भारतीय वैज्ञानिक समुदायाला अभिमान वाटेल असा मोठा बौद्धिक वारसा मागे ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या कणभौतिकशास्रज्ञ

कथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची !!!

तिरुअनंतपुरम
10 जून 2019
छायाचित्र क्रेडिट : विघ्नेश कामत

काही जातिमधील सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी यांमुळे त्यांना शिकाऱ्यांपासून बचाव होण्यास  मदत होते, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दिसून आले. 

झेब्र्याच्या शरिरावरील काळे पांढरे पट्टे आपले लक्ष वेधून घेतात, पण पट्टे असण्याचा प्रमुख उद्देश, झेब्र्याला भक्ष्य बनवणाऱ्या श्वापदांना गोंधळात टाकणे असतो, हे माहित आहे तुम्हाला? गतिमान भक्ष्याच्या गतीचा आणि दिशेचा अंदाज बांधणे भक्ष्याच्या शरीरावरील पट्ट्यांमुळे शिकार करणाऱ्या प्राण्याला अवघड जाते. ह्यालाच ‘गती दिपकता (मोशन डॅझल)’ असे म्हणतात. याच तंत्राचा उपयोग करत, पहिल्या महायुद्धात, टॉरपेडो (वरुणास्त्र) पासून युद्धनौकांचा बचाव करण्यासाठी, नौका काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांनी रंगविण्यात आल्या होत्या. सरड्यामधील गती दिपकतेचा (मोशन डॅझल इफेक्ट) अभ्यास भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, तिरुअनंतपुरम (आयआयएसईआर-टीव्हीएम) आणि तुर्कू विद्यापीठ, फिनलंड (युनिवर्सिटीऑफ तुर्कू) मधील संशोधकांनी केला व त्यावर आधारित लेखजर्नल ऑफ इव्होल्यूशनरी बायोलॉजी’ मध्ये प्रसिद्ध केला. अभ्यासात प्रथमच जिवंत प्राण्यांच्या केलेल्या प्रत्यक्ष निरिक्षणांचा उपयोग, ही घटना आणि उत्क्रांतीचे महत्व समजावून घेण्यासाठी केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि आयआयएसईआर- टीव्हीएम द्वारे या अभ्यासासाठी निधी देण्यात आला.

भारतात सापडणाऱ्या युट्रोपिस बिब्रोनी  या सरड्यांच्या शरीरावर उभे पट्टे असतात तर दक्षिण भारत आणि दक्षिणपूर्व आशिया मध्ये सापडणाऱ्या लिगोसोमा पंक्टेट  या सरड्यांच्या शरीरावर पट्टेही असतात आणि त्यांच्या शेपटीचा रंगही आकर्षक असतो. शरिरावरील पट्टे आणि शेपटीचा आकर्षक रंग या रचनेमुळे शिकार करणाऱ्या प्राण्याचे लक्ष सरड्याच्या शेपटीकडे वेधले जाऊन, तो शेपटीवर हल्ला करतो आणि सरड्याला त्याला चकवायची संधी मिळते.

“काही सरड्याच्या जातिंमध्ये शेपटी तुटून त्याजागी नवीन शेपटी येते, तसेच अंगावरील पट्ट्यांमुळे, त्याची गतिमान हालचाल अश्या तऱ्हेचा आभास निर्माण करते की शिकारी मुख्य शरीरा ऐवजी शेपटीवर हल्ला करतो”, असे या अभ्यासाचे प्रमुख संशोधक असलेले आयआयएसईआर-टीव्हीएम चे गोपाल मुरली म्हणतात.

अभ्यासाच्या सुरुवातीला संशोधकांनी सरड्याच्या शरिरावरील रंगछटा आणि पर्यावरणीय गुणधर्म यांच्यातील परस्पर संबंध याबद्दलची गृहीतकं विचारात घेतली. ही गृहितके दिपकता (शरीरावरील पट्टे) आणि लक्ष विचलित करण्यासाठी आकर्षक शेपटी (रंगीबेरंगी शेपटी) या सरड्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांवर आधारित होती. संशोधकांनी सुमारे १६०० भिन्न जातिच्या सरड्यांच्या ८००० फोटोंचे विश्लेषण करून या गृहितकांची परीक्षा केली.

