तारा ॲपद्वारे देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये घेतल्या गेलेल्या वाचनाच्या चाचण्यांमध्ये ७ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग.

न्यूट्रिनो

Read time: 1 min
Bengaluru
7 ऑगस्ट 2018

न्यूट्रिनो म्हणजे सब अॅटोमिक किंवा अवाणू कण. त्यांचा अभ्यास करणे किंवा माहिती मिळवणे तितके सोपे नाही. न्यूट्रिनो सृष्टीत सर्वत्र पुष्कळ प्रमाणात पसरलेले आहेत आणि दर सेकंदाला आपल्या शरीरातून अक्षरशः लाखोंच्या संख्येने ते ये-जा करत असतात !

“न्यूट्रिनो” याचा शब्दशः अर्थ आहे ‘लहान तटस्थ कण’. या कणांना ना वस्तुमान असते ना त्यावर काही विद्युत प्रभार असतो. ते जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. त्यांच्यातल्या आंतरक्रिया सौम्य न्यूक्लिय बलाच्या सहाय्याने होतात. हे बल कण जवळ असतानाच प्रभावी असते. सहसा न्यूट्रिनोची मॅटरबरोबर (वस्तूबरोबर) कोणतीही परस्परक्रिया होत नाही. एखादा न्यूट्रिनो अडवायचा असेल तर एक प्रकाशवर्ष एवढे अंतर व्यापणारा शिशाचा भलामोठा ठोकळा लागेल असा अंदाज आहे ! म्हणजे केवढा? तर अर्धा पद्म (ट्रिलियन = १०१२) किलोमीटर लांबीचा!

मग न्यूट्रिनो ओळखायचे कसे? १९३१ मध्ये वॉल्फगँग पॉली याने या कणांच्या अस्तित्त्वाबद्द्ल भाकीत केले आणि १९५९ साली हे कण प्रत्यक्षात सापडले. सध्या शास्त्रज्ञ न्यूट्रिनो आढळतात का ते तपासण्याचे विविध कल्पक मार्ग शोधून काढत आहेत. जपानमधला ‘सुपर-कमिओकांडे’ आणि दक्षिण ध्रुवावरचा ‘आईसक्यूब’ हे न्यूट्रिनो टेलिस्कोप हे लहानसे कण शोधून त्यांचा अभ्यास करण्यासाठी तयार केले आहेत.

बिगबँग, म्हणजेच महास्फोटाच्या वेळेस, अणूंच्याही आधी न्यूट्रिनो तयार झाले असा शास्त्रज्ञांचा सिद्धांत आहे. सर्व प्रकारच्या न्यूक्लीय अभिक्रियांमध्ये ते कायम आढळतात. मग ही अभिक्रिया आपल्या शहरांना विद्युतपुरवठा करणारी  असो किंवा आकाशातल्या ताऱ्यांना प्रकाश देणारी ! प्रकाशाची जशी मॅटरबरोबर परस्पर-क्रिया घडून येते तशी न्यूट्रिनोची घडत नाही. म्हणूनच अचानक न्यूट्रिनोंचा स्फोट झालेला आढळला तर तेथे सुपरनोव्हा (मृत तारा) असल्याचा इशारा मिळू शकतो. अशा न्यूट्रिनो स्फोटांमुळे खगोलशास्त्रज्ञांना अगोदरच इशारा मिळतो आणि सुपरनोव्हामधून येणारा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्याआधी ते  निरीक्षण करण्यासाठी तयार राहू शकतात !

न्यूट्रिनोवर आणखी संशोधन केल्यानंतर गॅमा किरण, कृष्णविवरे आणि डार्क मॅटर अशा सृष्टीतील बऱ्याच गोष्टींचा आणि इतर घटनांचा उलगडा होईल.