फोटॉनिक घटकांची क्षमता वाढवण्यासाठी संशोधकांनी सिलिकॉन नायट्राईड वापरून अभिनव पद्धत विकसित केली आहे ज्यामुळे दळणवळण आणि माहिती संस्करण क्षेत्रात आणखी वेगवान, सुरक्षित आणि ऊर्जा-दक्ष तंत्रज्ञान वापरता येईल.

वनस्पतींची संख्या वाढली तर कीटकांची संख्या वाढते का?

Read time: 1 min
Bengaluru
7 मार्च 2019
वनस्पतींची संख्या वाढली तर कीटकांची संख्या वाढते का?

शाकभक्षी कीटकांमध्ये वनस्पतींची रचना आणि कार्य प्रभावित करण्याचे सामर्थ्य असते. काही शाकभक्षी  कीटक आपल्या जीवनचक्राचा संपूर्ण किंवा काही भाग फक्त विशिष्ट वनस्पतींच्या आधारे पूर्ण करतात. वनस्पती आणि त्यावर जगणारे कीटक यांची लाखो वर्षांपासून समांतर उत्क्रांती होत असल्यामुळे वनस्पतीच्या पानांच्या आकारावर आणि आकृतीवर कीटकांचा प्रभाव दिसून आला आहे. म्हणून कीटक व वनस्पती यांच्यातील परस्परसंबंध समजून घेतल्यास वनस्पतींची पानांच्या आकृतिबंधात आणि आकारात इतकी विविधता का आहे ते कळण्यास मदत होईल. बायोलॉजी ओपन मासिकात प्रकाशित, एम.ई.एस आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथील श्री. आशिष नेर्लेकर यांनी केलेल्या अभ्यासात, परिसरातील जत्रोफा नाना वनस्पतीच्या घनतेचा शाकभक्षी कीटकांच्या विपुलतेवर काय प्रभाव पडतो याचा अभ्यास केला आहे.

जत्रोफा नाना किंवा किर्कुंडी या लुप्तप्राय, उष्णकटिबंधी, बारमाही वनस्पतीची नोंद सर्वप्रथम भारतातील पुणे शहरात केली गेली. ही वनस्पती मे महिन्यात अंकुरते आणि पावसाळा संपेपर्यंत कोमेजूनही जाते. वर्षातील उरलेल्या काळात जत्रोफा नाना जमिनीखालील कंदाच्या रूपात, सुप्तावस्थेत जिवंत राहते. भारतातील पुणे शहरात वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, पाषाण-बाणेर टेकडी आणि एनडीए टेकडी या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात जत्रोफा नाना वनस्पती सापडते.

श्री नेर्लेकर म्हणतात, "जत्रोफा नाना खूप कमी ठिकाणी आणि खूप कमी संख्येत सापडते, म्हणून ती लुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जत्रोफा खाणार्‍या कीटकांमुळे पण वनस्पतीच्या संख्येत बदल होतो. म्हणून कीटक-वनस्पती यामधील नात्याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे."

आश्रयी वनस्पतींची घनता आणि शाकभक्षी कीटक यांची विपुलता यांच्यातील नाते समजण्यासाठी अनेक सैद्धांतिक प्रतिरूप मांडले गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे "संसाधन केंद्रीकरण गृहीतक".  यात असे म्हटले गेले आहे की आश्रयी वनस्पतीची संख्या वाढली की प्रत्येक वनस्पतीवरील शाकभक्षी कीटकांची संख्या पण वाढते. निसर्गात अनेक ठिकाणी या गृहीतकाची चाचणी केली गेली आणि ते खरे ठरले आहे. आयडिया वाइल्ड, यूएसए यांनी प्रायोजित केलेल्या या अभ्यासात वरील गृहीतक जत्रोफा वनस्पतीसाठी खरे आहे की नाही याची तपासणी संशोधकांनी केली.

