भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.

आता स्वयंपाकघरात नव्हे तर चक्क खिडकीत सूर्यप्रकाशात जेवण शिजवा !

Read time: 1 min
मुंबई
29 नवेंबर 2018
खिडकीत लावायचा सोलर कुकर. छायाचित्र सौजन्य

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) येथील विद्यार्थ्याला खिडकीत ठेवून वापरता येणाऱ्या, सौरऊर्जेवर चालणाऱ्या कुकरच्या रचनेसाठी गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन (जीवायटीआय) पुरस्कार मिळाला आहे.

घरगुती गरजांसाठी सौरऊर्जेचा वापर करण्याकडे कल वाढतो आहे. प्रकाशासाठी, पाणी तापवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी देखील सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, भारतात शहरांमध्ये राहणाऱ्या कित्येकांना जागेअभावी सौरऊर्जेचा वापर करता येत नाही. बहुतेक माणसे राहतात त्या अपार्टमेंट्समधून मोकळी गच्ची किंवा सौर पॅनेल उभारण्यासाठी रिकामी जागा नसते. मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या सौर कुकरच्या रचनेमुळे ही अडचण दूर होऊ शकते. याच रचनेला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

बाजारात बऱ्याच काळापासून  सौरऊर्जेवर चालणारे कुकर उपलब्ध आहेतच. मात्र या संशोधनातील नावीन्याची बाब म्हणजे आयआयटी मुंबई चे हे कुकर ठेवण्यासाठी मोठ्या गच्चीची किंवा बागेची आवश्यकता नसते. एक लहानशी खिडकीदेखील पुरेशी असते. शिवाय अन्न शिजण्यावर सतत लक्ष ठेवण्याची आणि दिवसाच्या वेळेनुसार कुकरची दिशा बदलण्याचीही गरज नसते. तसेच यात स्वयंपाकाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होतो.

आयआयटी मुंबई येथील इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरचे श्री. अविनाश प्रभुणे यांनी या कुकरची रचना केली आहे. त्यांना प्राध्यापक बी. के. चक्रवर्ती यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. हा सोलर कुकर वापरायला एखाद्या मायक्रोवेव्ह ओव्हनइतकाच सोयीस्कर आहे. चटकन अन्न शिजण्यासाठी तो दक्षिणेकडे तोंड करून असलेल्या कोणत्याही खिडकीत ठेवता येतो. केवळ वीसच मिनिटात कुकरमधील तापमान १२० अंश सेल्सियसपर्यंत जाते.

१९ मार्च २०१८ रोजी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या समारंभात आदरणीय राष्ट्रपती श्रीराम नाथ कोविद यांच्या हस्ते या संशोधनाला २०१८ सालचा गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन(जीवायटीआय)  पुरस्कार देण्यात आला.