प्राण्यांच्या मार्गक्रमणाचे अनुकरण करणारा रोबोट वापरून आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी प्राणी अचूकपणे त्यांच्या घरी कसे पोहचतात याचा अभ्यास केला.

गर्दीचा (क्राऊडचा) वापर केल्याने स्थानाच्या अचूकतेमध्ये सुधारणा

Read time: 1 min
मुंबई
14 फेब्रुवारी 2019
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी सेलफोनच्या स्थानाची अचूकता सुधारण्यासाठी आसपासच्या सेलफोनकडून माहिती मिळवणारे ऍप्लिकेशन विकसित केले आहे

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी सेलफोनच्या स्थानाची अचूकता सुधारण्यासाठी आसपासच्या सेलफोनकडून माहिती मिळवणारे ऍप्लिकेशन विकसित केले आहे

समजा,  तुम्ही स्मार्टफोन ऍप वापरुन टॅक्सी बोलवली आणि ऍपमध्ये असे दिसते आहे की गाडी पाच मिनिटात पोहचेल. पाच मिनिटे उलटून गेली तरीही  ऍप मात्र पाच मिनिटेच दाखवत आहे! असे अनेकदा घडते, नाही का? वाहतूक व गर्दीला दोष देणे सोयिस्कर असले तरी कदाचित तुमच्या किंवा टॅक्सी चालकाच्या फोनमधील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम दोषी असू शकते का? होय, अनेकदा आसपास उंच इमारती असतील तर जीपीएसचा संकेत फोनपर्यन्त पोहचत नाही. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात जीपीएस उपलब्ध नसताना आसपासच्या फोनशी संपर्क साधून तुमच्या फोनचे स्थान निश्चित करण्याचा उपाय विकसित केला आहे.

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) ही उपग्रहावर आधारित दिशाज्ञान प्रणाली असून उपग्रहाकडून येणारे  दिशाज्ञान संकेत स्मार्टफोनमधील जीपीएस रिसीव्हरमध्ये प्राप्त होतात. पारंपारिक सेल्यूलर नेटवर्कमध्ये आसपास असलेला सेल टॉवर दोन फोनमधील कनेक्शन जोडतो पण जीपीएस प्रणालीत मात्र थेट उपग्रह संकेतांचा वापर होतो. सेलफोनच्या संकेताची तीव्रता व जवळच्या सेल टॉवर पासून अंतर यांचा परस्पर संबंध असल्याने सेल फोनचे नक्की स्थान शोधता येते पण जीपीएस प्रणालीच्या तुलनेत ही पद्धत अचूक नसते. मात्र, जीपीएसचे देखील गैरफायदे असतात. जीपीएस प्रणालीत विजेचा वापर जास्त असून दाट लोकसंख्या व उंच इमारती असलेल्या शहरांच्या मध्यभागी, गर्दी असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत व बोगद्यात उपग्रहाचा संकेत पोहचणे अवघड असते.

या अभ्यासात संशोधकांनी क्राऊडलॉक नावाचे क्राऊड-सोर्स करणारे नवीन ऍप्लिकेशन प्रस्तुत केले आहे. या ऍप्लिकेशनमध्ये सेल्यूलर तंत्रज्ञानाचा वापर करून मिळणार्‍या स्थानाच्या कमी अचूक माहितीचा सर्वोत्तम उपयोग केल्याने अधिक अचूक उत्तर मिळते. आसपासच्या अनेक फोनच्या स्थानांची माहिती एकत्रित केली की विविध फोनमधील चुका एकमेकांना रद्द करतात असे संशोधनात आढळून आले. 

अभ्यासाचे नेतृत्व करणारे भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील प्रा. भास्करन रामन म्हणतात, "क्राऊडलॉकची प्रमुख नवीन कल्पना म्हणजे ज्या गर्दीमुळे जीपीएस प्रणाली अविश्वसनीय ठरते त्याच 'गर्दीतून' माहिती गोळा करून स्थानाची अचूकता सुधारल्याने 'गर्दी' चक्क फायदेशीर ठरते." संशोधनाचे निष्कर्ष एसीएम ट्रान्झॅक्शन्स ऑन सेन्सर नेटवर्क्स (टीओएसएन), नावाच्या प्रतिष्ठित संगणकशास्त्र मासिकात प्रकाशित केले गेले.

फोनमध्ये क्राऊडलॉक इंस्टॉल केले असेल तर ऍप्लिकेशनमधील अल्गॉरिथ्म ५ मिटर अंतरावरच्या सर्व क्राऊडलॉक असलेल्या फोनची मूलभूत "स्थान फिंगरप्रिंट" माहिती गोळा करते. "स्थान फिंगरप्रिंट" मध्ये जवळच्या सेल टॉवरची माहिती, संकेत तीव्रता व जीपीएस निर्देशक अशी माहिती समाविष्ट असते. म्हणजेच क्राऊडलॉक  इंस्टॉल केलेले फोन "क्राऊडसेन्सिंग" मध्ये सहभागी होतात व एकमेकांच्या स्थानाची माहिती सुधारण्यात मदत करतात.

