तारा ॲपद्वारे देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये घेतल्या गेलेल्या वाचनाच्या चाचण्यांमध्ये ७ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग.

मदुराईमधील ऐतिहासिक पाणलोट पद्धत धोरणाअभावी दुरावस्थेत

Read time: 1 min
मदुराई
10 फेब्रुवारी 2022
मदुराईमधील ऐतिहासिक पाणलोट पद्धत धोरणाअभावी दुरावस्थेत

वंडियूर तलाव : शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाची नितांत गरज (छायाचित्र श्रेय: अभ्यासाचे लेखक)

तामिळनाडूमधील मदुराई शहर अर्धशुष्क प्रदेशात वसलेले आहे. शहराला पाणी पुरवणारे स्रोत मोजकेच आहेत आणि पाऊस देखील अनियमित आहे. ऐतिहासिक काळापासून येथे नैसर्गिकरित्या पाणी साठवणारे आपापसात जोडलेले पाण्याचे तलाव वापरात आहेत. वंडियूर उतरंड तलाव प्रणाली (वंडियूर टँक कॅस्केड सिस्टम) अथवा व्हीटीसीएस या नावाने ते ओळखले जातात. परंतु, मागील काही वर्षात जमिनीच्या वापरात होणाऱ्या बदलांमुळे शहराला वरचेवर दुष्काळी स्थितीला आणि तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मदुराईमधून वैगई नदीची एक उपनदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. या प्रवाहाच्या मार्गात शहराच्या परिसरात भौगोलिक उंचवटे आणि सखल भाग येतात. त्यामुळे उपनदीचे पाणी वैगई नदीला मिळायच्या आधी आपोआप अवतीभवतीच्या सखल भागात जाऊन साठते.

सतराव्या शतकातील शासकांनी या भौगोलिक जडणघडणीचा उपयोग करून उपनदीचे पाणी वाहून येणाऱ्या भागांत ते साठविण्याकरिता आठ मोठे तलाव बांधले. हे तलाव उतारावर वरपासून खालच्या दिशेने बांधले गेले. तलावांच्या उतरंडीमुळे, उपनदीचे पाणी वैगई नदीपर्यंत पोहोचायच्या आधी आपोआप एका पाठोपाठ एक तलाव भरत पुढे जाते. या तलावशृंखलेला वंडियूर उतरंड तलाव प्रणाली (वंडियूर टँक कॅस्केड सिस्टम) अथवा व्हीटीसीएस असे म्हणले जाते.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी व्हीटीसीएसचे व्यापक सर्वेक्षण केले. त्यांचा अभ्यास एसएन अप्लाइड सायंसेस. मध्ये प्रकाशित झाला आहे. वंडियूरची तलाव पद्धत इतिहासातील एक महत्वाची रचना आहे. उत्तम रचना असूनही आज दुर्लक्षित असल्याने तिला उतरती कळा लागली आहे असे सदर अभ्यासातील लेखक म्हणतात. या रचनेचा सदुपयोग व देखभाल करण्यासाठी लागणाऱ्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा व शासकीय धोरणाचा अभाव त्यांना दिसून आला. झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाचा देखील वंडियूरच्या पारंपारिक पाणीपुरवठा पद्धतीवर परिणाम होताना दिसत आहे असे त्यांचे निरीक्षण आहे.

“सर्वसाधारणपणे तलाव भरायला नदीचे पाणी काही अंशी तलावाच्या दिशेने वळवून घ्यावे लागते. परंतु, या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे व्हीटीसीएस अंतर्गत असलेले तलाव पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाच्या मार्गातच तयार केलेले आहेत. शिवाय हे आठ तलाव एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे पाण्याच्या वाटेत आधी येणारा तलाव भरल्याशिवाय उपनदीचे पाणी पुढे जात नाही,” असे सेंटर फॉर टेक्नॉलॉजी आल्टरनेटीव्स फॉर रुरल एरियाज अथवा सितारा (CTARA) येथील डॉ. पेन्नन चिन्नसामी म्हणाले. त्यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या गटाने व्हीटीसीएसचा अभ्यास केला.

शिवाय व्हीटीसीएस तलाव पाणलोट क्षेत्राचे देखील काम करत होते. त्यामुळे भूजल साठे व विहिरींना देखील व्हीटीसीएसमार्गे पाणी पुरवठा होत असे ज्यामुळे लोकांना विविध प्रकारच्या वापरासाठी पाणी मिळत असे.

