भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.

हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांना सामोरे जाताना

Read time: 1 min
मुंबई
19 नवेंबर 2019
हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांना सामोरे जाताना

तीव्र हवामान विषयक इशाऱ्यांना मच्छीमार कसा प्रतिसाद देतात आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना कसे  सामोरे जातात याचा अभ्यास संशोधकांनी केला.

हवामान बदल, व त्यामुळे वारंवार घडणाऱ्या अतिविषम हवामानाच्या घटना, तसेच वाढते प्रदूषण, यांमुळे समुद्रातील माशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. भविष्यात असेच घडत राहिले, तर आपल्या आवडत्या रावस-बांगडा-सुरमई यांवर पाणी सोडावे लागेलच, शिवाय हजारो मच्छीमारांची उपजीविका देखील धोक्यात येईल. मच्छीमार बांधवांसाठी हवामान बदलाचा आणि त्यामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करणे निश्चितच सोपे नाही. अशा परिस्थितीत मच्छीमार आपली उपजीविका कायम ठेवण्यासाठी काय करतात, तीव्र हवामान विषयक सूचना व इशारे यांना कसा प्रतिसाद देतात, तसेच कुठले घटक या निर्णयांना प्रभावित करतात याचा शोध भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी बॉम्बे) येथील संशोधकांनी घेतला आहे.

भारतात सागरी किनारा लाभलेल्या नऊ राज्यांत आणि दोन केंद्रशासित प्रदेशांत सागरी मासेमारी करणारी जवळपास ३२८८ खेडी आहेत. राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) मासेमारी आणि मत्स्यशेती यांचे योगदान १.०७ टक्के इतके आहे. म्हणूनच मासेमारी करणाऱ्या ह्या समुदायाचा हवामान बदलांशी असलेला परस्पर संबंध समजून घेणे गरजेचे आहे. यामुळे उपजीविकेसाठी त्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांना मदत होईलच, शिवाय त्यांच्या उन्नतीसाठी धोरणे आखण्यासही याचा उपयोग होईल.

संशोधकांनी, पूर्वी मच्छीमार समुदायावर झालेला अभ्यास, प्रत्यक्ष कार्य स्थळी केलेले संशोधन, केंद्रित गट चर्चा आणि महाराष्ट्राच्या मस्त्यक्षेत्रातील ६०१ शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण मच्छीमारांच्या सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा केली.  तीव्र हवामानाच्या इशाऱ्यांना मच्छीमार कसे सामोरे जातात, बदललेल्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी कोणती नीती अवलंबतात, तसेच कुठल्या घटकांचा परिणाम यावर दिसून येतो, याचा शोध संशोधकांनी ह्या माहितीच्या आधारे  घेतला. तसेच हवामान बदल आणि त्यामुळे उद्भवणारी आव्हाने यांना सामोरे जाण्याच्या शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण मच्छीमार बांधवांच्या पद्धतीतील फरक दर्शविणारा, यापूर्वी कधी न झालेला अभ्यास संशोधकांनी केला.  
 
संशोधकांच्या असे लक्षात आले की हवामान बदल आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या मच्छीमार बांधवांच्या पद्धतीत पुढील घटक अतिशय महत्वाची भूमिका बजावतात: मच्छीमार समाजातील एकसंधपणा, हवामान विषयक माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवरील मच्छीमारांचा विश्वास, हवामानाच्या अंदाजाबद्दल त्यांना वाटणारी विश्वासार्हता, जोखिमेचा अवबोध आणि मच्छिमारांची शैक्षणिक पातळी. संशोधकांच्या निदर्शनास आले की ग्रामीण भागातील मच्छीमार समाजात घनिष्ट सामाजिक बांधिलकी असून जीवितहानी टळण्यासाठी धोक्यांसंबंधित माहिती ते एकमेकांना पुरवतात, तर शहरी मच्छीमार यंत्रचलित नावा वापरून हवामान बदलांच्या आव्हानांना सामोरे जातात. ह्या बदलांशी जुळवून घेण्याच्या शहरी आणि निमशहरी मच्छीमारांच्या पद्धतींवर व्यापारातील स्पर्धा आणि प्रदूषण, यासारख्या  घटकांचाही प्रभाव दिसून येतो.

शाश्वत उपजीविकेच्या दिशेने

विश्लेषण केल्यानंतर संशोधकांच्या असे निदर्शनास आले की मच्छीमार बांधव बदलते हवामान आणि घटणारी आवक यांवर मात करण्यासाठी पुढील सहा धोरणांचा अवलंब करतात. ते अत्याधुनिक नावा तसेच निरनिराळ्या रचनेच्या जाळ्यांचा वापर करतात, अधिक काळ काम करतात, पूर्वी पेक्षा अधिक खोल समुद्रात मासे शोधायला जातात, नावांचा विमा उतरवतात आणि उपजीविकेसाठी इतर नोकऱ्या किंवा उद्योग करतात. ही धोरणे अवलंबण्यात मच्छिमारांची शैक्षणिक पातळी, त्यांचा व्यवसायातील अनुभव, बचत, उपलब्ध पत आणि मालमत्ता, उपजिविकेत होणारा बदल आणि त्यांतून उद्भवणाऱ्या धोक्याची जाणीव, सामाजिक बांधिलकी व आधार, प्रदूषण अशा घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते.

