हिवाळा सुरु होताच पंजाबमध्ये भातशेतीच्या हजारो हेक्टर परिसरात काढणी करणारी शेकडो यंत्रे घरघरायला लागतात. महाराष्ट्रामध्ये विदर्भातील खेड्यांमधून शेतकरी शुभ्र कापूस बाजारात घेऊन जाताना दिसू लागतात. फार वर्षांपूर्वी याच ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेली जंगले, गवताळ प्रदेश व दलदल असे आणि फिरत्या पद्धतीने विविध पिके घेतली जात. पण गेल्या पाच सहा दशकांमध्ये अशा अनेक नैसर्गिक भूप्रदेशाचे रूपांतर एक किंवा दोनच पिके घेतल्या जाणाऱ्या कायमच्या शेतांमध्ये झाले आहे. ह्या शेतीसाठी पाण्यासारखी संसाधने आणि कीटकनाशके व तणनाशके यांच्या रूपात रसायने मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
जगाची लोकसंख्या वाढत गेली तशी सघन शेती करण्याची ही पद्धत सगळीकडे वापरली जाऊ लागली. आज मात्र त्यामुळे शेतीवरच अरिष्ट आले आहे. जमीनीच्या अति वापरामुळे पिकांचे उत्पादन वाढू शकत नाही किंवा काही वेळा कमीही होते. शेतकऱ्यांना वाढत्या खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. तसेच जंगले, गवताळ प्रदेश, दलदल व इतर नैसर्गिक अधिवास युक्त सशक्त परिसंस्था जाऊन त्याजागी एकाच प्रकारचे पीक घेण्यात येत असलेली शेतजमीन आली आहे त्यमु जैवविविधता खूप कमी झाली आहे. या सर्वांचा शेतीवर परिणाम होतोय का आणि कश्या प्रकारे? हे शोधण्यासाठी जगातल्या ८० संस्थांमधल्या जवळजवळ १०० संशोधकांनी जमीनीच्या वापराचा शेतीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.
नैसर्गिक आणि कार्यक्षम पर्यावरण ‘परिसंस्था सेवा’ देते ज्यांचा आपल्याला बराच फायदा होतो. उदाहरणार्थ, मधमाशा व भुंगेरा हे परागीभवन करणारे कीटक आणि कीड व कीटकांचा नाश करणारे कोळी व मुंग्या शेतीला उपयोगी असतात. पण परिसरात जेव्हा एकाच तऱ्हेच्या वनस्पती असतात तेव्हा अशा कीटकांची जैवविविधता बदलते; त्यांची संख्या आणि संपन्नता रोडावते. कालांतराने कीटकांच्या समुदायाची संरचना बदलते. पूर्वी प्रबळ आणि भरपूर असलेले कीटक अल्पसंख्य झाले आहेत.
संशोधकांनी पूर्वी करण्यात आलेली जवळजवळ ९० संशोधने आणि २७ देशांतील १४८० शेते यांचे विश्लेषण करून कमी झालेल्या जैवविविधतेचा शेतीवर होणारा परिणाम अभ्यासला. बेंगाळुरू येथील बायोव्हर्सिटी इंटरनॅशनल आणि अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन् इकॉलॉजी अँड एनव्हायर्नमेंट (ATREE) हे सुद्धा या प्रकल्पाचा भाग होते.
“परिसंस्थेमधील जैवविविधता परिसंस्था सेवा कश्या टिकवून ठेवते या प्रश्नाची जागतिक स्तरावरील उत्तरे शोधण्यासाठी जगातील विविध ठिकाणांहून, विभागांतून आणि भूप्रदेशांतून माहिती गोळा करणे आवश्यक आहे,” असे सदर अभ्यासाचे एक लेखक, द इन्स्टिट्यूट फॉर अल्पाइन एन्व्हायर्नमेंट इन् इटलीचे डॉ. माटीओ डेनिस म्हणतात.
