व्यक्तीच्या चालीतील बदलांचे गणितीय विश्लेषण करून त्यावरून पार्किन्सन आजाराचे पूर्वनिदान करण्यासाठी नवे संशोधन.

तरंगणारे प्लास्टिक: एक भीषण समस्या

Read time: 1 min
मुंबई
27 ऑगस्ट 2019
तरंगणारे प्लास्टिक: एक भीषण समस्या

तरंगणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा समुद्रातील भौतिक प्रक्रियांवर होणऱ्या परिणामांचा संशोधनातून सविस्तर अभ्यास

२०१७ सालच्या ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम वाइल्ड फोटोग्राफर ऑफ द इयर’ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील एक छायाचित्र जस्टिन हॉफमन यांचे 'सीवेज सर्फर' होते. हे छायाचित्र इंडोनेशियातील सुंबारा बेटाच्या पाण्यात, गुलाबी इयरबडच्या साहाय्याने तरंगणाऱ्या समुद्री घोडयाचे होते. छायाचित्र खूप सुंदर होते, पण त्याने जगाचे लक्ष वेधले एका गंभीर समस्येकडे - ती म्हणजे समुद्राचे प्रदूषण. भविष्यात आपल्यासमोर जे वाढून ठेवले असेल त्यबद्दल काळजी व दु:ख व्यक्त करत हॉफमन म्हणाले, “हा फोटो नसताच तर किती बरं झालं असतं.” आपण एकदाच वापरून निष्काळजीपणे फेकून दिलेल्या प्लास्टिकचा आघात हा फक्त समुद्री घोड्यांवर नव्हे, तर देवमासे, डॉल्फिन, कासव, मासे  यांच्यासोबतच समुद्री पक्ष्यांवरसुद्धा होत आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) आणि राष्ट्रीय ध्रुवीय व समुद्री संशोधन संस्था (नॅशनल सेंटर फॉर पोलर अ‍ॅन्ड ओशन रिसर्च, एनसीपीओआर), गोवा येथील संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासात असे म्हटले आहे की प्लास्टिकचे दुष्परिणामफक्त समुद्री जीवां पुरते मर्यादीत नाहीत. मरीन पोल्युशन बुलेटिन  या कालिकात प्रसिद्ध झालेला हा अभ्यास, तरंगणाऱ्या प्लास्टिकचा समुद्रातील भौतिक प्रक्रियांवर आणि हवामानावर कसा परिणाम होऊ शकतो हे दर्शवणारा पहिला अभ्यास आहे. या अभ्यासाला  विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने अंशतः अनुदान दिले.

"आज बरेचसे जलाशय हे प्लास्टिकने व्यापलेले आहेत. समुद्रकिनारी जावे तरकचऱ्याने व्यापलेले समुद्रकिनारे आपले स्वागत करतात त्यात प्रामुख्याने प्लास्टिकचा कचरा असतो," असे आयआयटी बॉम्बेचे संशोधक डॉ. रंजीत विष्णूराधन म्हणाले.  डॉ. विष्णूराधन यांनी आयआयटी बॉम्बे मधील प्रोफेसर टी. आय. एल्डो (प्रमुख अभ्यासक)  आणि एनसीपीओआर मधील टी. दिव्या डेव्हिड यांच्याबरोबर सदर संशोधनकेले. समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी काही प्रयत्न होत असले तरी, “जगभरातील समुद्रकिनाऱ्यांची सद्यःस्थिती ही भविष्यातील पर्यावरणावरील संकटाची चाहूल देतात" असे ते म्हणाले.

"समुद्रकिनार्‍यावरील प्लास्टिकच्या रंगाचे साधे निरीक्षण हे त्याचा संपूर्ण प्रवास सांगते. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा हा प्रामुख्याने पिवळ्या रंगाच्या विविध छटांच्या प्लास्टिकने बनलेला असतो. या रंगावरून कळते की हे प्लास्टिक थेट समुद्रकाठी फेकले गेले नसून, पाण्याच्या प्रवाहसोबत वाहून येत तेथे पडले असावे",  असे डॉ विष्णूराधन यांनी स्पष्ट केले. समुद्रातील ८०% कचरा हा प्लास्टिकपासून बनला आहे आणि अलिकडच्या काही वर्षांत, ७00 सागरी प्रजाती या प्लास्टिक प्रदूषणामुळे प्रभावित झाल्या आहेत, असा अंदाज आहे.

