चिकित्सकपणे विचार करण्याच्या आपल्या क्षमतेचा उपयोग स्वत:च्या क्षेत्रात प्रगती करण्याबरोबरच विज्ञान समुदायात सुधारणा घडवून आणण्यासाठी करणारे वैज्ञानिक सापडणे दुर्मिळच! भारतीय विज्ञान क्षेत्रातील असे एक दुर्मिळ रत्न काही दिवसांपूर्वी गळून पडले.
२५ ऑक्टोबर २०२४ रोजी रोहिणी गोडबोले यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा आपण खूप काही गमावल्याची तीव्र जाणीव झाली. आम्हा thelifeofscience.com च्या संपदकांसाठी त्या अतुलनीय प्रेरणास्रोत होत्या. भारतातील विज्ञान क्षेत्रात महिलांसाठी जितके रोहिणी यांनी केले, तेवढे कदाचित फारच कमी लोकांनी केले असेल, आणि म्हणूनच त्यांचेआमच्या हृदयातील स्थान अत्यंत विशेष आहे.
१२ नोव्हेंबर २०२४ ला त्या ७२ वर्षांच्या झाल्या असत्या. त्यांच्या स्मृतींना आम्ही उजाळा देत असताना, सर्व ठिकाणहून त्यांना श्रद्धांजली अर्पण होत आहे.
‘लीलावतीज् डॉटर्स’ ह्या विज्ञान संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या महिलांच्या गोष्टी सांगणाऱ्या पुस्तकात रोहिणी स्वत:ची ओळख अशी करून देतात.
“माझे कार्य उच्च-ऊर्जाभौतिकी घटनाशास्त्र (high-energy physics phenomenology) ह्या विषयात आहे. ह्यात निसर्गाचे मूलभूत घटक व ते कसे एकत्र येतात ह्याचा अभ्यास केला जातो.”
खरेतर एक विज्ञानप्रेमी म्हणूनच त्यांना लोकांच्या स्मरणात रहायला आवडेल असे वाटते. मात्र, त्यांच्या योगदानाची व्याप्ती विज्ञानापलिकडे देखील आहे.
ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ घडण्याची नांदी
रोहिणी गोडबोले यांनी भारतीय महिला विज्ञान-संशोधकांसाठी जितके केले, तितकेच त्यांनी भारतातील उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र क्षेत्रासाठी केले.
रोहिणी यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. शैक्षणिक परिवर्तनाची मागणी त्या इथूनच करू लागल्या होत्या. एनसीबीएस आर्काइव्हद्वारे गीता चढ्ढा यांना मिळालेल्या त्यांच्या “माझ्या शाळेत केल्या जाव्यात अश्या सुधारणा” ह्या पत्रात त्यांनी त्यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमात सामान्य विज्ञानापेक्षा जास्त महत्त्व गृहशास्त्राला दिले जाते याबद्दल निषेध व्यक्त केला होता.
“उत्तम गृहिणी होण्यासाठी मुलींना गृहशास्त्र माहित असायला हवे हे बरोबर आहे. पण (सामान्य विज्ञानावर पुरेसा भर नसणे) हा माझ्या माध्यमिक शिष्यवृत्ती मिळवण्या करता अडथळा बनला. गृहशास्त्र शिकवू नये असे मी म्हणत नाही, पण माध्यमिक शिष्यवृत्ती व शालांत (एसएससी) परिक्षेत अधिक चांगले यश मिळवण्यासाठी सामान्य विज्ञान शिकवणेही आवश्यक आहे असे मी सुचविते”, दहावीत असताना लिहिलेल्या पत्रात रोहिणी म्हणतात.
