व्यक्तीच्या चालीतील बदलांचे गणितीय विश्लेषण करून त्यावरून पार्किन्सन आजाराचे पूर्वनिदान करण्यासाठी नवे संशोधन.

स्वयंपाकघरांतले रॉकेल तर क्षयरोगाच्या वाढीस कारणीभूत ठरत नाही ना?

Read time: 1 min
पुणे
18 एप्रिल 2019
स्वयंपाकघरांतले  रॉकेल तर क्षयरोगाच्या वाढीस कारणीभूत ठरत नाही ना?

शहरातील प्रदूषणाबाबत बातम्या सतत येत असतात, पण आपल्या घरातल्या तेवढ्याच धोकादायक प्रदूषणाकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. चुलीवर स्वयंपाक, धूम्रपान, केरोसीनच्या शेगड्यांचा वापर इ. क्रियांमुळे घरात प्रदूषण होते. जॉन हॉप्किन्स स्कूल ऑफ मेडिसिन, यूएसए आणि बायरमजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (बी. जे. मेडिकल कॉलेज), पुणे येथील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात घरातील वायू प्रदूषणाचा क्षयरोगावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा  प्रयत्न केला आहे. हा अभ्यास 'ऑक्युपेशनल अँड एन्वायरनमेंटल मेडिसिन' या मासिकात प्रकाशित झाला आहे.

दमा, श्वसनप्रणालीचे आजार आणि फुफ्फुसाचे आजार यासाठी चुलीचा, तंबाकूचा, जैव-इंधनाचा आणि घरात वापरण्यात येणार्‍या इतर इंधनाचा धूर कारणीभूत असतो. अजूनही देशातील ४ पैकी सुमारे ३ घरे स्वयंपाकासाठी जैव-इंधन वापरतात आणि देशात अंदाजे दहा कोटी धूम्रपान करणारे लोक आहेत, त्यामुळे या प्रदूषकांचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. याशिवाय जगात क्षयरोगाचे सर्वात जास्त, म्हणजे जवळजवळ २७.९ लाख रुग्ण, भारतात आहेत.

सार्वजनिक आरोग्य धोरण विकसित करण्याच्या प्रक्रियेवर वरील दोन्ही परिस्थितींचा होणारा लक्षणीय परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी या अभ्यासात केला आहे. संशोधक म्हणतात, "आमच्या माहितीनुसार PM2.5 याची संहत तीव्रता मोजून घरातील वायू प्रदूषण आणि क्षयरोग यातील परस्पर संबंध शोधणारा हा पहिलाच अभ्यास आहे." या अभ्यासासाठी जैव-तंत्रज्ञान विभाग (डीबीटी) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी आंशिक स्वरुपात आर्थिक मदत केली आहे.

संशोधकांनी अभ्यासासाठी क्षय रोग झालेले किंवा निरोगी असलेले १९२ लोक निवडले ज्यात प्रौढ आणि लहान मुले समाविष्ट होती. सर्व व्यक्तींचे कौटुंबिक उत्पन्न प्रति महिना रु १०००० पेक्षा कमी होते आणि त्यांची घरे सरासरी दोन खोल्याची होती. निवडलेल्या समूहापैकी अर्ध्या व्यक्तींच्या घरात स्वयंपाकासाठी लाकूड व केरोसीन वापरण्यात येत असे व कोणत्याही घरात वेगळे स्वयंपाकघर नव्हते. या व्यक्तींच्या घरांमध्ये संशोधकांनी सूक्ष्म, म्हणजे २.५ μमीटर (१ μमीटर = एक मीटरचा दशलक्षावा भाग) व्यासापेक्षा लहान कणांचे प्रमाण मोजले. स्वयंपाकाच्या इंधनाबरोबरच आसपास कचरा जाळणे, डासांच्या किंवा साध्या उदबत्त्या लावणे अश्या कारणांमुळेही प्रदूषण होते असे समोर आले. त्यानंतर संशोधकांनी संख्याशास्त्राच्या आधारावर प्रदूषक आणि क्षयरोग असलेले किंवा नसलेले लोक यांच्यातील परस्परसंबंधांचे विश्लेषण केले.

क्षयरोगाचे रोगी व निरोगी लोकांच्या घरात PM2.5  चे (सूक्ष्मकणांचे) प्रमाण जागतिक आरोग्य संस्थेने शिफारस केलेल्या पातळीपेक्षा पाच ते सात पट अधिक असल्याचे अभ्यासात आढळून आले. ह्यापूर्वी इतर देशात झालेल्या अनेक अभ्यासात प्रदूषणामुळे क्षयरोग होण्याची शक्यता वाढत असल्याचा निष्कर्ष काढला गेला असला तरीही वरील संशोधनात दोन्हीमध्ये लक्षणीय प्रमाणात संबंध आढळून आला नाही.

मात्र केरोसीनचा वापर वाढल्याने क्षयरोग वाढल्याचे दिसले. संशोधक म्हणतात, "घरातील प्रदूषण, त्यात मुख्यतः केरोसीन इंधनामुळे क्षयरोग होण्याची शक्यता असल्याचे पुरावे दिवसेंदिवस वाढत आहेत, व ह्या अभ्यासाच्या निष्कर्षामुळे त्यात भर पडते."

नेपाळमध्ये केलेल्या अजून एका अभ्यासात स्वयंपाकासाठी केरोसीन वापरले तर क्षयरोग होण्याची शक्यता एलपीजी वापरण्याच्या तुलनेत तिपटीने वाढत असल्याचे आढळून आले. ही शक्यता वाढण्याचे कारण समजावून सांगताना संशोधक म्हणाले, "केरोसीन जळताना निर्माण होणारे अतिसूक्ष्म कण फुफ्फुसांच्या संरक्षण प्रणालीला पार करून खोल वर जाऊ शकतात. यामुळे प्राण्यांमध्ये ऊतींचा दाह आणि ऑक्साइडीकर ताण आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) स्वयंपाकासाठी केरोसीन न वापरण्याचा सल्ला दिला आहे कारण केरोसीन जळताना नायट्रस ऑक्साइड, पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन आणि सल्फर डायऑक्साइड यांची पातळी डब्ल्यूएचओच्या मानक पातळीपेक्षा अधिक होऊ शकते व त्यामुळे श्वसनप्रणाली वर दुष्प्रभाव होऊ शकतो."

घरातील PM2.5 याची संहत तीव्रता आणि क्षयरोग याचा संख्याशास्त्रीय दृष्टीने लक्षणीय संबंध अभ्यासात आढळून आला नसला तरीही घरातील प्रदूषक आणि त्यांचे संभाव्य धोके याचा नीट अभ्यास व्हायला पाहिजे हे या अभ्यासामुळे स्थापित होते. संशोधक म्हणतात, "क्षयरोग नक्की कोणत्या घटकांमुळे होतो हे समजले तर क्षयरोग प्रतिबंधन कार्यक्रमाद्वारे क्षयरोग होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या लोकांचा  शोध घेता येईल."

सारांश: जॉन हॉप्किन्स स्कूल ऑफ मेडिसिन, यूएसए आणि बायरामजी जीजीभाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील संशोधकांनी घरातील वायू प्रदूषणाचा क्षयरोगावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे.