भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.

आयआयटी मुंबईच्या प्रा. देबब्रत मैती यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार -२०२२ प्रदान

Read time: 4 mins
Mumbai
1 नवेंबर 2023
Prof. Debabrata Maiti

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (Council For Scientific and Industrial Research, सीएसआयआर) तर्फे प्रदान होणाऱ्या शांती स्वरूप भटनागर (एसएसबी) पुरस्काराच्या २०२२ च्या मानकऱ्यांमध्ये आयआयटी मुंबई येथील रसायनशास्त्र विभाग आणि इंटरडिसिप्लिनरी प्रोग्रॅम इन क्लायमेट स्टडीज (आयडीपीसीएस) मधील प्रा. देबब्रत मैती यांचा समावेश आहे. त्यांनी रसायनशास्त्रात वॅलरायझेशन वर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा हा गौरव आहे. त्यांच्या संशोधनामुळे रसायने अथवा रासायनिक प्रक्रियांमधून मौल्यवान उत्पादने तयार करायला मदत होते – याला मूल्य वर्धन, म्हणजेच वॅलरायझेशन म्हणतात.

सीएसआयआरचे संस्थापक व संचालक डॉ. शांती स्वरूप भटनागर यांच्या नावानी दिला जाणारा एसएसबी पुरस्कार भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. डॉ. मैती यांना या पुरस्काराच्या स्वरूपात रुपये पाच लाख रोख, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह आणि वयाच्या ६५ वर्षापर्यंत महिन्याला रुपये १५,००० चे विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार रसायनशास्त्र विभागात घोषित झाला आहे.

“शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा माझे सर्व विद्यार्थी आणि सहसंशोधक यांच्या प्रयत्नांचा गौरव आहे. हे यश आमच्या एकत्रित कामाचे फळ असल्याने त्याचा आनंद अधिक आहे. भारतातील संशोधन क्षेत्रासाठी आयआयटी मुंबई सर्वोत्तम ठिकाण आहे. अत्याधुनिक संशोधनासाठी लागणारी यथायोग्य व्यवस्था आमच्या रसायनशास्त्र आणि आयडीपीसीएस विभागांमध्ये उपलब्ध आहे. आमच्या संस्थेतील संशोधन व विकास अधिष्ठाता कार्यालय, विद्याशाखा अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, अधिष्ठाता, उपसंचालक आणि संचालक सर्वोच्च स्तरावरील संशोधनासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात आणि सर्व लागणारे सहाय्य देखील पुरवतात,” असे प्रा. देबब्रत मैती यांनी पुरस्काराची घोषणा झाल्यावर आवर्जून नमूद केले.

प्रा. मैती यांनी रामकृष्ण मिशन विद्यामंदिर बेलूर, कलकत्ता विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यापुढे आयआयटी मुंबई मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि संस्थेचे रौप्यपदक मिळवले. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून त्यांनी पीएचडी अभ्यासक्रम (२००३-२००८) पूर्ण केला. त्या पश्चात २००८-२०१० मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये पोस्ट-डॉक्टोरल फेलो म्हणून संशोधन केले. सन २०११ पासून ते आयआयटी मुंबई मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

“मला आयआयटी मुंबईच्या प्रशासनाकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून कायमच सहकार्य मिळाले आहे. माझ्या विध्यार्थीवर्गाकडून आणि सहकाऱ्यांकडून भरभरून कौतुक झाले. त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि आधार याचा माझ्या कारकिर्दीत मोलाचा वाटा आहे,” असे प्रा. मैती यांनी सांगितले.

“माझे कुटुंबाने आयुष्यात आलेल्या सगळ्या चढ-उतारात मला साथ दिली आहे. माझ्या कारकिर्दीत त्यांच्याकडून नेहमीच प्रेरणा आणि शक्ती मिळाली आहे,” प्रा. मैती यांनी कुटुंबाचे आभार मानत सांगितले.

प्रा. मैती यांचे काम उत्प्रेरण (कॅटॅलीसीस) आणि नवीन अभिक्रिया विकसित करण्यावर केंद्रित आहे. फारशा महत्त्वाच्या न वाटणाऱ्या रेणूंपासून औषधनिर्माणशास्त्रात आणि औद्योगिक क्रियांमध्ये लागणारी मौल्यवान रसायने तयार करण्यासाठी प्रा. मैती यांच्या वॅलरायझेशन वरील कामाचा उपयोग होतो.

