संशोधकांनी द्विमितीय पदार्थांचा वापर करून ट्रान्झिस्टर तयार केला आणि स्वायत्त यंत्रमानवांसाठी त्यावर आधारित अतिनिम्न ऊर्जाचालित कृत्रिम चेतापेशी सर्किट निर्माण केले.

भारतातील शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकर व्यवस्था

Read time: 1 min
Mumbai
6 ऑक्टोबर 2020
भारतातील शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकर व्यवस्था

पाण्याचे वितरण करणारा खाजगी टॅंकर (फोटो : सुधीरा एच. एस.)

शहरांमधली पाण्याची उपलब्धता एक वाढती समस्या आहे, व त्यासाठी पाण्याचे पुरेसे स्रोत नसणे एवढे एकच कारण नाही. सतत वाढत असणारे शहरी भाग अजूनही पाइप मधून पाणी पुरवठा होण्याची प्रतीक्षा करत आहेत. नागरिक आणि पाणी पुरवठा विभाग, सर्वजण विस्कळीत पाणी पुरवठ्याला तोंड देण्यासाठी पाण्याच्या टॅंकरवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, दिल्ली जल मंडळाला शहरातील वेगवेगळ्या भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी जवळ जवळ ८०० टॅंकरची आवश्यकता भासते.

“पाणी पुरवठा मंडळांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर असल्याने पुरवठा साखळी प्रणाली पारदर्शक ठेवणे आव्हानात्मक होत आहे,” भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील प्रा. रविंद्र गुडी म्हणाले. पाणी पुरवठा मंडळांना कमीत कमी खर्चात पाणी पुरवठा करणे, जल शुद्धीकरण केंद्र व्यवस्थित चालवणे व पाण्याची चोरी न होऊ देणे अश्या अनेक गोष्टी साध्य करणे आवश्यक असते. अलीकडील एका संशोधनात, प्रा. गुडी व त्यांच्या गटाने जलस्रोतांपासून शुद्धीकरण केंद्रापर्यंत व तिथून नागरिकांपर्यंत वाजवी खर्चात पाणीपुरवठा व्हावा ह्याकरिता वेळापत्रकाचे योग्य नियोजन करण्यासाठी एक चौकट विकसित केली आहे.  

शहरांमधील आजच्या आणि भविष्यातल्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी पुरवठा व्यवस्था मजबूत असणे आवश्यक आहे. “शहरांच्या पाणी पुरवठा मंडळांना वितरण प्रशासनात सुधारणा करण्यासाठी व मोठ्या लोकसंख्येला स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी, नियोजनास व टॅंकरच्या फेऱ्यांचे वेळापत्रक तयार करण्यास उपयोगी असणाऱ्या चौकटीची गरज आहे,” असे प्रा. गुडी सांगतात. सदर अभ्यासाला, युरोपियन युनियन व भारत सरकारच्या इयू-इंडिया वॉटर को-ऑपरेशहन प्रोग्रॅम च्या लोटस प्रकल्पा अंतर्गत, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून अर्थसहाय्य लाभले.

प्रस्तावित चौकटीत, संशोधकांनी काळ क्षमता नावाची एक नवीन संकल्पना मांडली आहे, ज्यात एका ठिकाणाहून दुसरीकडे एक एकक पाणी वाहून नेण्यासाठी लागणारा काळ मोजला जातो. काळ क्षमतेला, वाहून न्यायच्या एकूण पाण्याच्या घनफळाने गुणले की पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारा एकूण वेळ मिळतो. “टॅंकरची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी नियोजन करताना, टॅंकरनी पाणी पोचवण्यासाठी उपलब्ध काळ, आणि आकडेमोड करून काढलेला पाणी पोचवण्यसाठी लागणारा काळ यांचे संतुलन रहावे म्हणून आम्ही ही चौकट संगणकीय दृष्टीने कार्यक्षम बनवली आहे. ह्यामुळे पाण्याचा स्रोत आणि ग्राहक यांच्यामधील इष्टतम मार्ग शोधले जातात,” असे प्रा. गुडी म्हणतात. एखाद्या ठिकाणी पाणी पोचवण्यासाठी कुठल्या आकाराचा टॅंकर योग्य आहे हे सुद्धा सदर चौकट सूचित करते.  

टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या व्यवस्थेसाठी थोड्या अवधीकरिता, म्हणजे काही तासांपासून, दोन आठवड्यांपर्यंत, नियोजन करण्यासाठी सदर चौकटीचा उपयोग करता येईल. पण्याच्या स्रोतापासून ग्राहकांपर्यंत पाणी पोचवणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यामुळे ही नियोजन चौकट पुरेशी लवचिक असायला हवी ज्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधील पाणी वितरण पद्धतीत असलेले फरक सामावून घेतले जातील. 

घरगुती वापर, व्यापारी संस्था, हॉस्पिटल, शाळा इ. निरनिराळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या गुणवत्तेच्या पाण्याची आवश्यकता असते. “गोड्या पाण्याच्या स्रोतांमधील पाणी टॅंकरमधेच क्लोरीन वापरून निर्जंतुकीकरण केले की घरगुती वापरासाठीही वापरता येते, पण भूजल मात्र हानिकारक जड धातूंनी व जैविक पदार्थांनी युक्त असू शकते. असे पाणी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या आधी त्यावर प्रक्रिया होणे आवश्यक असते,” असे सदर अभ्यासाच्या सहलखकांपैकी असलेल्या अभिलाषा माहेश्वरी सांगतात.   

प्रस्तुत पद्धतींच्या क्षमता सांगताना, सदर अभ्यासात सहभागी झालेले डॉ शमिक मिश्रा सांगतात, “पाण्यावर प्रक्रिया करायला किती वेळ लागतो, प्रक्रिया केल्यावर वापरण्यायोग्य पाणी किती मिळते, ह्या गोष्टींचा परिणाम पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावर होतो, त्यामुळे प्रक्रिया होण्यासाठी इष्टतम वेळ कुठली ह्याचे नियोजन करण्यासाठी ह्या चौकटीचा उपयोग करावा. शिवाय भूजल स्रोतापासून प्रक्रिया केंद्रापर्यंतच्या टॅंकरच्या फेऱ्यांचे नियोजनही सदर वेळापत्रकात करावे लागेल.”

सदर चौकटीचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी संशोधकांनी भारतीय शहरांमधील पाणी वापर व टॅंकरने केलेला पाणीपुरवठा ह्यांच्या प्रतिनिधिक माहितीसंचाचा उपयोग केला. पुर्वी केलेली सर्वेक्षणे, जलस्रोतांची उपलब्ध माहिती, पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने शहराची विभागणी, टॅंकरची पाणी वाहण्याची क्षमता व त्यांना पुरवठा करायला लागणारा वेळ ह्या जस्ट पानी वॉटर सप्लाय कंपनी नी उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे, संशोधकांनी सदर माहिती संच निर्माण केला.

उदाहरणादाखल घेतलेल्या शहराचे संशोधकांनी तीन भाग केले, ज्यात जलस्रोत, ग्राहकांचे प्रकार व प्रक्रिया केंद्रं यांचे वेगवेगळ्या प्रकारे संयोग होते. ग्राहकांची पाण्याची मागणी कुठला दिवस, दिवसाची कुठली वेळ ह्यावर अवलंबून असे. मागणीनिसार पाण्याच्या वितरणासाठी आठ दिवसाचे वेळापत्रक सदर चौकटीच्या आधारे तयार करण्यात आले. हे शहरातील पाण्याच्या टॅंकरच्या नियोजकांसाठी व वितरकांसाठी उपयुक्त साधन ठरेल.

चौकट वापरून केलेल्या नियोजनात आवश्यक तेव्हा संसाधने वाढवण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ, व्यापारी संस्थांना सकाळपेक्षा संध्याकाळी पाण्याची गरज जास्त असते. त्यामुळे गोड्या पाण्याच्या पुरवठ्याबरोबरच प्रक्रिया केंद्रांकडून टॅंकरने मागणी पूर्ण करण्याची व्यवस्था करणे चौकटीने सुचवले.

टॅंकरची उपलब्ध संख्या व त्यांचे प्रकार, प्रत्येक भागासाठी पुरवठा वेळापत्रक ठरवताना लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजे स्वच्छ पाणी वाहून नेण्यासाठी आतील बाजूस एपॉक्सी कोटिंग असलेले टॅंकरच वापरणे योग्य आहे. तसेच अरुंद रस्ते असलेल्या भागांत फक्त लहान आकाराच्या टॅंकरनीच पाणी पुरवले जाऊ शकते. प्रस्तावित चौकटीच्या आधारे नियोजन करताना, चौकटीने वाहतुकीचा खर्च कमीतकमी राहील अश्या रीतीने, मागणी प्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीच्या टॅंकरची निवड केली. पुरवठा वेळेत व्हावा म्हणून जास्तीचे टॅंकर मागवावे अशी सूचनाही चौकटीने केली.

दोन जलशुद्धीकरण केंद्रांपैकी एक बंद पडल्यास काय होईल हे ही संशोधकांनी तपासले. चौकटीने सदर स्थिती ओळखून, त्याप्रमाणे पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी दुसऱ्या केंद्राच्या कामकाजाचे इष्टतमीकरण केले.  

अती प्रमाणात भूजल काढल्यामुळे पाण्याची पातळी कमी होऊ नये ह्याचीही काळजी संशोधकांनी घेतली आहे. जमिनीतून पाणी उपसताना भूजल बोर्डाने सूचित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी पाणी काढले जावे, ह्याकरिता संशोधकांनी चौकटीमध्ये एका प्राचलाचा समावेश केला आहे. 

शहराच्या विशिष्ट गरजांप्रमाणे नगर राचनाकारांना चौकट सानुकुलित करता यावी म्हणून संशोधक एक सॉफ्टवेअरही विकसित करत आहेत. बेंगळुरू मध्ये पाण्याचा दर्जा ठरवण्यासाठी पाण्याचा पीएच, त्यातील क्लोरीन, आर्सेनिक आणि फ्लोराईडचे  प्रमाण, असे विविध प्राचल मोजण्यासाठी टॅंकरना लोटस सेन्सर बसवण्याची गटाची योजना आहे. होरायझन २०२० कार्यक्रमाअंतर्गत इयू-इंडिया वॉटर को-ऑपरेशन प्रोग्रामचा भाग म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी व भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या सहयोगाने इकोल पॉलिटेक्निक, पॅरिस टॅंकरसाठी लोटस सेन्सर पुरवणार आहेत.

“सेन्सर चा उपयोग करून नोंदवलेल्या माहितीच्या आधारे जलप्रक्रिया प्रकल्प व टॅंकर, ह्या दोन्हीच्या क्लोरीन निर्जंतुकीकरणाचे कार्यमान सॉप्टवेअर प्लॅटफॉर्म वापरून तपासता येईल,” असे प्रतिपादन सदर अभ्यासाचे भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी येथील सहयोगी, डॉ सेंथिलमुरुगन यांनी केले. पुरवलेल्या पाण्याचा दर्जा निर्दिष्ट दर्जाएवढा राहील ह्याची खात्री करता येईल.

हे सॉफ्टवेअर पुरवठा करणाऱ्यांना व ग्राहकांनाही उपलब्ध होईल. “ग्राहकांच्या दृष्टीने पाणीपुरवठ्यात पारदर्शकता राहील. उदाहरणार्थ टॅंकरची ऑर्डर दिली असता ती कुठल्या टप्प्यात आहे हे त्यांना बघता येईल व पाण्याच्या दर्जाचीही माहिती मिळेल,” अशी माहिती प्रा गुडी यांनी दिली. “एकात्मीकृत सॉफ्टवेअर चे प्रात्यक्षिक, युरेका फोर्ब्स व जस्ट पानी ह्या आमच्या औद्योगिक भागीदारांच्या सहयोगाने, मे २०२१ मध्ये बेंगळुरू मध्ये नियोजित केले आहे,” असे डॉ सेंथिलमुरुगन म्हणाले.