संशोधकांनी ह्या अभ्यासात पारंपारिक व सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या फळे व कडधान्ये इत्यादी जवळजवळ ३० पिकांची पाहणी केली. कीटक साधारण शेतांपासून एक किलोमीटरच्या परिघात फिरतात संशोधकांनी ह्या परिसराचा अभ्यास केला. अनेकविध पद्धती वापरून तेथील विविध जातिंची संपन्नता आणि विपुलता यांची माहिती मिळवली. फळे किंवा बिया ह्या स्वरूपात असलेल्या पिकांच्या उत्पादनाचे विश्लेषण करून परागीभवन करणारे कीटक किती प्रभावी आहेत आणि पिकाचे नुकसान मोजून नैसर्गिक शत्रूच्या उपस्थितीचा अंदाज घेतला.
संशोधकांना असे आढळले की सजीवांची संपन्नता, आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांच्या व कीडींच्या नैसर्गिक शत्रूंच्या जाति जितक्या जास्त असतील तितके परागीभवन आणि कीड नियंत्रण जास्त परिणामकारक होते. तसेच भूप्रदेशात एकाच तऱ्हेची लागवड असल्यास कीटक व शत्रू किड्यांची संपन्नता कमी होते, ज्यामुळे पिकाचे उत्पादन कमी होते. जातिंच्या संख्येचाही परिणाम असाच दिसला. ज्या शेतांमधे किटकनाशके वापरात होती तिथे कीडीच्या नैसर्गिक शत्रूंच्या संपन्नतेवर काहीच परिणाम दिसला नाही कारण कीटकनाशकांच्या वापरामुळे परिणाम झाकला गेला. यातून असेही दिसते की नैसर्गिक शत्रूंची विपुलता असल्यास, धोकादायक कीटकनाशके वापरल्यासारखाच परिणाम दिसतो, तोही शून्य खर्चात.
नैसर्गिक पर्यावरणामधे काही जाति प्रबळ असतात तर काही दुर्मिळ असतात. पण केवळ प्रबळ असलेल्या जाति परागीभवन व कीड नियंत्रण करायला पुरेश्या आहेत का हे आत्तापर्यत माहित नव्हते. ह्या अभ्यासात असे दिसून आले की एकाच किंवा कमी प्रकारच्या वनस्पती असलेल्या प्रदेशांत हा समतोल ढासळतो आणि काही विशेष पिकांचे परागीभवन करणाऱ्या दुर्मिळ जातींवर याचा दुष्परिणाम होतो. अनेक पिकांवर फिरणाऱ्या विपुल संख्येत असलेल्या कीटकांवर ह्याचा लक्षणीय परिणाम दिसला नाही.
शेतजमिनींमधे विविधता कशी आणता येईल?
“शेतात रानटी फुलांच्या ओळी लावणे किंवा बांधावर झाडे-झुडुपे लावणे अश्या सोप्या उपायांनीही विविधता आणता येते, जेणेकरून ह्या हितकारक जातींना रहायला जागा उपलब्ध होते. अशा उप-नैसर्गिक निवासस्थानांचे जाळे तयार करणे, ही पर्यावरणाचे जतन करणारी व उत्पादनही वाढवणारी शेती अधिक शाश्वत करण्याची पहिली पायरी असेल. असे करण्यासाठी शेतकरी, नागरिक, ना-नफा संस्था आणि सरकारी संस्था यांचा एकत्रित सहभाग गरजेचा आहे,” डॉ. डेनिस यांना वाटते.
शेतजमिनींमधली विविधता वाढवून आवश्यक जैवविविधता आणता येईल असे ह्या अभ्यासात दिसले, तरी संशोधकांना यांच्यातील परस्परसंबंध अधिक खोलात अभ्यासण्याची इच्छा आहे.
“शेताभोवती जैवविविधता वाढवण्याचा खर्च काय असेल, ह्या शेतकरयांसाठी महत्वाच्या असलेल्या प्रश्नाचा अभ्यास भविष्यातील अभ्यासांत करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये हा अभ्यास करायला हवा कारण खर्च व फायदे परिस्थितीनुरूप वेगळे असतील” डॉ. डेनिस म्हणतात.