रोहिणी यांनी अनेक शिष्यवृत्ती मिळवल्या. बॅंकेतील उच्च पगाराच्या नोकरीच्या अमिषाला बळी न पडता भौतिकशास्त्रावरील आपल्या प्रेमाचा मार्ग अनुसरत त्यांनी १९७४ साली स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, स्टोनी ब्रुक येथे कण भौतिकशास्त्राच्या संशोधनाला सुरुवात केली. याच वर्षी कण भौतिकशास्त्रातील “नोव्हेंबर क्रांती” घडली, ज्यात सिद्धांत आणि प्रयोगांद्वारे समर्थित अनेक शोध लागले आणि बदल घडले आणि कण भौतिकशास्त्राचे स्टॅंडर्ड मॉडेल (मानक प्रतिमान) निसर्गाचा मूलभूत सिद्धांत म्हणून स्वीकारले गेले.
पदार्थाचे घटक आणि निसर्गातील मूलभूत बल यांच्यातील परस्परसंबंध स्टँडर्ड मॉडेल स्पष्ट करते. स्टॅंडर्ड मॅडेल सिद्धांतानुसार आपले विश्व १७ उप-आण्विक कणांनी बनलेले आहे. या कणांचा आणि बलांचा गुंतागुंतीचा परस्परसंबंध हा त्यापुढे रोहिणी यांच्या अभ्यासाचा विषय आयुष्यभर असणार होता.
स्टँडर्ड मॉडेल आकार घेत असलेल्या वातावरणात रोहिणी एक उत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञ म्हणून घडल्या. २०२१ मध्ये स्टँडर्ड मॉडेलच्या मांडणीसाठी प्रसिद्ध स्टीव्हन वाइनबर्ग यांच्या निधनानंतर त्यांच्यावरील श्रद्धांजलीपर लेखात रोहिणी यांनी वाइनबर्ग यांचे गणितीयदृष्ट्या सुंदर व लक्षवेधी सिद्धांत त्या वेळी चालू असलेल्या प्रयोगांशी कसे जोडले आहेत यावर प्रकाश टाकला. वाइनबर्ग यांच्या कार्याचा प्रभाव त्या काळातील रोहिणी यांच्यासह अनेक तरुण कण-भौतिकशास्त्रज्ञांवर होता याची ग्वाही हा लेख देतो.
मात्र रोहिणी यांचे वैज्ञानिक संशोधन स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडे देखील होते. स्टँडर्ड मॉडेल बऱ्याच गोष्टी स्पष्ट करते, पण तरीही भौतिकशास्त्रातील आजच्या काळातील अनेक अनुत्तरित प्रश्नांचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही, जसे की डार्क मॅटर. डार्क मॅटर रोहिणींच्या संशोधनाचा एक मुख्य विषय होता. स्टँडर्ड मॉडेलमधील एक कण मॉडेलने वर्तवल्यापेक्षा जड असल्याचे आढळले तेव्हा त्यांनी द टेलिग्राफला सांगितले होते, “स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडेही अजून भौतिकशास्त्र आहे (किंवा ह्याच्या उलट, म्हणजे स्टँडर्ड मॉडेल परिपूर्ण आहे) ह्याचा पुरावा लार्ज हॅड्रॉन कोलायडर येथे सापडण्याची आशा आपण सर्वचजण करत होतो.” सुपरसिमेट्रीचा हा रोहिणी यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. सुपरसिमेट्रीची सैद्धंतिक बैठक त्याच्या स्वत:च्या सैद्धांतिक कणांवर आधारित आहे. रोहिणी यांनी मॅन्युएल ड्रीज आणि प्रोबीर रॉय यांच्यासोबत या संकल्पनेवर आधारित पाठ्यपुस्तक लिहिले, ज्यामुळे हे क्षेत्र रोहिणी यांच्या अनेक विद्यार्थ्यांसाठी व सहकाऱ्यांसाठी खुले झाले.
त्यांच्या वैज्ञानिक कामाच्या संदर्भात, त्यांचे लक्ष होते ते बहुचर्चित एलेक्ट्रॉन-पोझिट्रॉन कोलायडर्स सारख्या प्रगत कण-त्वरकांकडे (पार्टिकल कोलायडर्स). भारतीय भौतिकशास्त्र समुदायाने ह्या व अश्या ‘बिग सायन्स’ आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये आघाडीवर असावे व आंतरराष्ट्रीय आणि भारतातीलही प्रकल्पांच्याद्वारे स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडील भौतिकशास्त्राच्या शोधात भाग घ्यावा असा त्यांचा आग्रह होता. यातून हेच दिसते येते की जितके योगदान त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रातील भारतीय महिलांसाठी दिले तितकेच त्यांनी भारतातील उच्च ऊर्जाभौतिकशास्त्राकरिता दिले.
द्रीस-गोडबोले परिणाम
“आमच्या (भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिक) क्षेत्रात सहसा लेखकांची नावे वर्णमालेच्या अनुक्रमाने दिली जातात. (ह्या क्षेत्रातील) सर्वांना माहीत आहे, की माझे योगदान (रोहिणी यांच्यापेक्षा) अधिक नाही. खरं तर आम्हा दोघांचेही योगदान समान आहे,” द्रीस-गोडबोले परिणामाबद्दल मॅन्युएल द्रीस यांचे उद्गार.
रोहिणी यांचे काही महत्त्वाचे वैज्ञानिक सहयोगात्मक कार्य जर्मनीतील बॉन विद्यापीठात कार्यरत असलेले सैद्धंतिक भौतिकशास्रज्ञ मॅन्युएल द्रीज यांच्यासोबत होते. रोहिणी यांच्याबद्दल झालेल्या ई-मेल पत्रव्यवहारात ते रोहिणी यांच्यबरोबर असलेल्या त्यांच्या दीर्घकालीन मैत्रीबद्दल आणि फलदायी सहकार्याबद्दल बोलतात. १९८६ साली जर्मनीतील डॉर्टमुंड येथे मॅन्युएल यांनी आपले पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांची रोहिणी गोडबोले यांच्याशी पहिली भेट झाली.
“तेव्हा आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली नव्हती, पण तेव्हापासूनच त्या मला बरोबरीने वागवत होत्या; हा अनुभव माझ्यासाठी वेगळा होता. माझ्यापेक्षा बऱ्याच वरिष्ठ असूनही त्या मला त्यांच्या बरोबरीची वागणूक देत असल्यामुळे मला आनंद वाटत होता. कालांतराने त्यांचे बरोबरीने वागवणे सवयीचे झाले,” मॅन्युएल यांनी सांगितले.
काही वर्षांनंतर त्यांनी उच्च-ऊर्जा कण त्वरकांमधील (हाय एनर्जी पार्टिकल कोलायडर) कणांच्या परस्परक्रियांचे सैद्धांतिक वर्णन गणितीय रूपात मांडणे सुरू केले. त्यांनी प्रकाशित केलेल्या शोधनिबंधांच्या मालिकेमध्ये, त्यांनी प्रबळ परस्परक्रिया भौतिकशास्त्राच्या (strong interaction physics) आधारे एक परिणाम स्पष्ट केला, जो आज द्रीस-गोडबोले परिणाम म्हणून ओळखला जातो.
“वर्णमालेच्या अनुक्रमाने नावे देण्याची पद्धत असल्याने माझे नाव आधी दिसते, पण याचा अर्थ मी अधिक योगदान दिले असे नाही. आम्ही नेहमी समान भागीदार म्हणूनच काम केले,” मॅन्युएल यांनी स्पष्ट केले.
कण त्वरकांत फोटॉन व हॅड्रॉन एकमेकांवर आदळल्यावर त्यांच्यात होणाऱ्या परस्परक्रियेचे सैद्धांतिक वर्णन द्रीज-गोडबोले परिणामाद्वारे केले आहे. हॅड्रॉनसारखे गुणधर्म प्रकट करण्याचे सुप्त सामर्थ्य फोटॉन मध्ये असते व त्याचे महत्त्व काय ह्याचे वर्णन द्रीज-गोडबोले परिणामात केले आहे. मॅन्युएल यांनी फोटॉनच्या ह्या सामर्थ्याला फोटॉनचे “हॅड्रॉनिक घटक” असे संबोधले आहे.