संशोधकांनी पुण्यातील टेकड्यांवर आश्रयी वनस्पतीचे तिच्या जीवनचक्रातील विविध टप्प्यांत निरीक्षण केले.  जत्रोफा वनस्पतीवर त्यांना भुंगेरा, कीडे, पतंग, आणि फुलपाखरू अशा शाकभक्षी कीटकांच्या १७ जाती आढळल्या. वनस्पती खाणार्‍या सर्व कीटक जाती या "विशेषज्ञ", म्हणजे त्या कीटक जाती फक्त जत्रोफा नाना किंवा त्याच प्रजातीतल्या किंवा कुळातल्या वनस्पती खातात असे दिसून आले. त्यांना जत्रोफा वर पेंपेलिया मोरोसालीस नावाचा पतंग पण खूप मोठ्या प्रमाणात आढळला.

जत्रोफा वनस्पती असलेल्या उष्ण कटिबंधीय वन्यसंस्थेसाठी हे संसाधन केंद्रीकरण गृहीतक खरे ठरले का? श्री नेर्लेकर म्हणाले, "माझ्या निरीक्षणाप्रमाणे गृहीतक खरे ठरले आणि खोटेही, कारण ते हवामानासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते." असे दिसले की ‘अधिक संख्येत वनस्पती म्हणजे प्रत्येक वनस्पतीमागे अधिक संख्येत कीटक" हे गृहीतक फक्त वनस्पतीच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात खरे ठरले. इतर वेळी त्या उलट परिस्थिती दिसली, म्हणजेच अधिक संख्येत वनस्पती असल्या तर प्रत्येक वनस्पतीमागे कीटकांची संख्या कमी दिसून आली.

संसाधने वापरणार्‍यांची संख्या वाढली की प्रत्येकाच्या वाट्याला येणारी संसाधने कमी होतात म्हणजेच 'संसाधन विकेंद्रीकरण प्रभाव' हा निसर्गात अनेक ठिकाणी दिसणारा प्रभाव या अभ्यासात पण दिसला. या पूर्वी अशाच एका अभ्यासात संशोधकांनी संसाधन विकेंद्रीकरण प्रभावाच्या परिणामांचे निरीक्षण केले. त्यावरून असे दिसले की हा प्रभाव पूर्वीच्या समजुतीपेक्षा अधिक ठिकाणी दिसून येतो. याचाच अर्थ असा होतो, निसर्गात संसाधन केंद्रीकरणाचा प्रभाव खरंच किती प्रमाणात असतो याचा फेरविचार करणे आवश्यक आहे.

या अभ्यासाच्या निमित्ताने फारश्या माहित नसलेल्या जत्रोफा वनस्पती कडे लोकांचे लक्ष गेले आहे. आययूसीएन ने असुरक्षित असे वर्गीकरण केलेल्या या वनस्पतींचे अस्तित्व, पुण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात वनीकरण झाल्यामुळे धोक्यात आले आहे. अनेक संस्था आणि निसर्गप्रेमी लोक टेकड्यांवर हिरवळ वाढवण्यासाठी झाडे लावतात, पण त्यामुळे झाडे आणि गवत हे दोन्ही असलेल्या माळरानाची जागा हिरविगार जंगलं घेत आहेत. या बदलांमुळे जत्रोफा वनस्पतीचे अस्तित्व धोक्यात येतेच, आणि त्याचबरोबर विद्यमान स्थानिक जैवविविधतेवर पण परिणाम होतो.

संशोधकांनी या अभ्यासात उष्ण कटिबंधातील कीटक-वनस्पती यांच्या परस्पर संबंधाबद्दलचे अनुभवजन्य आकडे गोळा केले आहेत. या विषयात भविष्यात काय संशोधन करता येईल याविषयी बोलताना श्री नेर्लेकर म्हणाले, "आश्रयी वनस्पती आणि शाकभक्षी कीटक यांच्या संख्येतील नाते समजण्यासाठी अनेक सैद्धांतिक प्रतिरूप मांडले गेले आहेत, पण त्या प्रतिरूपांना आधार देण्यासाठी उष्णकटिबंध क्षेत्रातून गोळा केलेले अनुभवजन्य आकडे पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. आम्ही या अभ्यासात कोरड्या नागरी सवाना क्षेत्रातील एका छोट्या जंगली वनस्पतीचे निरीक्षण केले, पण मला आशा आहे की असेच संशोधन विविध जैव-भौगोलिक क्षेत्रातील विविध जातीच्या जंगली वनस्पतींसाठी केले जावे म्हणजे मांडलेल्या प्रतिरूपांसाठी पुरावे गोळा करता येतील."