शिक्षणामुळे मच्छीमार बांधवांना  मासेमारी, नावेचा विमा आणि यंत्रचलित नावा ह्या संदर्भातील माहिती मिळते.

“उच्चशिक्षित मच्छीमार हवामान बदल आणि त्याचा परिणाम चटकन जाणून घेऊ शकतात, असे अभ्यासावरून लक्षात आले आहे. मच्छीमारांना तापमान आणि हवामान बदल यांची जाणीव करून देण्यात शिक्षणाचा अतिशय मोलाचा वाटा आहे,” असे ह्या अभ्यासाच्या अग्रणी, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्राध्यापिका तृप्ती मिश्रा म्हणतात.

शहरी, निमशहरी आणि ग्रामीण ह्या तीनही गटांना सरकारी अनुदानामुळे योग्य मदत मिळाली आहे, अन्यथा औपचारिक पत मिळवणे बर्‍याच जणांच्या आवाक्याबाहेर होते. म्हणूनच संशोधकांनी मच्छीमार समुदायाला पाठिंबा देण्यासाठी सार्वजनिक संस्थांकडून अनुदान आणि पत देणाऱ्या योजनांचे समर्थन केले आहे.

ग्रामीण मच्छीमार समाजाला मित्रपरिवार आणि सामाजिक बांधिलकी यांचा भरभक्कम आधार मिळत असून बिकट परिस्थितीशी सामना करण्याची नीती आखण्यात ही बाब उत्प्रेरक ठरली आहे. नियोजनकर्ते आणि धोरणकर्त्यांनी अनुकूल योजना ठरवताना हे पैलू विचारात घेणे आवश्यक आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. मच्छीमार समाजाचा अधिकाऱ्यांवरील विश्वास हळूहळू कमी झाला आहे असेही ह्या अभ्यासानुसार दिसून येते.

जे शहरी मच्छीमार ग्रामीण आणि निमग्रामीण मच्छीमारांच्या तुलनेत जास्त खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात, त्यांना मासेमारीतील अशा धोक्यामुळे, आपल्या मुलांनी उपजीविकेची इतर साधने शोधावीत असे वाटते. याविरुद्ध, ग्रामीण आणि निमशहरी मच्छीमार समुदायाला असे वाटते की मासेमारी करणे हे केवळ त्यांची केवळ उपजीविका नसून, त्यामुळे त्यांची सांस्कृतिक ओळख देखील जपली जाते आणि म्हणून ते इतर पर्याय विचारात घ्यायला उत्सुक नव्हते.  

प्लॅस्टिक कचरा, नानाविध घनकचरा, तेल गळती, जवळपासच्या शहरांमधील तसेच कारखान्यांमधील सांडपाणी, यामुळे सागरी प्रदूषण होते असे मच्छीमार समुदायाला लक्षात आल्याचे संशोधकांना आढळले आहे. मासेमारीसाठी कोणती जाळी वापरावीत व यंत्रचलित नावा कश्या रितीने वापराव्यात यासंबंधी निर्णय घेताना, प्रदूषण वा घनकचरा आणि धारदार डबर यांमुळे मासेमारीची उपकरणे आणि जाळी यांना पोहोचणारी हानी ह्या गोष्टींचा विचार मच्छीमार करतात असे दिसून आले. शहरी आणि निमशहरी मच्छीमार एकापेक्षा अधिक जाळी आणि यंत्रचलित नावांचा वापर ग्रामीण मच्छीमारांपेक्षा अधिक प्रमाणात करतात.

बदलांशी जुळवून घेण्याच्या पद्धतींवर व्यापारातील वाढत्या स्पर्धेचाही प्रभाव आहे, असे अभ्यासावरून लक्षात येते. ज्यांना स्पर्धा वाढते आहे असे वाटते त्यांनी विविध प्रकारची जाळी वापरण्यास सुरुवात केली तसेच नावांसाठी विमा संरक्षण घेतले. ग्रामीण आणि निमशहरी मच्छीमार समुदायाच्या तुलनेत, शहरी मच्छीमारांना अशा स्पर्धेचा त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत आहे.

“व्यापारातील वाढत्या स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात मासे मिळविण्यासाठी अत्याधुनिक बोटींचा वापर करणे, अधिक काळ मासेमारी करणे आणि समुद्रात खोलवर जाऊन मासेमारी करणे तसेच निरनिराळ्या पद्धतीची जाळी वापरणे अशी अनेक धोरणे रावबिण्यात येतात,” असे प्राध्यापक मिश्रा सांगतात.

