आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने शिरेतून रक्त घेण्याआधी शिरेची जागा दर्शवणारे यंत्र तयार केले आहे.
रक्त घेण्यासाठी किंवा इंजेक्शन देण्यासाठी सुई टोचून घेण्याची कल्पना आपल्यापैकी बऱ्याच जणांना भीतीदायक वाटते, हो ना? त्यात योग्य ती नस न सापडल्याने अनेक वेळा टोचून घ्यायची वेळ आली तर अगदी दुःस्वप्नच! पण लवकरच ही अडचण दूर होणार आहे आणि त्याचे कारण आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील विद्यार्थी श्री. त्रिविक्रम अन्नामली यांनी तयार केलेले बक्षिसपात्र असे “शीर अन्वेषक” (व्हेन ट्रेसर) यंत्र.
हे शीर अन्वेषक यंत्र अगदी साधे, हलके, हातात धरता येण्याजोगे आहे. रक्त घेताना किंवा इंजेक्शन देताना शिरावेधन (व्हेनीपंक्चर) करतेवेळेस नस शोधण्यासाठी वैद्यक व्यवसायातील लोकांना या यंत्राचा उपयोग होऊ शकेल. हे निकट अवरक्त पंक्तिदर्शन (नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी) यावर आधारित आहे. या पद्धतीत एखाद्या पदार्थाची (या बाबतीत रक्ताची) आणि अवरक्त प्रारणाची (इन्फ्रारेड रेडिएशन) परस्परक्रिया समजून घेण्यासाठी अवरक्त प्रकाशाचा (इन्फ्रारेड लाईट) उपयोग केला जातो.
वैद्यकीय व्यावसायिकांना लहान मुलांच्या किंवा गडद वर्णाच्या रुग्णांच्या किंवा अतिस्थूल रुग्णांच्या नसा शोधणे कठीण जाते. त्यामुळे विनाकारण ठिकठिकाणी सुया टोचल्या जातात तसेच यात वेळही पुष्कळ जातो. नवीनच तयार करण्यात आलेला शीर अन्वेषक मात्र पहिल्याच प्रयत्नात नस शोधून देतो. अवरक्त प्रकाशाचे किरण विऑक्सीत (डीऑक्सीजनेट) झालेल्या रक्तावर पडतात तेव्हा ते विक्षेपित होतात आणि त्यामुळे शिरेची बाह्यरेखा दिसू लागते. ती बाह्यरेखा बघून सुई टोचता येणे शक्य होते.
सर्व वयोगटाच्या, वर्णाच्या आणि वजनाच्या रुग्णांसाठी हे यंत्र उत्तम प्रकारे वापरता येते. त्याची किंमत सुमारे २००० रुपये एवढी आहे. म्हणजेच लहान इस्पितळांना आणि दवाखान्यांना ते परवडण्यासारखे आहे. ते वापरण्यास सहजसोपे असून त्याची रचना कार्यक्षम वापरास अनुकूल अशी आहे. तसेच इस्पितळातील कर्मचाऱ्यांना हे यंत्र वापरण्यासाठी कमीतकमी प्रशिक्षणाची आवश्यकता भासते. यंत्र हलवणे सोपे असल्याने रक्तदान शिबिरे, आरोग्यतपासणीची शिबिरे इत्यादी ठिकाणी ते सहज घेऊन जाता येईल. या यंत्राचा चालू स्थितीतील नमुना उपलब्ध असून त्याच्या प्रायोगिक चाचण्या चालू आहेत.
या संशोधनाला प्राध्यापक पूर्बा जोशी आणि प्राध्यापक बी. के. चक्रवर्ती यांचे मार्गदर्शन तसेच आयआयटी मुंबई येथील डिझाईन इनोव्हेशन सेंटरचे पाठबळ मिळाले आहे. या संशोधनाला २०१८ सालचा गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन (जीवायटीआय) पुरस्कार मिळाला. १९ मार्च २०१८ रोजी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या समारंभात आदरणीय राष्ट्रपती श्रीराम नाथ कोविद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.