जलाशयांच्या पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानाची नोंद व निरीक्षण करणारे आयआयटी मुंबईचे नवे वेब ॲप्लिकेशन - ‘इम्पार्ट’ - हवामानातील बदलांचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त.

स्वदेशी तंत्रज्ञानामुळे कर्करोगावरील उपचार कमी खर्चात शक्य

Read time: 1 min
बेंगलुरु
18 फेब्रुवारी 2020
स्वदेशी तंत्रज्ञानामुळे कर्करोगावरील उपचार कमी खर्चात शक्य

नव्याने एकाधिकार मिळालेल्या स्वदेशी सीएआर टी-पेशी तंत्रज्ञानामुळे भारतातील रूग्णांना कर्करोगाचा उपचार घेणे आता आवाक्यात

कर्करोगाचा उपचार करण्याचा एक उदयोन्मुख पद्धती म्हणजे प्रतिक्षमता उपचार. या पद्धतीने उपचार करताना कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यासाठी रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती मजबूत केली जाते. शस्त्रक्रिया, रसायन चिकित्सा (किमोथेरपी) किंवा प्रारण (रेडियेशन) उपचार पद्धतींपेक्षा प्रतिक्षमता उपचार पद्धती कमी वेदनाकारक आहे व यात कर्करोग पुन्हा परतण्याची शक्यता (पुनरावर्तन) कमी असते. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) येथील संशोधकांनी रुग्णाच्याच रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करून कर्करोग बरा करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे, व त्याच्यासाठी एकाधिकारही मिळवला आहे.

प्रा. राहुल पुरवार आणि आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवाभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञांच्या पथकाने कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी जनुक उपचार पद्धती आणि पेशी उपचार पद्धती यांचे मिश्रण वापरले आहे. एकाधिकार प्राप्त ह्या पद्धतीत जनुक अभियांत्रिकीचा उपयोग करून रुग्णाच्या रोगप्रतिकारक पेशींमध्ये बदल करतात, ज्यामुळे रुग्णाला कर्करोगाचा प्रतिकार करणे शक्य होते. टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या प्रा. गौरव नरुला यांच्या सहकार्याने लवकरच वैद्यकीय चाचण्या सुरू करण्याची त्यांची योजना आहे.

मानवी प्रतिक्षमी संस्थेत असलेल्या टी-पेशी हानीकारक पेशींचा नाश करूण आपल्या शरीराचे कर्करोग आणि इतर रोगांपासून संरक्षण करतात. त्या अर्बुद आणि कर्करोगाची वाढ ओळखून त्यांचा नाश करतात. मात्र प्रगत अवस्थेतील कर्करोगामध्ये, कर्करोगाच्या पेशी टी-पेशींना निष्क्रिय करू शकतात किंवा स्वत:मध्ये असे बदल करु शकतात ज्यामुळे टी-पेशी त्यांना ओळखू शकत नाहीत. सीएआर टी-पेशी उपचार पद्धती ही एक नवी प्रतिक्षमता उपचार पद्धती आहे, जी टी-पेशींची कर्करोगाच्या पेशी ओळखून त्यांचा नाश करण्याची क्षमता पुनर्संचयित करते.

कर्करोगाच्या पेशींवर असलेल्या विशिष्ट प्रथिने किंवा प्रतिजनांस ओळखण्यास आणि संलग्न करण्यास, सीएआर किंवा कायमेरिक प्रतिजन ग्राही (किमेरिक एन्टीजेन रिसेप्टर्स) ही प्रथिने टी-पेशींना मदत करतात. प्रतिजन व ग्राही या दोन प्रथिनांमधील परस्परक्रियांमुळे कर्करोग पेशी नष्ट होतात.

सर्वप्रथम २०१७ मध्ये सादर केलेले सीएआर टी-पेशी तंत्रज्ञान कर्करोगाच्या उपचारांसाठी, विशेषत: श्वेतपेशी कर्करोगासाठी अत्यंत लाभदायक होईल. सध्या ही उपचार पद्धती भारतात उपलब्ध नाही. परदेशात याचा लाभ घेण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात. खासगी क्षेत्रातील एका कंपनी हे तंत्रज्ञान आयात करून भारतीय रूग्णांना ते सुमारे ₹३५ लाख मध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

प्रा. पुरवार आणि त्यांच्या गटाने, प्रत्येक रुग्णासाठी त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट सीएआर टी-पेशी तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. ह्या नवनिर्मित सीएआर टी-पेशींमुळे कर्करोगावरील उपचारांचा खर्च कमी करणे शक्य होईल.

“भारतात विकसित केलेले हे तंत्रज्ञान बहुतांश लोकांना परवडणारे असेल. आयात तंत्रज्ञान वापरुन उपचार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च येऊ शकतो. ह्या नवीन उपचार पद्धतीत औषधाची एकच मात्रा पुरे होते. या पद्धतीने उपचार घेणे आता सुमारे ₹१५ लाख मध्ये शक्य होईल,” असे प्रा. पुरवार म्हणाले.

टी-पेशी सजीव असून त्या शरीरात कायम राहतात त्यामुळे सीएआर टी-पेशींना ‘सजीव औषधे’ असे म्हणतात. ह्या पेशी  रुग्णाच्याच टी-पेशींपासूनच तयार केल्या जातात. ह्या उपचार पद्धतीमध्ये रूग्णाच्या शरीरातून रक्त काढून त्यातील टी-पेशी वेगळ्या केल्या जातात. निरुपद्रवी विषाणूच्या सहाय्याने, त्यात जनुकीय बदल करून सीएआर बनवतात. सीएआर धारण केलेल्या आणि कर्करोगाच्या पेशींवरील प्रतिजन ओळखून त्यांचा नाश करू  शकणाऱ्या ह्या पेशी पुन्हा रुग्णाच्या रक्त प्रवाहात सोडल्या जातात.  

सीएआर टी-पेशी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी, मागील सहा वर्षांपासून प्रा. पुरवार आणि त्यांचा गट योग्य पायाभूत सुविधा उभ्या करणे आणि कर्मचारी व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे यासारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी कार्यरत आहेत. ज्ञान भागीदार म्हणून, राष्ट्रीय कर्करोग संस्थेबरोबर ते अल्पकालीन वैज्ञानिक विनिमय कार्यक्रमात सहभागी झाले. या तंत्रज्ञानाची कार्यक्षमता कशी सुधारता येईल याचा अभ्यास त्यांनी केला. केवळ एकच मात्रा दिल्यावर सुधारित टी-पेशींची वाढ होऊन कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊ शकतात, हे प्रा. पुरवार व त्यांच्या चमूने सिद्ध केले आहे. त्यांनी प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या वाढवलेल्या कर्करोगाच्या पेशींवर याची चाचणी केली आणि उपचाराच्या दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक गुणवत्ता चाचण्या केल्या.

नियामक मान्यतेसाठी भारतीय औषध नियंत्रण व्यवस्था (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) (डीसीजीआय) कडे अर्ज पाठविण्याची योजना आता संशोधक करत आहेत. टाटा मेमोरियल रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या सुरू करण्याची प्रक्रियाही ते सुरू करत आहेत.

“डीसीजीआयच्या मान्यतेनुसार २०२० च्या मध्यापर्यंत किंवा त्यानंतर चाचण्या सुरू होण्याची आमची अपेक्षा आहे,’’ असे प्रा. पुरवार यांनी सांगितले. “हे उत्पादन येत्या दोन वर्षांत बाजारात उपलब्ध होईल,” अशी त्यांना आशा आहे.