महामार्गावर वेगाने गाडी चालवत जाताना धम्माल येते, हो ना? पण महामार्ग जेव्हा प्राण्यांना जीवघेणे ठरतात तेव्हा? रस्त्यावर झालेले प्राण्यांचे मृत्यू लवकरच विस्मृतीत जातात, आणि नवीन मृत्यू होतात तेव्हाच परत उजेडात येतात, जंगलांमधून व अभयारण्यांतून लोक निष्काळजीपणे वाहने चालवतात आणि निर्लज्जपणे परिस्थितिकीचा ऱ्हास होईल अश्या कृती करत राहतात. ही खचितच गमतीची गोष्ट नाही.
रस्ते, रेल्वे आणि वीजपुरवठा देशाच्या विकासाकरिता अत्यावश्यक असतात, मात्र यांच्यामुळे परिस्थितीकीवर काय परिणाम होतो? रस्त्यांची परिस्थितीकी ह्या नवनिर्मित ज्ञानशाखेत रस्त्यांचा पर्यावरणावर होणाऱ्या चांगल्या वाईट परिणामांचा अभ्यास केला जातो. जंगलांमधुन किंवा अभयारण्यातून जाणारे रस्ते हे केवळ तेथिल प्राणी आणि वनस्पतींनाच धोकादायक असतात असे नाही रस्त्यांमुळे त्या परिसरातील जलचक्र सुरळीत चालण्यातही बाधा येते.
पाणी किंवा बर्फ रस्त्यांवरुन वाहून जाताना रस्त्यांवर सांडलेले तेल, पेट्रोल आणि इतर हानीकारक अवजड धातू आपल्यासोबत वाहून नेतात आणि परिसरातील पाण्याचे स्त्रोत प्रदूषित करतात.
काळजीचा दुसरा मुद्दा म्हणजे या रस्त्यांवरून दिवसरात्र चालणारी वाहतूक. काही तुरळक अभयारण्ये निशाचर प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी संध्याकाळपासून पहाटेपर्यंत आतील रस्ते वाहनांच्या वाहतुकीस बंद ठेवतात. राष्ट्रीय वन्यजीव कार्य योजनाच्या २००२-२०१६ आराखड्यात निशाचर वन्यजीवांना ध्वनी व प्रकाशापासून सुरक्षित अधिवास उपलब्ध करुन देण्याचे महत्त्व अधोरोखित केले आहे. प्रत्यक्षात मात्र याचि अंमलबजावणी दुर्मिळच!
वाहनांच्या वाहतुकीच्या मुद्द्याव्यतिरीक्त आणखी एक मुद्दा म्हणजे अभयारण्यात धार्मिकदुष्ट्या महत्त्वाची मंदिरे असल्यामुळे काही भागात वर्षातील काही ठराविक काळात देवभक्तांची होणारी गर्दी. याचे एक उदाहरण म्हणजे केरळमधिल पेरियार व्याघ्र प्रकल्पात वसलेले शबरीमाला मंदिर. दरवर्षी, नोव्हेंबर ते जानेवारी या काळात येथे सुमारे १० कोटी भाविक दर्शनास येतात आणि तेथिल पांबा नदीत स्नान करतात. य़ामुळे नदी तर दुषित होतेच, शिवाय जंगलाचीही अतोनात हानी होते.
वन्यजीव व माणूस यांच्यातील वैचारिक संघर्ष भारतातील रस्त्यांवर पाहायला मिळतो. शिल्लक राहीलेले ४% संरक्षित क्षेत्र जपण्यासाठी वेळीच योग्य पाऊले उचलली नाहीत, तर विकासाच्या नावाखाली आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल.