संशोधकांनी द्विमितीय पदार्थांचा वापर करून ट्रान्झिस्टर तयार केला आणि स्वायत्त यंत्रमानवांसाठी त्यावर आधारित अतिनिम्न ऊर्जाचालित कृत्रिम चेतापेशी सर्किट निर्माण केले.

‘मानव’ प्रकल्पांतर्गत मानवी शरीराचा नकाशा तयार करण्यास आता विद्यार्थी मदत करू शकतात

Read time: 1 min
पुणे
22 डिसेंबर 2020
‘मानव’ प्रकल्पांतर्गत मानवी शरीराचा नकाशा तयार करण्यास आता विद्यार्थी मदत करू शकतात

चित्र : प्रोजेक्ट मानव च्या फेसबुक पानावरून साभार

२०१९ मधे भारतीय सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे (आयसर पुणे), राष्ट्रीय पेशी संशोधन केंद्र, पुणे (एनसीसीएस, पुणे) व पर्सिस्टंट सिस्टिम्स पुणे यांच्या सहयोगाने ‘मानव - द ह्यूमन ऍटलास इनिशियेटिव’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात केली. भारतात प्रथमच असा प्रकल्प राबवण्यात येत आहे. वैज्ञानिक प्रकाशनांतून व सार्वजनिक विदासंचयातून (पब्लिक डेटाबेस) उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे, उती, पेशी व रेण्वीय स्तरावर मानवी शरीराचा संपूर्ण नकाशा निर्माण करण्याचे ह्या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. निरोगी व व्याधीग्रस्त असताना शरीरातील अवयव व उती कशा प्रकारे काम करतात ह्याचा अभ्यास करून मानवी शरीराची सकल समज प्राप्त करण्यासाठी ह्या नकाशाचा उपयोग होईल. हयामुळे मानवी शरीराबद्दल अद्याप माहीत नसलेल्या गोष्टी समजायला मदत होईल व सुधारित औषधे व उपचार शोधणे शक्य होईल.

प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२१ अखेर पूर्ण होईल. प्रकल्पाचा संघ ह्या टप्प्यात त्वचा ह्या अवयवासंबंधी माहिती गोळा करून एक समावेशक, वापरण्यास सोप्या अशा माहितीस्रोताच्या स्वरूपात उपलब्ध करून देईल. जनयोगदानावर आधारित असलेल्या ह्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना संधी आहे. वैज्ञानिक व वैद्यकीय समुदायाला उपयोगी असणारा विदासंचय (डेटाबेस) तयार करण्यात सहभागी होण्याची संधी आता विद्यार्थ्यांना मिळेलच, त्याचबरोबर वैज्ञानिक साहित्य वाचण्याचे व त्यातील आशय ग्रहण करण्याचे कौशल्यही त्यांना विकसित करता येणार आहे.

नवीन संशोधन बरेचदा पुर्वी झालेल्या कामावर उभारलेले असते, पण आधीच्या कामाबद्दलची माहिती व मजकूर वेगवेगळ्या शोधपत्रिकांतून प्रकाशित केलेल्या शोध लेखांमधे, परीक्षणांमध्ये  व विदासंचयांमध्ये विखुरलेले असतात. संशोधनाबद्दल लेख प्रसिद्ध करणाऱ्या प्रकाशनांची संख्या खूप आहे, व विज्ञान साहित्य प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातील माहिती संकलित व संचयित करावी लागते. वैज्ञानिक साहित्याचा अभ्यास करताना, संशोधक लेखातील महत्त्वाच्या भागांवर खुणा करून त्याबद्दल टीपा लिहून ठेवतात.  “संशोधकाला याचा उपयोग वेगवेगळ्या लेखांमधील माहिती व त्यांतील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी होतो. लेख ज्याबद्दल आहे त्या संशोधनातील उल्लेखनीय कार्यपद्धती व साधने समजून घेण्यासाठी होतो,” असे आयसर पुणे येथील प्राध्यापक नागराज बालसुब्रमणियन म्हणतात. ते मानव प्रकल्पाच्या आयसर पुणे येथील गटाचे नेतृत्व करत आहेत.  


मागील वर्षी पुणे विद्यापीठात झालेला संपर्क कार्यक्रम [फोटो सौजन्य : टीम मानव]

प्रकल्पासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याना व शिक्षकांना एक एक करून वैज्ञानिक लेख (पहिल्या टप्प्यात ‘त्वचा’ केंद्रस्थानी असलेले) नेमून दिले जातात. लेख वाचून सदस्य त्यावर टिपा अंकित करतात. सॉफ्टवेअर त्या टिपांची नोंद डेटाबेस मध्ये साठवून ठवते. ही संकलित माहिती नंतर संशोधकांना सहजपणे उपलब्ध होईल. विज्ञान विषयक साहित्यातून माहिती शोधून, संकलित करून त्याचा परस्परसंबंध लावण्यात संशोधकांचा जाणारा वेळ वाचविण्यास संकलित साहित्य मदत करेल. 

विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या टिपांचे द्विस्तरीय पुनर्विलोकन केले जाते. “विद्यार्थी सदस्यांबरोबरच आम्हाला परीक्षक व तज्ज्ञ परीक्षकांचीही आवश्यकता आहे. परीक्षक म्हणून योगदान देण्यासाठी आम्ही पीएचडी करत असणारे विद्यार्थी, पोस्टडॉक्टोरल फेलो, शास्त्रज्ञ, डॉक्टर व महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्या शोधात आहोत,” असे ह्या प्रकल्पाच्या व्यवस्थापक, अर्चना बेरी यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे १५००० विद्यार्थी, २५० शिक्षक, १६० परीक्षक व १४० तज्ज्ञांनी प्रकल्पासाठी सदस्यत्व नोंदणी केली आहे.