वंडियूर उतरंड तलाव पद्धतीची रेखाकृती (श्रेय: अभ्यासाचे लेखक)

संशोधकांनी तलाव प्रणालीची सद्यस्थिती तपासण्यासाठी तेथील जल संतुलनाचा अभ्यास केला. जल-संतुलन किंवा वॉटर बॅलन्स तत्वाच्या नियमानुसार, एखाद्या जलसाठ्यामध्ये किंवा क्षेत्रामध्ये येणारे पाणी हे त्यातून बाहेर पडणारे पाणी व साठ्यामध्ये काळानुरूप होणारे बदल यांच्या समप्रमाणात असते. जलविज्ञान शास्त्रामध्ये हा नियम पाणी पुरवठा, पाणी टंचाई, सिंचन यांचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातो. तलाव प्रणालीसाठी महत्वाचे असलेले इतर घटक जसे की पाऊस व नदीमुळे जमा होणारे पाणी, तलावांचे घनफळ आणि या परिसराची पाण्याची मागणी यांची देखील संशोधकांनी तपासणी केली. मानवी क्रियांमुळे आणि शहरीकरणामुळे गेल्या दोन दशकात झालेला फरकही त्यांनी विचारात घेतला. या मूल्यमापनासाठी संशोधकांनी या क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन व्यापक प्रमाणात निरीक्षण व अभ्यास केला तसेच गूगल अर्थ तर्फे उपलब्ध असलेल्या नकाशांच्या रिमोट सेन्सिंग (दूरस्थ संवेदन) डेटाबेसचा वापर केला.

व्हीटीसीएस दुरावस्थेत असून या प्रणालीला योग्य दुरुस्ती व व्यवस्थापनाची नितांत गरज आहे असे मत अभ्यासाचे लेखक व धन फाउंडेशन एनजीओ(डेव्हलपमेंट ऑफ ह्युमेन ॲक्शन- DHAN) यांसारख्या स्थानिक सहयोगी संस्थांनी मांडले. शिवाय वर नमूद केलेले बाह्य घटक, जसे की वाढते शहरीकरण, तलावांच्या साठवण क्षमतेवर मोठा दुष्परिणाम करतात व त्यामुळे या भागातील उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे असेही त्यांनी निदर्शनास आणले.

पूर्वी जेव्हा हे तलाव अस्तित्वात आले तेव्हा या परिसराचे शहरी भाग व ग्रामीण भाग असे विभाजन झालेले नव्हते. कोणतीही औपचारिक पाणलोट पद्धत आखलेली नसून देखील पूर्वीचे राजे तेव्हाच्या वंडियूर तलावांचे नियोजन चांगल्या रितीने करत असत आणि त्यामुळे मदुराई नगरात पुरेसे पाणी साठून वापरासाठी उपलब्ध रहात असे.

अलिकडच्या काळात मात्र जमिनीच्या वापरासंबंधातील धोरणे (लँड यूज, लँड कव्हर पॉलिसीज) बनवली गेली आणि जमिनीचे शहरी, निम-शहरी व ग्रामीण भाग असे विभाजन केले गेले. त्याप्रमाणे हे आठ तलाव भिन्न शासनाच्या आखत्यारीत आले. आता या संस्था आपापल्या क्षेत्राच्या गरजेनुसार स्वतंत्रपणे निर्णय घेतात आणि त्या निर्णयांमध्ये आपापसात समन्वय असतोच असे नाही. शिवाय, संपूर्ण व्हीटीसीएस जलप्रणाली एकत्र न धरता प्रत्येक तलाव एक स्वतंत्र घटक म्हणून धरला जात आहे. अशा स्थिती मध्ये एकमेकांना जोडलेल्या या तलावांचे व्यवस्थापन नीट होत नाही व संपूर्ण प्रणालीच कोलमडते आहे.

“पारंपारिक तलावांचे अस्तित्व आणि ते कसे काम करतात यामागील विज्ञानाबाबत कोणाला फारशी माहिती नाही. शिवाय यासंबंधी धोरण देखील नाही. त्यामुळे व्हीटीसीएस तलावांची संपूर्ण जबाबदारी घेणारे कोणी नाही आणि त्यांचे व्यवस्थापन अगदीच दुर्लक्षित राहिले आहे,” असे डॉ. चिन्नसामी यांनी सांगितले.

