तारा ॲपद्वारे देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये घेतल्या गेलेल्या वाचनाच्या चाचण्यांमध्ये ७ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग.

मुंबईकर मॉलमध्ये कसे जाणे पसंत करतात ? - चालत, स्वतःच्या वाहनाने की सार्वजनिक वाहनाने?

Read time: 1 min
मुंबई
4 मार्च 2020
मुंबईकर मॉलमध्ये  कसे जाणे पसंत करतात ? - चालत, स्वतःच्या वाहनाने  की सार्वजनिक वाहनाने?

मुंबईत शॉपिंग मॉल जाण्यासाठी लोकांनी निवडलेल्या पर्यायांचे अभ्यासकांनी केले विश्लेषण

मुंबईत राहताय ना? मग तिथल्या उष्ण आणि दमट हवेमुळे घामाघूम होणे तुम्हाला अपरिचित नसणार. वातानुकूलित गाडी नसेल तर घामाने भिजलेल्या कपडयांनिशी खरेदीला जाण्याचा विचारही न केलेलाच बरा! दिवसेंदिवस मोठ्या संख्येने उभ्या राहत असलेल्या मुंबई शहरातील मॉलमध्ये जाण्यासाठी लोक वाहतुकीचे कुठले साधन वापरणे पसंत करतात याचे सर्वेक्षण भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी मुंबई) येथील संशोधकांनी अलिकडे एका अभ्यासात केला आहे. मुंबईकर मॉलमध्ये जाण्यासाठी वाहतुकीचे कोणते साधन वापरतात आणि त्यांचा हा निर्णय कोणत्या  कारणांवर अवलंबून असतो  याचा शोध संशोधकांनी घेतला आहे.

“पूर्वी खरेदीसाठी बाहेर पडणे क्वचितच होत असे. शहरांमधील बदललेले राहणीमान, व करमणुकीची साधने असलेल्या  शॉपिंग मॉलची मोठ्या प्रमाणात उपलब्धता यामुळे खरेदीला बाहेर पडणे वाढले आहे. म्हणून शॉपिंग मॉलमध्ये जाण्यासाठी वाहतुकीचे कोणते साधन वापरावे याचा निर्णय लोक कसा घेतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. वाहतूक नियोजक ह्या सर्व माहितीचा वापर करून प्रवाशांच्या गरजा भागवू शकतात,” असे ह्या अभ्यासाचे संशोधक, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील स्थापत्य विभागाचे प्राध्यापक गोपाळ पाटील सांगतात.

ह्या अभ्यासाचे निष्कर्ष ट्रान्सपोर्टेशन रिसर्च पार्ट एफ: ट्रॅफिक सायकॉलॉजी अँड बिहेव्हियर ह्या जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

त्यासाठी संशोधकांनी मुंबईतील ५ मॉलमध्ये ६५० लोकांचे सर्वेक्षण केले. यात त्यांनी व्यक्तीचे वय, लिंग, व्यवसाय, उत्पन्न, चारचाकी गाडी आहे किंवा नाही तसेच वाहतूक परवाना आहे किंवा नाही ही माहिती गोळा केली. तसेच लोक मॉलमध्ये कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी जाणे पसंत करतात, मॉलमध्ये जाण्याचे प्रयोजन, याबद्दल देखील माहिती गोळा केली. त्या शिवाय मॉलमध्ये जाण्यासाठी वापरले जाणारे वाहतुकीचे साधन, जाण्यास लागणारा वेळ, खर्च याबद्दलही माहिती घेतली. वरील सर्व घटकांचा लोकांच्या मॉलमध्ये येण्याच्या निर्णयावर काय परिणाम होतो, ह्याचा अभ्यास करण्यासाठी  त्यांनी २ सांख्यिकीय प्रतिमानांचा (मॉडेल) वापर केला.

अभ्यासातून संशोधकांना असे लक्षात आले की जवळपास निम्मे लोक मॉलमध्ये  खरेदीच्या हेतूने गेले होते. तर उर्वरित लोक चित्रपट पाहायला व व्हिडीओ गेम सारख्या करमणुकीमध्ये आरामात वेळ घालवायला गेले होते. स्वतःची चारचाकी घेऊन मॉलमध्ये जाणाऱ्यांपैकी साधारण ४० टक्के लोक खरेदीसाठी जातात असे निदर्शनास आले. यावरून असे दिसते की खरेदी करायला येणाऱ्या सधन लोकांकडे चारचाकी आहेत व ते ती वापरणे पसंत करतात.  करमणुकीसाठी मॉलमध्ये आलेल्या लोकांपैकी बऱ्याच जणांनी चालत येणे पसंद केले होते. सार्वजनिक वाहतुकीची साधने वापरून येणारे बहुतांश लोक मॉलमध्ये नोकरीसाठी येणारे कर्मचारी होते, त्यामुळे त्यांच्यासाठी ही फेरी खरेदी किंवा करमणुकीसाठी नसून कामावर जाण्यासाठी होती.

