दाटीवाटीच्या शहरी भागांमधल्या इमारतींच्या छतांवर छोटी झाडे लावल्याने पुराची तीव्रता आणि पाणी वाहून जाण्याचे प्रमाण घटते

वायफाय की डेटा? आता ती तुमची डोकेदुखी नाही!

Read time: 1 min
मुंबई
31 Jan 2019
छायाचित्र : आरेदथ सिद्धार्थ, नंदिनी भोसले, हसन कुमार गुंडू, कम्युनिकेशन डिझाईन , आयडीसी, आयआयटी मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी मोबाइल सेवा देणार्‍या कंपन्यांना मोबाइल साधनांसाठी कार्यक्षमपणे नेटवर्क निवडता येईल असे अल्गॉरिथ्म विकसित केले आहे.

प्रचंड गर्दीच्या ठिकाणी कुणाला तरी भेटायला गेले की त्या व्यक्तीचा शोध घेणे किती कठीण असते! फोन लावावा तर रेंज मिळत नाही, व्हॉट्सअॅप करायला डेटा कनेक्शन पण चांगले नसते. मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे डेटा आणि वॉइस कनेक्शनची मागणी वाढतच जाणार आहे. मोबाइल कंपन्या ही मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. सेल्युलर आणि वायफाय नेटवर्क एकत्र वापरले तर या समस्येसाठी उपाय सापडू शकतो. अशा एकत्रित नेटवर्कला हेटेरोजीनस नेटवर्क किंवा 'हेटनेट' म्हणतात, आणि भविष्यात या हेटनेटमुळे दूरसंचार क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून येणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील अर्घ्यदीप रॉय, प्रा. प्रसन्न चापोरकर आणि प्रा. अभय करंदीकर यांनी एका अभ्यासात हेटनेट वापरुन मोबाइल वापरणार्‍यांना अधिक डेटा गती मिळण्यासाठी आणि कॉल-ब्लॉक न होण्यासाठी दोन अल्गॉरिथ्म प्रस्तुत केले आहेत.

सध्या हॉटस्पॉटमुळे जवळजवळ सर्व सार्वजनिक ठिकाणी वायफाय उपलब्ध असते. साधारपणे सेल्युलर नेटवर्कच्या तुलनेत वायफाय वापरल्याने अधिक डेटा गती मिळते आणि खर्च पण कमी होतो. मात्र, अनेक लोकांनी एका हॉटस्पॉटचा वापर केला तर डेटा गती कमी होते. सेल्युलर नेटवर्कमध्ये डेटा कनेक्शनची संख्या वाढली की कॉल-ब्लॉकिंग होते. हे गैरफायदे दूर करण्याचा प्रयत्न अत्याधुनिक ५जी तंत्रज्ञानात केला आहे.

डेटा आणि वॉइस कॉल यांचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी एक पर्याय म्हणजे एक केंद्रीय नियंत्रक प्रत्येक सेल टॉवर व वायफाय अॅक्सेस पॉइंटकडे लक्ष ठेवेल आणि येणार्‍या डेटा किंवा वॉइस कनेक्शनने मोबाइल नेटवर्क वापरावे की वायफाय हे ठरवेल. असे केल्याने असलेल्या डेटा क्षमतेचा योग्य उपयोग होईल आणि कंपन्या ग्राहकांना अधिक चांगले डेटा हस्तांतरण दर आणि वॉइस कॉलचा दर्जा देऊ शकतील.

प्रा. चापोरकर म्हणतात, "भविष्यात मोबाइल नेटवर्कमध्ये क्लाऊड मधील एक केंद्रीय  नियंत्रक असेल जो अॅक्सेस नेटवर्कचे नियंत्रण करेल.  संपूर्ण नेटवर्कची माहिती असेल तर त्याच्या आधारावर निर्णय घेता येतात."

आयईईई ट्रान्झॅक्शन्स ऑन वेहिक्युलर टेक्नॉलजी मासिकात प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांनी नेटवर्कमधील एखाद्या साधनाने वायफाय वापरावे की सेल्युलर डेटा हे निवडण्यासाठी दोन जलद आणि कार्यक्षम अल्गॉरिथ्म प्रस्तुत केले आहेत. जेव्हा एखादा  युझर नेटवर्कला जोडला जातो किंवा त्यातून बाहेर पडतो तेव्हा केंद्रीय नियंत्रक शक्य असलेल्या क्रियांच्या संचातून निर्धारित धोरणाला अनुसरून विशिष्ट क्रिया निवडते. हे धोरण प्रणालीची स्थिती आणि त्यानुरूप क्रिया यांचा तक्त्यावरून ठरवले जाते.

