२०२१ च्या सरतेशेवटी मागे वळून बघताना असे दिसून येते की आपल्या सर्वांना अनेक बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. जग वैश्विक महामारीचा सामना करायला शिकत असताना एक शाश्वत आधार कायम होता आणि राहील. तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. अनेक आघाड्यांवर विज्ञानाची आगेकूच कायम राहिली.आपल्यासाठी रीसर्च मॅटर्स अनेक भारतीय भाषांमध्ये पर्यावरणाचे भान, सामाजिक प्रगती, ऊर्जा, अभियांत्रिकी, सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक्स मधील नवीन संशोधन आणि बरेच काही या वर्षी घेऊन आले होते. तुम्ही वाचकांनी आम्हाला भरभरून साथ दिली याचा आम्हाला आनंद वाटतो. काही निवडक महत्वाच्या विज्ञान लेखांकडे पुन्हा एकदा नजर टाकूया. येणाऱ्या वर्षात आणखी नवनवीन लेख मराठी आणि इतर भाषांमध्ये नक्की वाचायला विसरू नका.
मनुष्य आणि वन्यजीव यांच्या संबंधाला नेहमी दोन बाजू असतात - एक सहअस्तित्व आणि दुसरी संघर्ष. गुजरात मधील मगरी आणि मानव यांच्यातील संबंधांकडे नव्या दृष्टीकोनातून बघणारा हा अभ्यास निश्चितच रंजक आहे. मानव आणि प्राणी निसर्गातील समान भागीदार म्हणून त्यांच्या सहअस्तित्वाला प्रोत्साहन देणारा “मानव-वन्यजीव परस्परसंवादाचा अभ्यास: विसंवादाकडून सुसंवादाकडे जाण्याची गरज ” लेख जरूर वाचा .
भारतात रस्ते आपघातांचे प्रमाण आणि त्यातून जिवीतहानीचे प्रमाण फार आहे. पाश्चात्य देशांत प्रचलित असलेल्या प्रगत चालक सहाय्यक प्रणाली (एडीएएस), ड्रायव्हिंगच्या भिन्न सवयी, शिस्तीचा अभाव आणि रहदारीसंबंधी भिन्न मूलभूत सुविधांमुळे भारतासाठी जशाच्या तशा उपयोगी नाही. भारतात सुरक्षित विरुद्ध धोकादायक ड्रायव्हिंग ओळखण्यासाठी आणि इथल्या परिस्थितीनुसार चालकाला सहाय्य किंवा चेतावनी देण्यासाठी प्रणाली विकसित होण्याकरता भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी केलेला तपशीलवार अभ्यासाबद्दल सांगणारा लेख “अपघातमुक्त सुरक्षित रस्ते हवेत म्हणून... “.
बालकांमधील कुपोषण भारतातील मोठी सामाजिक आरोग्य समस्या आहे आणि त्यावर मात करण्यासाठी सरकार चे प्रयत्न चालू असतात. पण खरोखर त्यातून बालकांना किती फायदा होतोय हे या अभ्यासात पाहिले गेले. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या या कामात नवीन पर्यायी पोषक अन्न प्रकार सुचवले आहेत. प्रायोगिक तत्वावर या अन्नाचा प्रभावीपणा देखील त्यांनी सिद्ध केला.सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने महत्वाच्या या अभ्यासाबद्दल येथे अधिक वाचा भारताच्या कुपोषण समस्येवर एक उपाय - पोषकमूल्ययुक्त नवीन अन्न प्रकार.
स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा स्रोतांचे महत्व आता अनन्यसाधारण आहे. भारताच्या लष्कराला दुर्गम भागांमध्ये काम करताना अविरत ऊर्जा पुरवता यावी या ध्येयाने प्रेरित भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी सिक्कीमच्या उंचावरील लष्करी तळासाठी उभ्या केलेल्या सौर मायक्रोग्रिडची ही कहाणी - दुर्गम भागांमध्ये सौर मायक्रोग्रिड्सच्या रूपात शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा स्रोत .
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी आधुनिक संगणकांना लागणारी मोठी संगणन क्षमता आणि मेमरी नॅनोस्केल मध्ये एकत्रित विकसित केली आहे. हा यशस्वी प्रयोग भविष्यात सुधारित संगणन व माहितीसाठा यासाठी उपयोगी असून, कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला मदत करणारा आहे. त्याबद्दल माहिती देणारा लेख प्रभावी संगणनासाठी मेमरी आणि संगणकीय क्रिया नॅनोस्केलमध्ये एकत्र शक्य.
अशाच उत्तमोत्तम विज्ञान लेखांना घेऊन २०२२ मध्ये आम्ही हजर होऊ. रीसर्च मॅटर्सचे वाचकांशी असलेले नाते आणखी दृढ होवो अशी आशा.