युट्रोपिस बिब्रोनी  सारख्या जातिंमधील, शरीरावर पट्टे असलेल्या सरड्याच्या शरीराचे तापमान, इतर पट्टे नसलेल्या  सरड्यांच्या शरिराच्या तापमानापेक्षा जास्त असते असे संशोधकांच्या लक्षात आले. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित न करू शकणारे प्राणी म्हणजेच शीत रक्ताच्या प्राण्यांची गतिशीलता त्यांच्या शरीराच्या तापमानावर अवलंबून असते. शरीरावर उभे पट्टे असणाऱ्या आणि शरीराचे तापमान जास्त असणाऱ्या सरड्याची गतिशीलता अधिक असते त्यामुळे तत्परतेने तो शिकाऱ्याला चकवून पळून जाऊ शकतो.

“ह्यांचा परस्पर संबंध अपेक्षित आहे कारण प्राणी गतिमान असतानाच गती दिपकता (मोशन डॅझल) कार्यान्वित होते” असे मुरली सांगतात.

विशेष म्हणजे शरीरावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी ह्या दोन्ही गोष्टी दिवसा सक्रीय असणाऱ्या सरड्याच्या जाति मध्ये मोठ्या प्रमाणात आढळल्या, याचे कारण म्हणजे पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी रात्रीच्या वेळी दिसत नाहीत. त्यामुळे शरीरावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी, दिवसा सक्रीय असणाऱ्या जातिंमध्ये विकसित झाले असावेत, असे संशोधकांचे मत आहे.

सरड्याची शेपटी तोडण्याची क्षमता देखील याच्या बरोबरीने उत्क्रांत झाली असावी असे गृहीतक संशोधकांनी मांडले आहे. असे संरक्षण तंत्र सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साधारण २८०० लक्ष वर्षांच्या कालावधीत विकसित झाले. यालाच ‘स्वपुच्छविच्छेदन’ (कॉडल ऑटोटॉमी) असे संबोधले जाते. स्वपुच्छविच्छेदन हे तंत्र विकसित झाले नसते तर शिकाऱ्याचे लक्ष शेपटीकडे वळवण्याचा काहीही उपयोग झाला नसता. ह्या संकल्पनेची चाचणी केली असता सरड्यांचे शरीरावरील पट्टे, रंगीबेरंगी शेपटी आणि स्वपुच्छविच्छेदन एकमेकांबरोबरच विकसित झाले असल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले. तसेच शरीरावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी यात दृढ परस्पर संबंध आहे.

“आमचा असा तर्क आहे की शरीरावरील पट्टे, रंगीबेरंगी शेपटी आणि स्वपुच्छविच्छेदन ह्या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत,” असे मुरली सांगतात.

जिवंत प्राण्यांची निरीक्षणे या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांना पुष्टी देतात. अश्या प्रकारचे वर्तन जगातील जवळपास सर्व सरड्याच्या जातिंमध्ये दिसून आले. उदा. लिगोसोमा पंक्टेट  या सरड्यांमध्ये बाल्यावस्थेत शरीरावर उभे पट्टे आणि गर्द लाल रंगाची शेपटी असते. हा सरडा बऱ्याच पक्षी, साप आणि प्राण्यांचे भक्ष्य आहे. दिवसा सक्रीय असणाऱ्या ह्या सरड्यांमध्ये हल्ला झाल्यास शेपटी तोडण्याचा गुणधर्म आढळून येतो आणि त्यामुळे शिकाऱ्यापासून सुटका होण्यास त्याची  मदत होते. आपल्या शरीरावर झालेला हल्ला तो तोडलेल्या शेपटीकडे वळवतो. बंगाल मॉनिटर (वरानस बेंगलसिस) सरड्यांच्या शरीरावरील पट्टे तसेच रंगीबेरंगी शेपटी आढळत नाही, शिवाय शेपटी देखील तुटत नाही. हे सरडे आकाराने मोठे असल्याने त्यांचे नैसर्गिक शत्रू देखील कमी आहेत. त्यामुळे वरील संरक्षण तंत्र त्या जातिमध्ये विकसित झाले नाही.

आता कधीही झेब्रासारखे पट्टेवाला किंवा रंगीबेरंगी शेपटीवाला सरडा दिसला की ही शेपटीची मनोरंजक गोष्ट तुम्हाला नक्कीच आठवेल !!

Marathi