                      

आकृती 1: शॉपिंग मॉल्सला दिलेल्या भेटीचे विवरण [माहिती स्रोत ] 

वयानुसार वाहतुकीचे साधन वेगवेगळे असते असेही ह्या अभ्यासात दिसून आले. ५५ वर्षांपुढील लोकांनी चारचाकीने जाण्यास पसंती दर्शवली, तर १८ वर्षांखालील मुलामुलींनी रिक्षा किंवा चारचाकीने येणे पसंत केले. १८ ते ३० वर्ष वयोगटातील शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त लोकांनी दुचाकी किंवा सार्वजनिक वाहतूक साधने वापरलेली आढळली. वाढीव उत्पन्नामुळे चारचाकीचा वापर वाढल्याचेही अभ्यासात निष्पन्न झाले. तथापि, मुंबईत रिक्षांचा वापर लोकप्रिय असून सर्व उत्पन्न स्तरातील लोक रिक्षाने प्रवास करतात असे दिसून आले. वाहन परवाना असलेले लोक स्वतःची वाहने वापरून मॉलमध्ये आलेले आढळले. मॉलमधे येणाऱ्यांपैकी निम्म्या लोकांनी शनिवार-रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी  मॉलला भेट देण्यास पसंती दर्शवली. आठवड्याच्या सर्व दिवशी चारचाकी आणि रिक्षाचा वापर अधिक असला तरी, शनिवार आणि रविवारी सार्वजनिक वाहतुकीचा आणि दुचाकींचा वापर वाढलेला  दिसला.

सुमारे ५३% लोक केवळ करमणुकीसाठी मॉलला भेट देतात असेही लक्षात आले. यावरून असे दिसते की खरेदी व्यतिरिक्त मॉल करमणुकीचेही मुख्य ठिकाण आहे. विकसनशील देशांतील बऱ्याच महानगरांमध्ये हा कल दिसून येतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

मुंबईतील ७० टक्के दळणवळण सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी केले जाते. त्यातील फक्त २० टक्केच मॉल मध्ये जाण्यासाठी केले जाते. “सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांद्वारे प्रवास करणे कटकटीचे आणि बेभरवशाचे असल्याने बरेचजण स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. वाढीव उत्पन्नामुळे बहुतेक कुटुंबात दुचाकी वाहने असतात, तर बर्‍याच जणांना चारचाकी घेणे देखील परवडते,” असे प्राध्यापक गोपाळ पाटील सांगतात.

वरील अभ्यासामुळे, वाहतूक अधिकाऱ्यांना शॉपिंग मॉलच्या जवळपासची रहदारी आणि लोकांच्या वाहतुकीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यास मदत होईल. “ह्या अभ्यासामुळे शॉपिंग मॉलच्या मालकांना वाहतूक सुरळीत ठेवण्यास तसेच पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यास निश्चित उपयोग होऊ शकेल,” असे प्राध्यापक पाटील सांगतात. शॉपिंग मॉलच्या सभोवतालचे वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन कसे करावे याविषयीही त्यांनी वाहतूक अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत. “एक सूचना अशी की सर्व प्रमुख बसस्थानके आणि टर्मिनल मध्ये खरेदी आणि करमणूकीच्या आवश्यक सोयी सुविधांसह आधुनिक शॉपिंग मॉल उपलब्ध असावेत. शिवाय सर्व प्रमुख शॉपिंग मॉलमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना थेट प्रवेश असावा.”

मॉल मधील दुकानांत माल आणणे तसेच विकलेला माल लोकांच्या घरी पोचवणे ह्या मध्ये मालाची खूप ने-आण होत आहे असे आढळल्याने, संशोधकांनी भविष्यात शॉपिंग मॉलमध्ये होणाऱ्या माल वाहतुकीचा अभ्यास करण्याची योजना आखली आहे.

“नेमक्या किती मालाची ने-आण केली जाते हे मोजणे व दुकानदार व ग्राहक यांची वर्तनाची मिमांसा करणे आवश्यक असेल,” असे प्राध्यापक पाटील सांगतात.