलांना सामावून घेण्यासाठी लागणारी लवचिकता नाही. विविध विभागांमधील समन्वय गुंतागुंतीचा असणे, प्रतिकूल परिस्थितींमध्ये संरचनेचे महत्वाचे भाग बंद पडणे आणि विकसित देशांत आधीपासून उपयोगात असलेल्या प्रणाली विकसनशील देशांकरता योग्य नसणे ही इतर आव्हाने आहेत.

या अभ्यासात प्रस्तुत केलेली प्रवर्धित विकेंद्रीकरणाची पद्धत पूर्णतः केंद्रीकृत पद्धती आणि संपूर्णपणे विखुरलेल्या पद्धती या दोन्हींच्या मधला मार्ग आहे. शहराच्या परिस्थितीनुरूप जल संरचनेसाठी लागणारे नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल याचे खरेतर विकेंद्रीकरण इष्टतम पातळीवर करता येईल. खर्चात व पर्यावरणावरील दुष्परिणामात घट, जल-शासनात सुधारणा, वाढीव परिवर्तनशीलता आणि पुनर्प्रक्रियेची क्षमता हे प्रवर्धित विकेंद्रीकरणाचे लाभ असू शकतात.
प्रवर्धित विकेंद्रीकृत प्रणालींचा वापर करणारा बदल घडला तर जल व्यवस्थापनात चक्रीय दृष्टिकोन येईल आणि वापरलेल्या पाण्याची पुनर्प्रक्रिया करणे आणि नवीन जल स्रोत तयार करणे यांना प्रोत्साहन मिळेल. शहरी जल प्रणालींच्या परिस्थिती प्रमाणे परिवर्तनशीलता आणि अनुकूलन सुधारण्यात याने हातभार लागेल आणि हवामान बदलामुळे ओढवणाऱ्या अत्यंत विषम परिस्थितींना तोंड देण्याची क्षमता वाढू शकेल.

विकेंद्रीकरणाला चालना देऊ शकणारे, नवप्रवर्तक तंत्रज्ञान, पर्यावरणीय बाबी, किफायतीशीरपणा आणि शासन क्षमता, हे घटक बारकाईने समजून घेणे विकेंद्रीकृत पद्धतीकडे वाटचाल करायची असल्यास आवश्यक आहे. तंत्रज्ञान उच्च असो वा साधे, त्याची उपयुक्तता ही शेवटी ते वापरायच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि किती मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान लागेल यावर बहुतांशी अवलंबून असते.

प्रा. काळबर आणि कु. लोखंडे यांनी प्रवर्धित विकेंद्रीकरणास सहाय्य करणारे घटक नोंदले आहेत. प्रथम, धोरणकर्ते आणि स्थानिक शहरी संस्थांची विकेंद्रीकृत प्रणालींबाबत जागृती वाढली पाहिजे. दुसरे, योजनाकार आणि अभियंते यांना विकेंद्रीकृत प्रणाली राबवाण्यास मदत होईल असे निर्णय घेण्यासाठी साधने/कामाच्या चौकटी/तंत्र यांचे पाठबळ हवे. आणि तिसरे, स्थापत्य अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि नियोजनकर्ते (जे भविष्यातील सल्लागार आणि निर्णयकर्ते आहेत) यांच्या क्षमता आणि ज्ञान वाढवायचा दृष्टिकोन आणला पाहिजे. यामुळे शहरी जल संरचनांचा प्रवर्धित विकेंद्रीकृत प्रणालीच्या दृष्टिकोनातून विचार होऊ शकेल.

संशोधकांचा निष्कर्ष आहे की शहरी जल प्रणालींसाठी समग्र धोरण आखणे हे विशिष्ट तंत्रांची निवड करण्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे. केंद्रीकृत आणि विकेंद्रीकृत प्रणालींच्या सुयोग्य एकत्रित रचनांची क्षेत्रं तयार करावी असे त्यांनी सुचवले आहे ज्यामुळे शहराचे जल व्यवस्थापन शाश्वत आणि परिवर्तनशील होऊ शकेल. प्रचलित जल प्रणालींऐवजी या दृष्टिकोनाचा विचार करणे विकसित आणि विकसनशील देशांना फायद्याचे आहे ज्यामुळे तिथे अनुक्रमे जुन्या शहरी जल संरचनेत परिवर्तन करताना आणि नवीन जल सुविधांना आकार देताना लाभ होईल.

संशोधक, व्यावसायिक आणि स्थानिक शहरी संस्था यांनी विकेंद्रीकरणाच्या आर्थिक बाजूचा अभ्यास करावा असे प्रा. काळबर आणि कु. लोखंडे यांनी आवर्जून सांगितले. अशा अभ्यासातून इष्टतम रचना, विविध दाखले आणि सुधारित धोरणे पुढे येतील अशी आशा आहे.