“यासाठी निसर्गातूनच प्रेरणा मिळते. आम्ही धातू, प्रकाश, एन्झाइम्स (विकर) अशा साधनांचा वापर करून रेणूंमध्ये निवडक बदल घडवणारे मार्ग शोधतो. पारंपरिक रासायनिक पद्धतींमध्ये रेणूंचा असा वापर सहसा करता येत नाही,” प्रा. मैती यांनी त्यांच्या कामाबद्दल स्पष्ट केले. “कॅटॅलीसीस हा या शतकातील एक सर्वात महत्वाचा विषय आहे. त्यामुळे एखाद्या अभिक्रियेचा मार्ग बदलू शकतो अथवा अभिक्रिया सोप्या किंवा सौम्य स्थितींमध्ये घडवता येऊ शकते,” असे त्यांनी पुढे सांगितले.
 
“कॅटॅलीसीसचा दैनंदिन जीवनावर बऱ्याच प्रकारे परिणाम होतो. शेतीसाठी लागणारी रसायने, औषधे आणि ऊर्जा या सर्व क्षेत्रात कॅटॅलीसीसचा प्रभाव पडत असतो. यामुळे ३५% जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट) वर कॅटॅलीसीसचा परिणाम होतो. आणि ही टक्केवारी भविष्यात वाढायची शक्यता आहे,” कॅटॅलीसीसचे महत्व स्पष्ट करताना प्रा. मैती यांनी सांगितले.   

सद्य कामाविषयी प्रा. मैती यांनी सांगितले की “मी सध्या कार्बन-हायड्रोजन (C–H) बॉण्ड्सचे (बंध) सक्रियण यावर काम करत आहे. साध्या-सुध्या रासायनिक पदार्थांपासून नवीन जटिल आणि सहज न मिळणारी रसायने तयार करण्याचा सिंथेटिक केमिस्ट्स चा प्रयत्न असतो. साधारणतः याकरता जरा खर्चिक, अवघड आणि बऱ्याच टप्प्यात काम करणाऱ्या प्रक्रिया लागतात. हा मार्ग लहान आणि सुकर करून शक्यतो एक टप्प्यात अभिक्रिया व्हावी असा आमचा हेतू असतो. सेंद्रिय (ऑरगॅनिक) रेणूंमध्ये सहसा अनेक C–H बॉण्ड्स असतात. जर या C–H बॉण्ड्स मध्ये काहीसे बदल करता आले तर नवीन प्रकारचे रेणू बनवणे सोपे आणि स्वस्त होऊ शकेल.”

C–H बॉण्ड्स मध्ये बदल करणे मात्र सोपे नसते. C–H बॉण्ड्स बदलणे किंवा तोडणे सोपे आहे किंवा कठीण हे त्या बॉण्डमधील उर्जेवर अवलंबून असते. बॉण्ड्सची ऊर्जा सहसा जास्त असल्याने C–H बॉण्ड्स मध्ये फेरफार करणे अवघड होते. शिवाय कोणते बॉण्ड्स सक्रिय करायचे हे पण निवडकपणे ठरवावे लागते.

“सगळेच C–H बॉण्ड्स एका वेळी सक्रिय करून चालत नाही. वास्तविक त्याने काही उपयोग देखील होत नाही. एखाद्या रेणूमध्ये अनेक C–H बॉण्ड्स असतील तर त्यातला कुठला एक बॉण्ड निवडकपणे सक्रिय करावा हे ठरवावे लागते,” असे प्रा. मैती यांनी पुढे सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या एका संशोधनात प्रा. मैती आणि त्यांच्या गटाने जीवशास्त्रीय महत्व असलेली रसायने तयार करण्यासाठी एक वेगळी अभिक्रिया पद्धत विकसित केली आहे. त्यांनी प्रस्तुत केलेल्या या अभिक्रियेच्या पद्धतीमध्ये अक्रियाशील कार्बन-हायड्रोजन बॉण्ड्सचे सक्रियण करून लॅक्टोन्स नावाची महत्वाची संयुगे तयार करायला चालना देता येते. नैसर्गिक उत्पादने आणि औषधे यांमध्ये लॅक्टोन्स आढळून येतात आणि म्हणून महत्वाचे असतात.

‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांमार्फत भारतीय उत्पादनांना चालना मिळत आहे. काही आर्थिकदृष्टया महत्वाची संशोधने प्रयोगशाळेपुरती मर्यादित न ठेवता उत्पादन स्वरूपात बाजारात आणणे भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. प्रा. मैती यांचे कार्य या दिशेने आश्वासक आहे यात शंका नाही.

“C–H बॉण्ड्सच्या सक्रियणातून शाश्वत आणि किफायतशीर रासायनिक बदल घडवून आणणे आता कुठे उपयोगी सिद्ध झाले आहे. आम्हाला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. C–H बॉण्ड्स सक्रिय करून क्लिष्ट रेणू सर्रास कृत्रिमरीत्या तयार होताना लवकरच आपण बघू शकू अशी आशा आहे,” भविष्यातील दिशा स्पष्ट करताना प्रा. मैती यांनी सांगितले.