द्रीज-गोडबोले परिणाम समजावताना मॅन्युएल सांगतात, “आधारभूत स्वरूपात, विद्युतचुंबकीय क्षेत्रात विद्युतभार असलेल्या उपपरमाण्विक कणांच्या परस्परक्रियांमध्ये फोटॉन हॅड्रॉनसारखा वागू शकतो.” रसायनशास्त्रात आपण बघतो की संयुगाचा रेणू ही अणूंची संयोजित रचना असते. त्याचप्रमाणे हॅड्रॉन उपपरमाण्विक कणांची संयोजित रचना असते. उदाहरणार्थ, अणुकेंद्रात असलेला आणि क्वार्कपासून बनलेला प्रोटॉन हा एक प्रकारचा हॅड्रॉन आहे. प्रकाशाचा वाहक म्हणून आपल्याला माहित असलेला फोटॉन वस्तुमानरहित आहे पण उपपरमाण्विक कणांमधील परस्परक्रियांमधील बलवाहक आहे. मात्र, क्वचित फोटॉन हॅड्रॉनसारखा वागतो.”
आपल्या सैद्धांतिक गणनांमध्ये, रोहिणी आणि मॅन्युएल यांना दिसले की जेव्हा फोटॉनचा “हॅड्रॉनिक घटक” सक्रिय होतो, तेव्हा त्याची इतर हॅड्रॉनबरोबरची परस्परक्रिया अत्यंत तीव्र असते.
मॅन्युएल म्हणाले, “लार्ज हॅड्रॉन कोलायडर सारख्या कण त्वरकांमधील निरिक्षणांमध्ये दिसून आल्याप्रमाणे फोटॉन आणि हॅड्रॉन यांच्यातील परस्परक्रियांमध्ये फोटॉनच्या हॅड्रॉनिक घटकाचे योगदान फोटॉनच्या नेहमीच्या परस्परक्रियांच्या योगदानाइतके किंवा त्याहूनही अधिक असते.”
१९९० च्या दशकाच्या सुरुवातीस एका शोधनिबंधांमध्ये रोहिणी आणि मॅन्युएल यांनी दाखवले की फोटॉनचा हा “हॅड्रॉनिक घटक” रेषीय त्वरकांमध्ये (linear colliders) तुलनेने कमी ऊर्जा असलेल्या पायऑन्स (पायऑन हे सर्वात हलके हॅड्रॉन असतात) तयार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवतो.
“खरं तर रेषीय त्वरकांसाठी सुचवलेल्या काही रचनांमध्ये हे कण तयार होण्याची क्रिया इतर प्रतिक्रिया सुरू असताना घडू शकते त्यामुळे ऊर्जाधारक कण अधिक प्रमाणात तयार होऊ शकतात. या कमी-ऊर्जेच्या पायऑन्सच्या पार्श्वभूमीच्या प्रभावामुळे महत्त्वपूर्ण घटनांचे विश्लेषण करणे अधिक कठीण होते,” असे त्यांनी नमूद केले. लार्ज हॅड्रॉन कोलायडरमध्ये ही समस्या नेहमी उद्भवते आणि ती संशोधकांसाठी अडथळा ठरते.
भविष्यातील कण त्वरकांवर या कामाचा प्रभाव काय आहे यावर भाष्य करताना रोहिणी यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “भविष्यातील कण त्वरकांमध्ये फोटॉनच्या परस्परक्रियांचा प्रभाव त्वरकाची रचना करतेवेळीच विचारात घेतला पाहिजे, जेणेकरून भौतिकशास्त्राच्या अभ्यास अचूकपणे करता येईल.”
“आमचे स्थिती अभ्यास आणि सुलभीकरण पद्धती रेषीय त्वरकांच्या रचना अधिक इष्टतम करण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशी आम्हाला आशा आहे.”