वरील मुद्द्यांखेरीज, जमिनीच्या वापरात झालेला बदल, बांधकाम आणि संबंधित कामे व प्रचंड शेती यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते व हा मातीचा गाळ तलावांच्या तळाशी साठत जातो. परिणामी, तलावांची पाणी साठवण क्षमता घटते. तलावांमध्ये काळानुरूप सुधारणा न झाल्याने आणि धड व्यवस्थापन नसल्याने मदुराई शहराचे जल-संतुलन वेगाने बिघडत आहे असे डॉ. चिन्नसामी यांचे म्हणणे आहे.

यानंतर संशोधकांनी पाण्याचे बजेट तपासण्यासाठी संबंधित घटकांचे अंदाज मांडले. पाण्याचे बजेट करणे हे बऱ्याच प्रमाणात जमाखर्च मांडण्यासारखे आहे, ज्यात पाण्याची प्राप्ती आणि व्यय यांचा ताळमेळ बसवतात. भूजल साठा भरण आणि त्याचा वापर यामध्ये परस्पर संतुलन असेल तरच भूजल पातळी टिकून राहू शकते. भूपृष्ठावरून पाणी वाहून जाणे, पाण्याची वाफ होणे, जलपर्णींनी पाणी उत्सर्जीत करणे किंवा पाणी चोरी अशा कारणांमुळे पाणी वाया जाणे नियंत्रित करून हे संतुलन साध्य करता येऊ शकते. अतिरिक्त साठवणूक करण्याची सोय केली तर भूजल पुनर्भरण पुष्कळ सुधारते.

याशिवाय संशोधकांनी मागील २० वर्षात वरील घटकांमध्ये झालेल्या बदलांचे विश्लेषण केले. शहरीकरणामध्ये ३००% वाढ झालेली त्यांना आढळली आणि त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील ४०% पाणी वाहून वाया गेले असे दिसून आले. हा अपव्यय रोखायला व भूजल पातळी वाढवायला जमिनीवर शेती होत असेल तर मदत होते, पण एकंदरित शेतजमीन देखील कमी झालेली दिसली. गेल्या २० वर्षात या भागातील सरासरी पर्जन्यमान (९३१ मिलीमिटर) खरेतर कमी झालेले नव्हते. तरीही, तलावांचा वापर नीट न झाल्याने पावसाचे बरेच पाणी वाहून जाऊन वाया गेले.

“हवामानातील विषमतेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यास उतरंड पद्धतीचे तलाव मदत करू शकतात. विशेषत: पूराच्या वेळी पाणी साठवता येऊ शकते आणि ते भविष्यातील दुष्काळी स्थितीच्या वेळी कामी येईल,” असे डॉ. चिन्नसामी यांनी सांगितले. परंतु सध्याच्या धोरणांकडे बघता, तलावांचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत अवघड काम आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

संशोधकांनी त्वरित अमलात आणता येऊ शकतील असे काही प्रतिबंधक उपाय देखील सुचवले. यात तलावांच्या तळातील गाळ काढून साफ करणे, जलपर्णी काढून टाकणे आणि तलावांच्या बाजूने असलेले बांध मजबूत करणे या उपायांचा समावेश आहे. धन फाउंडेशन ही एनजीओ संस्था पुढाकार घेऊन सरकारी व खाजगी सहकार तत्वावर (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेत आहे. या कार्यात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील सेंटर फॉर टेक्नॉलॉजी आल्टरनेटीव्स फॉर रुरल एरियाज, म्हणजेच सितारा एक सक्रिय सहयोगी आहे.

“सर्वप्रथम व्हीटीसीएस तलावांना एकच प्रणाली मानणे गरजेचे आहे. त्याआधारे त्यांचे सर्वांगीण व्यवस्थापन केले तर या प्रणालीची कार्यक्षमता सुधारू शकते आणि नियोजन सुद्धा अधिक चांगले होऊ शकते,” असे डॉ. चिन्नसामी यांनी आवर्जून सांगितले. यासाठी शासकीय धोरणांमध्ये बदल करण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. व्हीटीसीएसमधील एखाद्याच तलावाचे प्रश्न स्वतंत्रपणे सोडवून संपूर्ण प्रणालीला काहीच उपयोग होणार नाही. उलट तलाव एकमेकांना जोडलेले असल्याने इतर तलावांवर त्याचा अनिष्ट परिणाम होईल आणि हे टाळले पाहिजे.