भूतकाळातील अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की महासागराच्या पृष्ठभागावर आढळणारे कोट्यावधी सूक्ष्मशैवाल आणि इतर सेंद्रिय आणि अजैविक कण पाण्याच्या तळाशी पोचणाऱ्या सूर्यकिरणांची तीव्रता कमी करतात किंवा ते पूर्णपणे थांबवतात. एकपेशीय शैवाल वनस्पती असलेल्या समुद्राचा पृष्ठभाग हा एकपेशीय वनस्पती नसलेल्या प्रदेशांपेक्षा जास्त उष्णता धरून ठेवतो. परिणामी, पृष्ठभागाचे पाणी गरम होते आणि त्याखालील पाणी थंड राहते. तापमानातील या फरकामुळे भिन्न खारटपणा, ऑक्सिजन आणि घनता असलेले पाण्याचे थर निर्माण होतात आणि पाण्याचे मिश्रण योग्य प्रकारे होत नाही.

या अभ्यासानुसार, संशोधकांचा असा युक्तिवाद आहे की समुद्रामधील तरंगणारे प्लॅस्टिक हे समुद्री सूक्ष्म प्लवक जीवांसारखेच आहे. “त्यांच्या विपुलतेमुळे, विस्तृत भौगोलिक विस्तारामुळे, प्रकाशतः सक्रियतेमुळे, आकार आणि प्रकारातील विविधतेमुळे, भौतिक बाबींत तरी प्लवक जीव समुद्रातील प्लास्टिक सारखेच असतात,”असे प्राध्यापक एल्डो स्पष्ट करतात.संशोधक म्हणतात की समुद्रातील  वाढते प्लास्टिक पृष्ठभागावर पोहोचणारे सौर प्रारण प्रभावित करू शकतात आणि त्याखाली असलेल्या जलस्तंभात अनेक बदल घडवू शकतात.

अशा बदलांचे परिणाम दूरगामी असतात. “हे (असे बदल) पाणी आणि हवेच्या आंतरपृष्ठावरील वायूची देवाणघेवाण प्रक्रियार प्रभावित करू शकतात, त्यामुळे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि समुद्राच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्यांमध्येही बदल होऊ शकतात,” असे डॉ. विष्णूराधन यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, समुद्राच्या तळाशी पोचणाऱ्या प्रकाश आणि उष्णतेचे प्रमाण जसजसे कमी होते, तसतसा प्रकाश संश्लेषण आणि बाष्पीभवन क्रियांवर परिणाम होतो. “या एकापाठोपाठ होणाऱ्या विविध प्रक्रिया आणि त्यांच्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी स्थानीय प्रयोग, प्रत्यक्ष नमुने  आणि प्रतिमान अनुरूपण आवश्यक आहे,” असे ते पुढे म्हणाले.

प्लास्टिकचा, विशेषतः एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकचा सतत वाढत असलेला वापर आणि गैरवापर भविष्यासाठी  हानिकारक आहे, पण संशोधक म्हणतात परिस्थिती सुधारण्यासाठी अजूनही आशा आहे. “काही देशांनी एकल-वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे आणि प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.ही खूप प्रोत्साहन देणारी बाब आहे," असे प्रोफेसर एल्डो म्हणतात.

तथापि, नागरिक, धोरणकर्ते आणि शासन यंत्रणेचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत.

“केवळ एकटी नियामक यंत्रणा काही करू शकत नाही, तर पर्यावरणाविषयीची जागरूकता आणि उपभोग्य वस्तूंचा योग्य वापर हाच प्लास्टिकच्या संभाव्य धोक्यातून वाचवू  शकतो ,” असे ते म्हणतात.

प्लास्टिकला योग्य पर्याय मिळवणे कठीण असले तरीही ही काळाची गरज आहे. काही सोप्या उपाययोजना, जसे की कचऱ्याचे वर्गीकरण, जनजागृती मोहीमा आणि नागरिकांचे प्लास्टिकच्या वापरावरील नियंत्रण इत्यादी भविष्यातील धोक्यापासून संरक्षण करू शकतात.

या अभ्यासातून  असे दिसून आले  आहे की सागरी प्लास्टिक प्रदूषण हे केवळ जीवनावरच नाही तर परिसंस्था नियंत्रित करणाऱ्या भौतिक बाबींवरही परिणाम करते. “आम्हाला आशा आहे की आमच्या निष्कर्षांमुळे, प्लास्टिकच्या प्रदूषणाची संभाव्यता आणि त्यामुळे होणारे सागरी जलस्तंभ रचनेतील बदल आणि वातावरण बदल  याबद्दल पुढील संशोधनात मदत होईल,” असे डॉ. विष्णुराधन म्हणाले.