‘रोहिणीचा आवाज सतत ऐकू येतो’
“कोणी तरी म्हटले होते की रोहिणी दिसण्यापूर्वी तिचा आवाज ऐकू येतो, अगदी खरे होते ते!” – चयनिका शहा
लार्ज हॅड्रॉन कोलायडर जिनिव्हा, स्वित्झर्लंडमधील सीईआरएन (CERN) येथे आहे. (ह्या संस्थेत २०१२ साली प्रसिद्ध हिग्ज बोसॉनचा शोध लागला) येथील सहकारी आणि मित्र यांनीही रोहिणी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. रोहिणी वारंवार सीईआरएनला भेट देत असत व येथील विविध प्रकल्पांमध्ये व चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत.
सीईआरएन मधील भौतिकशास्त्रज्ञ अर्चना शर्मा रोहिणी ह्यांच्या जवळच्या सहकारी होत्या. रोहिणी ह्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर एका ईमेलद्वारे आपले दुःख व्यक्त करत त्या म्हणल्या, “रोहिणी गोडबोले या एक विलक्षण भौतिकशास्त्रज्ञ आणि अनेकांसाठी प्रिय मैत्रीण होत्या. सीईआरएनला दिलेल्या त्यांच्या प्रत्येक भेटीत त्यांच्या सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील उत्कृष्ट ज्ञान व कौशल्य तर जाणवायचेच, त्याबरोबरच त्यांचा उत्साह आणि निखळ आपुलकीही जाणवत असे.”
त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येक वेळी त्यांना भेटल्यावर त्यांच्या अफाट ज्ञानाने आणि कणभौतिकीची रहस्ये उलगडण्याच्या त्यांची तळमळीने मी प्रभावित होत असे. सीईआरएनच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना त्यांचे योगदान लाभले, व कणभौतिकीच्या सैद्धांतिक चौकटींवरील आमची पकड अधिक घट्ट झाली. त्यांच्या विचारांनी संशोधनाच्या कक्षा रूंदावल्या. त्यांची उपस्थितीने वैज्ञानिक समुदायाला नवीन ऊर्जा देत असे.”
रोहिणी गोडबोले यांना श्रद्धांजली देताना अनेकांनी उल्लेख केला आहे तो त्यांचा उर्जस्वल उत्साह आणि त्यांच्या खणखणीत आवाजाचा. लहान चणीच्या रोहिणी आपल्या खणखणीत आवाजाने अनेकांना आश्चर्यचकित करत असत.
“कोणी तरी म्हटले होते की रोहिणी दिसण्यापूर्वी तिचा आवाज ऐकू येतो, अगदी खरे होते ते!” – चयनीका शहा यांनी रोहिणी यांच्याशी त्रिएस्तेमध्ये झालेल्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना सोशल मीडियावर लिहिलेल्या भावनिक श्रद्धांजलीत लिहिले. चयनिका शहा शिक्षिका, संशोधक व क्विअर-हक्क कार्यकर्त्या आहेत.
चयनीका पुढे लिहितात, “रोहिणी आयआयटी मुंबईच्या माझ्या विभागातील वरच्या वर्गातील विद्यार्थिनी होती. इतर सर्व मुलगे असलेल्या वर्गात एकच उत्साही, अभ्यासू मुलगी असते तेव्हा सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींसारखेच तिच्या भौतिकशास्त्राच्या उत्कृष्ट कौशल्याबद्दल किस्से सांगितले जात.” ह्या दोन भौतिकशास्त्र-प्रेमी भेटल्यावर त्या घट्ट मैत्रिणी झाल्या.
“आमच्या स्त्रीवादाच्या विचारांमध्ये काही साम्यस्थळे होती, तर काहीवेळा आमचे विचार अगदीच वेगवेगळे होते. त्याचप्रमाणे, विज्ञानाबद्दलची आमची समज आणि आवड देखील आम्हाला वेगवेगळ्या वाटांवर घेऊन गेली. मी महाविद्यालयीन शिक्षिका झाले, तर ती एक वरिष्ठ वैज्ञानिक. आज दिवसभर दुःखद अंतःकरणाने आणि प्रेमाने तिचाच विचार करत आहे.”
चयनीका पुढे म्हणाल्या, “नागमोडी वळणं घेत चालू असलेल्या आमच्या अनेक संभाषणांपैकी एकात क्विअर समुदायांबद्दल बोलताना, आम्ही मैत्रीबद्दल बोललो. आपल्या आयुष्याचा भाग असलेले कुणीतरी समाजासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे हे किती छान वाटते व ते आपल्या आयष्यात आल्यामुळे आपले जीवन किती समृद्ध होते याबद्दल बोललो होतो. रोहिणी, तू माझे जीवन समृद्ध केलेस. काश, तुला अजून वेळ मिळाला असता.”
रोहिणी यांच्या मैत्रीची आणि सहकार्याची अनेक वैज्ञानिक फळे मिळली आहेत. मॅन्युएल ड्रीज त्यांच्या पहिल्या पोस्टडॉक्टोरल फेलोशिपसाठी मॅडिसन, यूएसए येथे गेले असताना कण भौतिकशास्त्रातील वरिष्ठ संशोधकांनी आयोजित केलेल्या एका वेगळ्या स्वरूपाच्या विज्ञान परिषदेचे निमंत्रण त्यांनी रोहिणी यांना दिले. नेहमीच्या परिषदांमध्ये संशोधक आधी केलेल्या कामांचे सादरीकरण करतात. ह्या परिषदेमध्ये आधी केलेल्या कामाचे सादरीकरण करण्याबरोबरच अनुत्तरित प्रश्नांवर एकत्रितपणे काम केले गेले. मॅन्युएल सांगतात की रोहिणी ह्यांना हे स्वरूप खूप आवडले आणि भारतात परतल्यावर त्यांनी ‘उच्च ऊर्जाभौतिकी घटनाशास्त्र कार्यशाळा’ (WHEPP, Workshop on High Energy Physics Phenomenology) नावाने अशाच प्रकारच्या कार्यशाळांची मालिका सुरू केली. ही मालिका आजपर्यंत सुरू आहे, आणि जानेवारी २०२४ माध्ये आयआयटी गांधीनगर येथे आयोजित केली गेली.
१९९० ते १९९७ दरम्यान WHEPP मध्ये सहभागी होण्यासाठी मॅन्युएल अनेक वेळा भारतात आले. मॅन्युएल बरेच उंच असल्याने लोक त्यांच्या उंचीबद्दल टिप्पणी करत असत असे त्यांना आठवते; ते सांगतात, “रोहिणीच्या कमी असलेल्या उंचीशी हा छान विरोधाभास होता. WHEPPच्या एका कार्यशाळेत कोणी म्हटले होते: ‘मॅन्युएल कुठूनही दिसतो, मात्र रोहिणीचा आवाज ऐकू येतो.’”
मॅन्युएल यांच्या मते,“या विधानाचा दुसरा भाग तिच्या अदम्य चैतन्याचे प्रतीक आहे: विज्ञानक्षेत्रात तिच्यासाठी गोष्टी सोप्या नव्हत्या, पण तिचा आवाज, तिचे मत नेहमी ऐकले जाईल याची तिने खात्री केली.”
“रोहिणी एक अतिशय चांगली भौतिकशास्त्रज्ञ आणि एक महान व्यक्ती होती. तिची मोठी उणीव मला भासेल,” मॅन्युएल म्हणाले.
रोहिणी आणि द लाइफ ऑफ सायन्स
thelifeofscience.com च्या आम्हा उगवत्या स्त्रीविज्ञानवाद्यांसाठी, रोहिणीशी झालेले संवाद नेहमीच अंतर्मुख करणारे होते. या क्षेत्रात विविधतेचा अभाव असल्याची त्यांना असलेली चिंता कळकळीची होती. त्यांच्या बोलण्याला वजन होते, ज्यामुळे लोकांचे लक्ष या मुद्द्यांकडे वेधले जाऊ शकले. प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्याकडून काहीतरी शिकलो. आता त्या नसतानाही विज्ञानाच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळावी ह्यासाठी आमचा लढा आम्ही सुरू ठेवू. मात्र त्यांची, त्यांच्या योगदानाची पोकळी नेहमीच राहील.