सदर सॉफ्टवेअर चा उपयोग करून, सदस्य टीपांना लेबल देऊन त्यांचे पूर्वनिर्धारित वर्गांमध्ये वर्गीकरण करू शकतात. अवयवाच्या रचनेशी, त्या अवयवावर परिणाम करणाऱ्या रोगांशी, त्यावर असलेल्या औषधांशी संबंधित किंवा त्या अवयवाच्या पेशीय क्रियांशी निगडीत मार्ग अथवा जनुके यांच्याशी संबंधित मजकूर असू शकतो. “ह्या पद्धतीने टिप्पणी केलेल्या मजकूरात एखाद्या विशिष्ट अवयवाशी किंवा ऊतीशी संबंधित विविध क्षेत्रांतील माहिती असते. म्हणजे समजा कुणी ‘स्किन फायब्रोब्लास्ट’ शोधले तर स्किन फायब्रोब्लास्टशी संबंधित सर्व माहितीची सूची त्यांना मिळेल. मग ह्यामध्ये फायब्रोब्लास्टच्या पुनरावृत्ती, टिकाव व स्थलांतरणासंबंधी माहितीचा समावेश असतो,” असे प्रा. नागराज म्हणतात.

मानव सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म तयार करताना मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर, व स्वत: विकसित केलेल्या साधनांचा उपयोग केला आहे. मानवचे सॉफ्टवेअर आवश्यकतेनुसार बदल करून, आणि इतर अनुप्रयोगांमध्ये सहज वापरता येईल असे आहे. सदस्यांनी नोंदवलेल्या टीपांचे परीक्षण करण्याची प्रणाली त्यात समाविष्ट केली आहे. १०० विद्यार्थी सहभागी झालेल्या एका कार्यशाळेत, संकल्पना सिद्ध करण्यासाठी सॉफ्टवेअरची गटाने चाचणी केली. ह्या चाचणीत अंकन करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना, माहिती गोळा करून विधीग्राह्य होते की नाही, ह्या गोष्टी तपासल्या. लेखांचे वर्गीकरण व विद्यार्थ्यांना लेख नेमून देणे ही कार्ये स्वयंचलित करणे हे  प्रकल्पाचे पुढचे पाऊल असेल.

“सविस्तर व उपयुक्त टिपा नोंदविणे हे मोठे काम असते. विषय मांडण्यासाठी लेखांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केला जातो व त्यात सापेक्षता येते. त्यामुळे टिपा नोंदविण्याचे काम आव्हानात्मकही असते. माहिती गोळा करणे, त्याची व्यवस्थित मांडणी करणे व ती प्रस्तुत करणे ह्या क्रिया करण्यासाठी मशीन लर्निंग व कृत्रिम विद्या (आर्टिफिशल इंटेलिजन्स) उपयोगात आणता येईल का, ह्याचाही अभ्यास मानव गट करत आहे,” अशी माहिती एनसीसीएस चे कृष्णशास्त्री यांनी दिली. “मशीन लर्निंग च्या आधारे स्वयंचलितपणे टिपा नोंदणी करण्याचे कार्य सॉफ्टवेअर मधे जोडण्याची सोय केली आहे, ” असे पर्सिस्टंट सिस्टिम्सच्या अनामिका कृष्णपाल यांनी सांगितले.


संपर्क कार्यक्रमाच्या अंतर्गत आयोजित केलेले वेबिनार [फोटो सौजन्य : टीम मानव]

मानव प्रकल्पाचा भाग म्हणून मानव चमूने अनेक संपर्क कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. ह्यात विद्यार्थ्याना वैज्ञानिक लेख कसे वाचावे याची ओळख करून दिली जाते. विदाविज्ञान (डेटा सायन्स) व त्याचा विशेषत: जीवशास्त्रात कसा उपयोग केला जातो ह्याच्याशी परिचय करून दिला जातो. “महाविद्यालये व विद्यापीठांत जाऊन कार्यशाळा घ्याव्यात अशी योजना होती. पण कोविड-१९ मुळे आम्ही आता वेबिनार आयोजित करत आहोत,” अशी माहिती नागराज यांनी दिली. “वैज्ञानिक साहित्य कसे वाचावे” ह्या विषयावर गटाने ७० वेबिनार आयोजित केेले व त्यात ७००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला. गटाने आयोजित केलेल्या विदाविज्ञान (डेटा सायन्स) वेबिनार श्रृंखलेमध्ये जगभरातील वक्ते आहेत. ह्यांची रेकॉर्डिंग मानवच्या यूट्यूब चॅनेल वर उपलब्ध आहेत व ती सर्वांना बघण्यास खुली आहेत. आतापर्यंत झालेल्या १२ अशा वेबिनार ला देशभरातून ४०००हून अधिक विद्यार्थी उपस्थित राहिले आहेत. 

“महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांपर्यांत पोहचून मानव प्रकल्प काय साध्य करू इच्छितो हे त्यांना समजावून सांगणे हे आमचे  सध्याचे कार्य आहे,” असे नागराज म्हणाले. हा विदासंचय आणखी वाढवण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील व्यक्ती, संशोधक, वैद्यकीय व औषधीनिर्माण क्षेत्रातील व्यक्ती यांना समाविष्ट करण्याची त्यांची योजना आहे. गोळा केलेली माहिती सहज वापरता येणाऱ्या, व वेगवेगळ्या रीतीने माहितीचे संयोजन करण्याचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या आकर्षक यूजर इंटरफेस द्वारे उपलब्ध करून देण्याचा गटाचा विचार आहे.