भारतीय वैज्ञानिक समुदायाला अभिमान वाटेल असा मोठा बौद्धिक वारसा मागे ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या कणभौतिकशास्रज्ञ

जमिनीखाली हजारो मीटर खोल सूक्ष्मजीव असल्याचा पुरावा वैज्ञानिकांना सापडला

खडकपुर
25 Jan 2019
जमिनीखाली हजारो मीटर खोल सूक्ष्मजीव असल्याचा पुरावा वैज्ञानिकांना सापडला

सूक्ष्मजीव अत्यंत लहान आकाराचे असतात, पण आपल्या कल्पनेपलीकडे असलेल्या ठिकाणीसुद्धा जगण्याची क्षमता त्यांच्यात असते - अगदी जमिनीखाली हजारो मीटर खोलवर सुद्धा! नुकतेच, भारतीय तंत्रज्ञान संस्था खडकपुर आणि बोरहोल जियोफिजिक्स रिसर्च लॅबोरेटरी कराड येथील संशोधकांना एका अभ्यासात पश्चिम भारतातील कोयना-वारणा क्षेत्रामधील खडकांच्या नमुन्यात सूक्ष्मजीव असल्याचा पुरावा सापडला आहे. हे जमिनीवर दिसणारे खडक नव्हे तर खोल खड्डे खणून काढलेले आहेत.

कोयना-वारणा हे भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळे भूकंपांचा अभ्यास करण्यासाठी हे क्षेत्र जणू एक प्रयोगशाळाच आहे. म्हणून भूविज्ञान मंत्रालय (एमओईएस) यांनी भूगर्भशास्त्र आणि भूकंपांचा अभ्यास करण्यासाठी इथे एक प्रकल्प सुरू केला आहे ज्यासाठी त्यांनी या क्षेत्रात अनेक खोल खड्डे खणले आहेत. हे खड्डे दख्खन ट्रॅप नावाचा ६५ दशलक्ष वर्ष जुना लावा प्रवाह आणि त्याखालील ग्रानाइट बेसमेंट थराच्या काही शेकडो मीटर पार जात सुमारे ४१२ ते १२५१ मीटर खोल आहेत.

सायंटिफीक रिपोर्ट्स या मासिकात प्रकाशित झालेल्या या अभ्यासाच्या संशोधकांनी वर नमूद खोल खड्ड्यांच्या तीन भागातून, म्हणजे दख्खन ट्रॅप, २५०० दशलक्ष जुने ग्रेनाइट बेसमेंट खडक आणि या दोन थरांच्या मधील भागातून,  खडकांचे नमुने गोळा केले. त्यांनी या नमून्यांवर भूरासायनिक आणि सूक्ष्मजैविक चाचण्या केल्या.

संशोधकांच्या मते, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खूप खोलवर असलेल्या परिपटल (क्रस्ट) प्रणालीच्या पर्यावरणाचा अभ्यास केला तर सूक्ष्मजीवांबद्दल असलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळतील. अशा प्रकारच्या अभ्यासाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले "अशा अभ्यासामुळे पृथ्वीच्या जैव-भू-रासायनिक प्रक्रिया, पृथ्वीवर आणि खरंतर इतर ग्रहांवरही जीवांची उत्क्रांती यात सूक्ष्मजीवांची काय भूमिका होती हे समजू शकेल."

भूरासायनिक विश्लेषण करण्यासाठी खडकांची पूड करून त्यातील उपस्थित मूलद्रव्ये संशोधकांनी मोजली. या खडकांतील सूक्ष्मजीवांची उपस्थिती आणि विविधता शोधून काढण्यासाठी संशोधकांनी नमुन्यातून डीएनए वेगळे केले आणि विविध जनुक प्रवर्धित केले. त्यांच्या विश्लेषणात आढळून आले की या नमुन्याच्या प्रत्येक ग्राममध्ये सूक्ष्मजीवांच्या सुमारे एक लाख पेशी होत्या! बहुतांश बॅक्टीरिया होते आणि काही अत्यंत कठीण पर्यावरणात पण जगू शकणारे 'आर्केया' होते.

अशा खडकात सच्छिद्रता कमी असल्यामुळे, तापमान व दाब मध्यम-ते-उच्च असल्यामुळे आणि जैव-कार्बन कमी असल्यामुळे इतक्या खोलवर जगणे सूक्ष्मजीवांसाठी अत्यंत कठीण असते म्हणून हा शोध आश्चर्यकारक आहे. संशोधक म्हणतात की अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात इतक्या सूक्ष्मजीवांची उत्क्रांती कशी झाली हे एक रहस्य आहे.

हे सूक्ष्मजीव इतके खोल कसे पोहचले याचे संभाव्य कारण सांगताना संशोधक म्हणाले, "भूसंरचनेत होणार्‍या बदलांमुळे भ्रंश आणि भंग निर्माण होतात ज्यातून पाणी वाहते. सूक्ष्मजीवांच्या पेशी या पाण्यातून पसरल्या असतील." या अभ्यासात असेही आढळून आले की या सूक्ष्मजीवांनी एकमेकांना जोडलेले जाळे निर्माण केले आणि पर्याप्त संसाधने उपलब्ध नसल्यामुळे एकमेकांचे चयापचयोत्पाद वापरले.

भूविज्ञान मंत्रालयाकडून आर्थिक मदत प्राप्त झालेल्या या अभ्यासात पहिल्यांदाच या भागात इतक्या खोलवर असणार्‍या सूक्ष्मजीवांच्या विविधतेचा अभ्यास करण्यात आला. यातील निष्कर्षांमुळे पुढील संशोधनासाठी अनेक मार्ग खुले झाले आहेत. या अभ्यासामुळे उपलब्ध होणार्‍या संधींबाबत बोलताना संशोधक म्हणाले "दख्खन ट्रॅप खालील भू-सूक्ष्मजीवशास्त्रा संबंधी हा पहिलाच अहवाल असल्यामुळे भूगर्भातील खोल अग्निज खडकांवर राहणार्‍या सूक्ष्मजीवांचे घटक आणि कार्य समजण्याची अभूतपूर्व संधी मिळाली आहे."

Marathi