आम्हाला प्रोत्साहन देण्यात त्या कधीही मागे राहिल्या नाहीत. लहान मुलांसाठी आम्ही लिहिलेल्या 31 Fantastic Adventures in Science या पुस्ताकाच्या प्रकाशनाची बातमी आम्ही त्यांना दिली, तेव्हा किती प्रेमाने म्हणाल्या , “तुमचं पुस्तक मी एका लहान मुलीला भेट दिलं आणि तिने मला विचारलं की तिच्या आईबद्दल (ती देखील वैज्ञानिक आहे) पुस्तकात काही का लिहिले नाही? तेव्हा भविष्यात तुम्हाला काय काम करायचे आहे त्याची रूपरेषा तुम्हाला मिळाली आहे. उत्तम कामाबद्दल तुमचे अभिनंदन!”
विज्ञानाचे क्षेत्र लिंग-समान व्हावे यासाठी रोहिणी यांनी मांडलेल्या ठोस कल्पनांची संपूर्ण यादी खूपच मोठी आहे. त्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या अभ्यासांतील निकालांची खालील उदाहरणे त्यांच्या लिंगभेदासंदर्भातील सूज्ञ दृष्टिकोनाची साक्ष देतात.
रामकृष्ण रामस्वामी आणि रोहिणी गोडबोले यांनी लिहिलेल्या “वूमन सायंटिस्ट्स इन इंडिया (भारतातील महिला वैज्ञानिक)” (२०१८) अहवालाचा काही भाग:
- शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांमधील विज्ञान शिकण्यात आणि शिकवण्यात महिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.
- मात्र, वैज्ञानिक संशोधन करणाऱ्ऱ्या, म्हणजे व्यवसायाने वैज्ञानिक असलेल्या महिला कमी आहेत.
- विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांची शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून टक्केवारी संस्थेच्या वाढत्या प्रतिष्ठेनुसार आणि पदाच्या उच्चतेनुसार कमी होत जाते.
आमचे पुस्तक, Labhopping (लॅबहॉप्पिंग) मधून एक उतारा (प्राथमिक स्रोत: कुरूप, ए., मैत्रेयी, आर., कांताराजू, बी., आणि गोडबोले, आर. (२०१०). प्रशिक्षित वैज्ञानिक महिला-शक्ती: आपण काय गमावत आहोत आणि का?):
- १४% संशोधक महिला अविवाहित राहिल्या, मात्र केवळ २.५% पुरुष संशोधक अविवाहित आहेत.
- ८६% पुरुष वैज्ञानिकांच्या तुलनेत ७४% महिला वैज्ञानिकांनी मुलं असल्याचे सांगितले.
- संशोधन करणाऱ्यांपैकी आठवड्याचे ४०-६० तास काम करणाऱ्या महिलांची टक्केवारी जास्त आहे; तर आठवड्यात ४० तासांपेक्षा कमी काम करणाऱ्या परुषांची टक्केवारी जास्त आहे.
- अधिकांश महिलांना लवचिक वेळापत्रक, वाहतूकीची साधने, निवास व्यवस्था आणि मुलांसाठी पाळणाघर, असे संस्थात्मक घटक त्यांचे सध्याचे पद स्विकारण्यासाठी महत्त्वाचे वाटले. त्यांना सध्याच्या वैज्ञानिक पदांवर काम करण्यासाठी प्रेरित केलं ते अश्या घटकांनी. महिलांच्या तुलनेत जास्त पुरुषांनी आणखी चांगल्या संधीसाठी त्यांचे आधीचे पद सोडले.