डेटासाठी आवश्यक नसली तरी वॉइस कॉलमध्ये आवाज स्पष्ट ऐकू येण्यासाठी निर्धारित चॅनल क्षमता असावी लागते. ती क्षमता उपलब्ध नसेल तर वॉइस कॉल ब्लॉक होतात. सेल्युलर नेटवर्कमध्ये युझरची संख्या वाढली की असे घडण्याची शक्यता वाढते. कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल ब्लॉकच्या कमाल संख्येबाबत शासकीय नियम असतात जे मोबाइल कंपन्यांना पाळावे लागतात. म्हणून युझर जेव्हा नेटवर्कला जोडला जातो किंवा त्यातून बाहेर पडतो तेव्हा चॅनल क्षमता पुनर्वितरित करताना केंद्रीय नियंत्रकाला ही खात्री करावी लागते की युझरला योग्य डेटा हस्तांतरण दर मिळेल आणि वॉइस कॉल ब्लॉकची संख्या पण नियमांनुसार मर्यादेत असेल. या पुनर्वितरणात वायफायला जोडलेल्या युझरला सेल्युलर डेटा कनेक्शनकडे हलवावे लागू शकते किंवा डेटा कनेक्शनला जोडलेल्या युझरला वायफाय कनेक्शनकडे हलवावे लागू शकते. मात्र पुनर्वितरणाचे सर्वोत्तम धोरण शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात संगणक शक्ती आणि वेळ लागू शकतो.

प्रा. चापोरकर त्यांच्या संशोधनाचा उद्देश समजावून सांगताना म्हणाले, "आमचा उद्देश आहे प्रणालीचा सर्वाधिक उपयोग करणारे धोरण शोधून काढणे. असे केल्याने प्रत्येक युझरला सर्वोत्तम डेटा हस्तांतरण दर मिळेल आणि ब्लॉक झालेल्या वॉइस कॉलची संख्या निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असेल."

वरील प्रमाणे सर्वोत्तम धोरण निवडण्यासाठी या अभ्यासाच्या संशोधकांनी 'मारकोव डिसीजन प्रोसेस' याचा आधार घेतला. या प्रक्रियेत प्रणाली पुढे कुठल्या स्थितीत जाणार आहे हे केवळ प्रणालीच्या वर्तमान स्थितीवर अवलंबून असते. आधीच्या स्थितीचा प्रभाव पुढच्या स्थितीवर होत नाही. संशोधकांनी काही उपेष्टतम धोरणे वगळली आणि निवड करण्यासाठी पर्यायांची संख्या कमी केली. म्हणून अभ्यासातील अल्गॉरिथ्म अधिक जलद आहेत आणि कमी संगणक शक्ती वापरतात. पहिल्या अल्गॉरिथ्ममध्ये केवळ उचित डेटा हस्तांतरण दर मिळवण्यासाठी नेटवर्क संसाधने वितरित केली जातात, यात वॉइस कॉल ब्लॉकिंग विचारात घेतले जात नाही. दुसर्‍या अल्गॉरिथ्ममध्ये कॉल ब्लॉकिंग नमूद केलेल्या मर्यादेच्या आत राहील अशा रीतीने नेटवर्क साधनांचे वितरण केले आहे.

संशोधकांनी त्यांच्या अल्गॉरिथ्मचे निष्कर्ष आणि विद्यमान अल्गॉरिथ्मचे निष्कर्ष यांची तुलना केली. त्यांना असे आढळले की त्यांच्या पहिल्या अल्गॉरिथ्ममध्ये वॉइस कॉल रिजेक्ट होण्याची शक्यता अधिक होती, मात्र दुसर्‍या अल्गॉरिथ्ममध्ये ही शक्यता निर्धारित मर्यादेपेक्षा कमी होती. विद्यमान अल्गॉरिथ्मच्या तुलनेत संशोधकांच्या दोन्ही अल्गॉरिथ्मची एकूण प्रवाह क्षमता अधिक चांगली होती.

भविष्यात दूरसंचार क्षेत्रात काय बदल घडतात याचा विचार करता असे दिसते की त्यात केंद्रीय नेटवर्क नियंत्रण असलेले व स्मार्ट आणि कार्यक्षम अल्गॉरिथ्म असलेले ५जी नेटवर्क याची नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका असेल. संशोधनात या पुढचे पाऊल म्हणजे मोबाइल पर्यन्त वायरलेस संकेत पोहचण्यापूर्वी संकेताचे वर्तन अल्गॉरिथ्ममध्ये समाविष्ट करून वैज्ञानिकांना त्यांचे अल्गॉरिथ्म सुधारायचे आहे.