तेल शुद्धीकरण कारखान्यातील अपशिष्ट पाणी वाळूमधून वाहिल्यानंतर त्यात प्रदूषकभक्षी जीवाणूंचे थर (बायोफिल्म) तयार झाले व या थराने पाण्यातील घातक संयुगे नष्ट केली.

नेत्रावतीतील बदलाची कारणे

Read time: 1 min
मुंबई
17 Jan 2019
नेत्रावती नदी Arjuncm3 , विकिमिडिया कॉमन्सवरून साभार

शहरीकरण आणि वाढत्या शेतीमुळे पाणी झिरपण्याच्या  संरचनेत आणि मृदेच्या हालचालीत बदल झाल्याचे आयआयटी मुंबई येथील अभ्यासातून निदर्शनास आले आहे. 

नैऋत्य मौसमी पावसामुळे दक्षिण कर्नाटकातील नेत्रावती किंवा बंटवाल या ऐतिहासिक नावाने ओळखल्या  जाणाऱ्या नदीला येणारा पूर ही आता नित्याचीच बाब झाली आहे. अजूनही पाण्याची पातळी वाढली की बंटवाल गावातल्या लोकांना १९७४ साली आलेल्या महाभयंकर पुराची आठवण होते. २०१३, २०१५ आणि आत्ता २०१८ मध्ये देखील असेच झाले. नदीच्या पाण्याच्या पातळीत होणारे हे बदल पावसातील बदलामुळेच आहेत की काय? भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांनी केलेल्या अभ्यासानुसार तसे नसून नेत्रावतीच्या खोऱ्यातील जमिनीचा ठराविक पद्धतीने होणारा वापर हे त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

नेत्रावतीच्या खोऱ्यात पावसाचे पाणी वाहून जाऊन जमिनीची धूप होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे शहरीकरण हे प्रमुख कारण असल्याचे एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासातून दिसते. अभ्यासकांनी १९७२ पासूनचे  भूतकाळातील पाच कालखंड आणि २०३० मधील एका परिस्थितीचा अंदाज बांधून त्याचे विश्लेषण केले. त्यासाठी त्यांनी मृदा आणि पाणी मूल्यमापन साधन (सॉईल अँड वॉटर असेसमेंट टूल - SWAT) वापरले. या संशोधनाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांचे आर्थिक सहाय्य लाभले.

पश्चिम घाटात उगम पावणारी नेत्रावती नदी ही मंगळूर आणि बंटवाल शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. “नेत्रावतीच्या खोऱ्यात सुमारे १.२ दशलक्ष लोक राहतात. २०३० सालापर्यंत हा आकडा दुपटीहून अधिक होईल असा अंदाज आहे. शेतीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता यावे आणि पाण्याचे स्रोत व्यवस्थित सांभाळता यावेत यासाठी भविष्यातील बदलांचा अभ्यास आवश्यक आहे.” असे आयआयटी मुंबई येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक एल्डो टी. आय. सांगतात. ते वरील शोधनिबंधाचे लेखक आहेत.

पाण्याच्या आजूबाजूच्या जमिनीचा वापर कशासाठी होतो आणि त्या जमिनीवर काय आहे (जमिनीवरचे आच्छादन) या दोन गोष्टींवर पाण्याची उपलब्धता ठरते. जमिनीच्या वापरात किंवा जमिनीवरच्या आच्छादनात कोणताही बदल झाला तर त्या प्रदेशातील झाडांचे आवरण, काँक्रीटचा भाग, उंचसखल भाग या गोष्टींवर परिणाम होतो. त्याचा परिणाम पावसाच्या पाण्याचा निचरा होणे आणि पाण्याचा प्रवाह यावर होतो. उदाहरणार्थ, वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याला प्रतिबंध करणाऱ्या काँक्रीटच्या आवरणात वाढ होते. त्यामुळे पाणी चटकन वाहून जाते आणि जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होते. अशारितीने पिण्यासाठी, शेतीसाठी आणि इतर कामांसाठी जमिनीत झिरपलेल्या पाण्यावर अवलंबून असलेल्या त्या भागातील लोकांना पाण्याची टंचाई जाणवते.

वरील अभ्यासानुसार, १९७२ साली ६० चौरस किमी असलेला शहरी भाग २०१२ साली २४० चौरस किमीपर्यंत म्हणजेच चौपटीने  वाढला आहे. २०३० पर्यंत हीच वाढ ३४० चौरस किमीपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भरघोस वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पूर येण्याचा धोका वाढतो, जमिनीत झिरपलेल्या पाण्याची उपलब्धता कमी होते आणि जमिनीची धूप झाल्याने शेतीची उत्पादकता कमी होते.

वरील अभ्यासातून असेही निरीक्षण मांडण्यात आले आहे की, नदीच्या खोऱ्याच्या गुणधर्मात झालेल्या बदलांचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतीतील वाढ हे आहे. १९७२ पासून २०१२ पर्यंत शेतीचा प्रदेश सुमारे १५% वाढला आहे. २०३० पर्यंत त्यात २४% वाढ झालेली असेल असा अंदाज आहे. याउलट, जंगले कमी होत चाललेली असून वर सांगितलेल्या काळात १८% जंगलतोड झालेली आहे. २०३० पर्यंत जंगले आणखी २६% ने कमी होतील असे अनुमान या अभ्यासातून काढण्यात आले आहे.

“नदीच्या खोऱ्याच्या खालच्या बाजूला, मंगळूर शहराच्या आसपास शहरीकरण अधिक आहे. पूर्व भागात आणि खोऱ्याच्या खालच्या बाजूला नदीच्या काठाने असणाऱ्या प्रदेशातील शेतीत सर्वाधिक बदल झालेले दिसून येतात. शहरी भागात झालेल्या बदलांचे परिणाम २०३० पर्यंत दिसत राहतील असा अंदाज आहे.” वरील अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांबद्द्ल बोलताना प्राध्यापक एल्डो सांगतात.

पाण्याच्या टंचाईचा धोका उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अशावेळेस, वरील शोधाच्या निष्कर्षांचा उपयोग नदीखोऱ्यातील पाण्याचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने करण्यासाठी होईल असे संशोधकांना वाटते. त्यांनी त्या दृष्टीने काही उपाय सुचवले आहेत. त्यात जमिनीचा वापर व जमिनीचे आच्छादन यातील बदलांमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी वनीकरण करण्यावर भर दिला आहे.

प्राध्यापक एल्डो म्हणतात, “मंगळूर, बंटवाल आणि पुत्तूर भागात येत्या काळात शेतीत आणि शहरीकरणात जास्तीत जास्त वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच नेत्रावती खोऱ्यातील कमी लोकसंख्येच्या प्रदेशातील पाणीटंचाई आणि गुणवत्तेच्या प्रश्नांचा सामना करणे आवश्यक आहे.”

वरील शोधनिबंधात सांगितलेल्या पद्धती वापरून इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाण्याचे व्यवस्थापन करणे देखील शक्य आहे असे लेखकांचे म्हणणे आहे. ‘पश्चिम घाटातील नद्यांच्या खोऱ्यावर सध्या आणि भविष्यातदेखील कशाचा परिणाम सर्वात जास्त होतो? जमिनीच्या वापरातील बदलाचा का हवामानातील बदलाचा?’ या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न ते यानंतर करणार आहेत. या भागातील पाण्याच्या स्रोतांच्या व्यवस्थापनाची योग्य अशी योजना तयार करण्याचाही संशोधकांचा प्रयत्न आहे.