हवामान बदलाशी सामना

मुसळधार पाऊस आणि वादळ यासारख्या अतिविषम हवामानाच्या घटनांमुळे मच्छीमारांसाठी समुद्रात जाणे धोकादायक असते. हवामान विषयक धोक्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन योग्य कार्यवाही केल्यास मोठी जीवितहानी टळू शकते. तरीदेखील काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात ही वस्तुस्थिती आहे. हवामान विषयक दक्षतेच्या इशाऱ्याला मच्छीमार कसा प्रतिसाद देतात हे काही महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असल्याचे अभ्यासादरम्यान संशोधकांना आढळले. वादळ आणि चक्रीवादळांचा अनुभव, वापरत असलेल्या नौकेचा प्रकार, नौकांचा विमा उतरवलेला आहे अथवा नाही, सुरक्षायंत्रणेवरचा विश्वास, स्वदेशी ज्ञानाची विश्वासार्हता, समाजावरील व स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांवरील विश्वास, सामाजिक बांधिलकी, प्रादेशिक पार्श्वभूमी, औपचारिक शिक्षण आणि मासेमारीचा अनुभव किती वर्षे आहे यासारख्या बाबींचा परिणाम ते कसा प्रतिसाद देतात यावर होतो.

तीव्र हवामानाची परिस्थिती अनुभवलेले किंवा तरुण मच्छीमार ह्यांनी सुरक्षिततेसाठी हवामान विषयक इशाऱ्यांकडे लक्ष दिलेले आढळले. ग्रामीण भागांतील दहापैकी नऊ मच्छिमारांनी, तर निमशहरी भागांतील तिघांपैकी दोघांनी आणि शहरी भागंतील दोघांपैकी फक्त एकानी हवामान विषयक माहितीचा वापर केला. नौकेचा विमा असणाऱ्यांनी देखील मालमत्तेची हानी टाळण्यासाठी हवामान विषयक इशाऱ्याकडे लक्ष दिले. सामाजिक आधार नसलेल्या मच्छीमार समुदायाने अधिक सावधगिरी बाळगली तसेच तीव्र हवामान बदलाच्या दुष्परिणामाना तोंड देण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नसल्याने अश्या इशाऱ्यांना योग्य प्रतिसाद दिला. तर दुसरीकडे अनेक वर्ष मासेमारी करणाऱ्या किंवा यंत्रचलित नावा असणार्‍या मच्छीमारांनी हवामानबद्दलच्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिले नाही. हवामान विषयक माहितीच्या प्रतिसादावर किंवा वापरावर त्यांच्या शैक्षणिक पातळीचा काहीही परिणाम झाला नाही.

अभ्यासादरम्यान असेही आढळले आहे की चक्रीवादळ कधी व कसे होते याबाबत अनुभवांतून मिळालेले पारंपारिक ज्ञान, आणि एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पिढ्यान् पिढ्या चालत आलेली माहिती ह्या बाबी मच्छिमारांना अधिक व्यावहारिक आणि विश्वासार्ह वाटतात. म्हणून हवामानसंबंधी इशारा देताना जर पारंपारिक पद्धतीही लक्षात घेतली तर दिलेला हवामानाचा अंदाज मच्छीमारांना अधिक जवळचा आणि विश्वासार्ह वाटू शकेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. परंतु मच्छीमार बांधवाना ज्या ज्यावेळी अतिविषम हवामानामुळे जीवितहानी व मालमत्ता हानी होण्याचा जास्त धोका जाणवला, त्यावेळी त्यांनी हवामान विषयक इशारे पाळल्याचे आढळले.

तीव्र हवामान विषयक घटना आणि इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम मच्छीमार समुदायाला समजाविण्यासाठी संशोधकांनी जागृती कार्यक्रम आयोजित करावेत असे सुचविले आहे. वैयक्तिक संवाद तसेच कार्यशाळांद्वारे मच्छीमार समाजाला माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल वाटणारा अविश्वास कमी करण्यास हातभार लागू शकेल. शिक्षणामुळे दूरगामी तसेच अनुकूल निर्णय घेणे आणि वेगवेगळ्या मार्गांनी उदरनिर्वाह निर्मितीच्या संधी मिळवून देणे सोयीचे होईल, असे संशोधकांना वाटते.

निरनिराळ्या मच्छीमार समुदायातील लोक कसे निर्णय घेतात आणि कोणते घटक ह्या निर्णयाला कारणीभूत ठरतात हे ह्या अभ्यासात अधोरेखित केले गेले आहे.

“सर्व प्रादेशिक मच्छीमारांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्थानिक सरकारच्या पाठबळाची आवश्यकता असल्याचे ह्या अभ्यासातून स्पष्ट होते. मासेमारीच्या नानाविध साधन खरेदीसाठी पत आणि अनुदानाची तरतूद, सहकारी संस्थांचे कामकाजास पाठबळ आणि बंदरांसारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधांची उपलब्धता पुरविण्यासाठी अनुकूल सरकारी धोरणे आखणे महत्वपूर्ण आहे,” असे ह्या अभ्यासातील सहभागी व पीएचडी करणाऱ्या, आंतरशाखीय संशोधन हवामान अभ्यास विभाग, आयआयटी मुंबई येथील श्रीमती कृष्णा मालकर यांनी सांगितले.