आता तुम्ही विचाराल की खाजगी माहितीच्या गोपनीयतेचे काय? क्राऊडलॉकच्या "स्थान फिंगरप्रिंट" मध्ये विशिष्ट फोन मालकाची कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती समाविष्ट नसते. नाव अथवा फोन नंबर सारखी खाजगी माहिती इतरांना दिली जात नाही. "स्थान फिंगरप्रिंट" दर काही सेकंदाने अश्राव्य रेडियो फ्रिक्वेन्सी वरून पाठवले जाते. हा मार्ग जलद व कमी ऊर्जा वापरणारा आहे. म्हणजेच वायफाय अथवा ब्लुटूथ सुरू न करता एका फोनला आसपासच्या फोनशी संपर्क साधता येतो.

संशोधकांनी दोन शहरात ऍप्लिकेशनची चाचणी करून प्रायोगिक माहिती गोळा केली. आकाराने मोठी, दाट लोकसंख्या असलेली व प्रवासाचे अनेक पर्याय असलेली मुंबई प्रयोगासाठी निवडली. प्रयोगासाठी दुसरे शहर लहान व सुनियोजित रस्त्यांचे जाळे असलेले चंडीगढ निवडले. विकसनशील देशात अनेक शहरात आढळणारे वाहन, हॉर्न व लोकांचे मोठे आवाज या दोन्ही प्रायोगिक शहरातही होते पण तरीही ऍप्लिकेशन व्यवस्थित काम करत असल्याचे संशोधकांना आढळले. ऍप्लिकेशनने परिगणित केलेल्या स्थानाच्या अचूकतेवर फोन कंपनी, सिम कार्ड कंपनी, किंवा फोनमध्ये इंटरनेटची उपस्थिती याचा कोणताही प्रभाव पडला नाही.   

"पारंपारिक सेलफोन डेटा वापरुन स्थानाची अचूकता ९७ मीटर असते. त्याच्या तुलनेत क्राऊडलॉकचा उपयोग केल्याने स्थानाची अचूकता ३३ मीटर आढळली. ज्या ठिकाणी जीपीएस महाग आहे किंवा उपलब्ध नाही तिथेही क्राऊड-लॉक उत्तम प्रकारे चालू शकते. स्थानाची अचूकता वापरणार्‍या इतर ऍपमध्ये क्राऊडलॉक ऍप्लिकेशनचा वापर करायचा असल्यास  त्याचे प्रतिकृती मॉड्यूल उपलब्ध आहे" असे भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संगणकशास्त्र व अभियांत्रिकी विभागातले पीएचडी विद्यार्थी व संशोधनाचे प्रमुख लेखक रवी भंडारी म्हणतात.

क्राऊडलॉक ऍप्लिकेशनचा दुसरा फायदा म्हणजे अचूक परिणाम मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात संगणक वापरुन माहितीचे विश्लेषण करण्याची आवश्यकता नसते. आसपासच्या २-४ फोन पैकी किमान एका फोनचा त्याच मार्गाने प्रवास झाला असेल तरीही क्राऊडलॉक ऍप्लिकेशन उत्तम परिणाम देते.

भारतात सार्वजनिक वाहतूकीत नेहमीच गर्दी असल्यामुळे कोणत्याही प्रवासात रोजचे प्रवासी सापडण्याची शक्यता खूप अधिक आहे. अशा परिस्थितीत क्राऊडलॉकची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

"ज्या परिस्थितीत सतत स्थानाची माहिती असणे आवश्यक असते, कमी ऊर्जा उपलब्ध असते व किंचित कमी अचूकता पर्याप्त असते तिथे क्राऊडलॉकचा वापर करणे शक्य आहे. उदाहरणार्थ जीपीएस उपलब्ध नसताना गच्च भरलेल्या ट्रेन व बसच्या आगमनाचा अंदाज. अजून एक उपयोग म्हणजे संपूर्ण शहरात चालणारे पर्यटन ऍप्लिकेशन - जिथे ऊर्जेचा वापर महत्त्वाचा असला तरीही जीपीएस सारख्या अचूकतेची गरज नसते. क्राऊडलॉकचा उपयोग केल्यास प्रत्यक्ष/आर्थिक लाभ होत असल्याचे दर्शविले तरच इतर प्रवाशांना देखील ऍप्लिकेशन वापरायला प्रोत्साहन मिळू शकेल", असे रवी यांचे मत आहे.