याशिवाय, सुमारे शंभर भारतीय वैज्ञानिक महिलांच्या चरित्रांचा आणि आत्मचरित्रांचा संग्रह असलेल्या, रोहिणी यांच्या Lilavati’s Daughters (लीलावतीच्या कन्या) या पुस्तकाने भारतातील विज्ञान समुदायाला महिलांच्या विज्ञानक्षेत्रातील स्थानाकडे लक्ष देण्यास भाग पाडले.
ह्या सर्व कथा कधीच सांगितल्या गेल्या नव्हत्या. रोहिणी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच त्या आपल्यापर्यंत पोचल्या. ह्या पुस्तकात आणि A Girl’s Guide to A Life in Science ह्या त्यांच्या लहान वाचकांसाठीच्या संस्करणात, खगोलभौतिकशास्त्रज्ञ असलेल्या प्रज्वल शास्त्री यांच्यावरील लेख आहे. हे लेख लोकांसमोर आणण्यासाठी रोहिणी यांनी केलेल्या प्रचंड प्रयत्नांबद्दल बोलताना प्रज्वल यांनी सांगितले की लिहिण्याकरिता त्यांना रोहिणी सौम्यपणे ढकलत राहिल्यामुळेच त्यांना त्यांचा लेख लिहून पूर्ण करता आला.
शैक्षणिक खेळणी बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले लोकप्रिय शिक्षक अरविंद गुप्ता यांना, भारतीय वैज्ञानिकांबद्दल ते स्वत: लिहित असलेल्या पुस्तकासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने, डॉ. मंगला नारळीकर यांनी २००८ साली हे पुस्तक भेट दिले. पुस्तकाने दिलेल्या दृष्टिकोनाने ते “अचंबित” झाल्याचे त्यांना आठवते.
“[Lilavati’s Daughters] हे पहिले पुस्तक होते ज्यामध्ये भारतीय महिला वैज्ञानिकांच्या गोष्टी त्यांच्या शब्दांत सांगितल्या होत्या. मला ते खूपच आवडले. काही लेख मोठे तर काही छोटे होते – प्रत्येकाची शैली वेगळी होती. यामुळे पुस्तक अधिक आकर्षक बनले,” ते म्हणाले.
रोहिणी यांचा वारसा जिवंत रहावा म्हणून अरविंद आता हे पुस्तक हिंदी आणि मराठीत भाषांतरित करत आहेत.
अरविंद म्हणाले, “Lilavati’s Daughters हे संपूर्णपणे सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करणे दोन कारणांसाठी महत्त्वाचे आहे. १. कै. प्रोफेसर रोहिणी गोडबोले यांना ही एक खरी आणि शाश्वत श्रद्धांजली असेल. २. ह्याद्वारे भारतीय महिला वैज्ञानिकांच्या भूमिकेचे आणि योगदानांचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट येईल. हा प्रकल्प यशस्वी होण्यास मी मदत करू शकेन अशी मला आशा आहे.”
आपल्यापैकी ज्या कुणाला रोहिणी यांच्या सौम्य तरीही ठाम स्वभावाचे दर्शन झाले आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या मनात रोहिणी यांचे सशक्त जगाचे स्वप्न पुढे नेण्याची इच्छा आहे. रोहिणीसारख्या एका महाकाय व्यक्तिमत्त्वाचा स्मरणोत्सव साजरा करण्यासाठी, आपल्याला दीर्घकाळ आपले प्रयत्न सुरू ठेवणे आवश्यक आहे.
टीप: या लेखासाठी प्रमुख चित्र आयेशा पंजाबी यांनी रेखाटले आहे.
हे भाषांतर आरती हळबे यांनी केले.
मूळ इंग्रजी लेख स्त्रीवादी माध्यम प्रकल्प द लाईफ ऑफ सायन्स येथे प्रकाशित झाला आहे व त्यासाठीचे संशोधन व लेखन द लाईफ ऑफ सायन्सच्या संस्थापिका आशिमा डोग्रा यांनी केले आहे.