तारा ॲपद्वारे देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये घेतल्या गेलेल्या वाचनाच्या चाचण्यांमध्ये ७ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग.

पुण्यातील टेकड्यांचे भविष्य – माळरान की वनराई

Read time: 1 min
पूणे
24 जुलै 2018
पुण्याची वेताळ टेकडी आणि पर्वती टेकडी. छायाचित्र सौजन्य: आशिष नेर्लेकर

Editor's Note: This is a translated version of the article that has been published in The Wire written by Priyanka Runwal and Ashish Nerlekar. We have the same mentioned in Marathi at the end of this article. This is published with permission for translating it in Marathi.

१९७१ साली पुण्याच्या टेकड्यांचा उल्लेख करत विल्सन कॉलेज, बॉम्बे (आताची मुंबई) येथील वनस्पतीशास्त्रज्ञ मॉझेस म्हणतात, “(वनस्पती) संग्राहक आणि वर्गीकी तज्ञांकडून (टेक्सोनोमिस्ट) इतके महत्त्व लाभलेली जागा पुण्याजवळील टेकड्यांशिवाय मुंबई प्रांतात दुसरी नाही.”

या टेकड्या पुणेकरांना वेताळ टेकडी आणि पर्वती टेकडी म्हणून परिचित आहेत. झपाट्याने वाढत चाललेल्या शहरातील या जागा म्हणजे जॉगर्स आणि निसर्गप्रेमींसाठी जणू मोकळा श्वासच. या जागांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा जिव्हाळा आणि प्रचंड अभिमान आहे. म्हणूनच या टेकड्यांचे वर्तमान आणि भविष्य ठरविण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

उदाहरणार्थ, या टेकड्यांना कापून जाणाऱ्या पौड-बालभारती लिंक रोडला नागरिकांनी केलेल्या जोरदार विरोधामुळेच पुणे महानगरपालिकेला या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा लागला. याचप्रमाणे टेकड्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सीमा ठरवण्यासाठी कॉंक्रीट भिंती उभारण्याच्या वन विभागाच्या योजनेलाही तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. याशिवाय, टेकड्यांवरील प्रतिबंधित प्रवेश, तेथील परिस्थितीकी आणि जैवविविधतेचा नाश तसेच एका नागरी समूहाकडून राबविण्यात आलेले वनीकरण उपक्रम, हे सर्वच येथे वादाचे मुद्दे ठरले आहेत.

पुण्यातील टेकड्यांच्या वनीकरणाचा इतिहास

या टेकड्यांच्या वनीकरणाचे प्रयत्न काही नव्याने सुरु झालेले नाहीत. याचा पुरावा सापडतो तो मुंबई प्रांतातील विभागीय वन अधिकारी ई.ए. गार्लंड आणि मुंबई सरकारचे आर्थिक वनस्पतीशास्त्रज्ञ, डब्ल्यू बर्न्स यांच्यातील संवादात. “या भागात (भांबुर्डा-वेताळ टेकडी) १८७९ साली वनीकरण करण्यात आले. साग आणि चंदन लागवडीचे काही प्रयोग अधूनमधून झाले असावेत, परंतु अशा कामांच्या कोणत्याही (पूर्व) नोंदी उपलब्ध नाहीत आणि सध्याची झाडे पाहता या वनीकरणातून फारसे काही साध्य झाल्याचेही दिसत नाही.”

ब्रिटीशांच्या या अयशस्वी प्रयत्नांची जागा पुढे वनविभागाच्या प्रयत्नांनी घेतली. वनविभागाच्या १९५० मधील एकसुरी वृक्षलागवडीचा परिणाम म्हणून १९६४ पर्यंत वेताळ टेकडीवर गिरिपुष्प (Gliricidia sepium) या विदेशी झाडाची दाट राई निर्माण झाली. १९७३ साली पर्वती टेकडीवरही वनविभागाकडून मुख्यत्वे विदेशी तसेच काही देशी झाडांची लागवड करण्यात आल्याच्या नोंदी सापडतात.

ब्रिटीश हे लाकूड उत्पादन या एकमेव उद्देशाने वृक्षलागवड करीत. स्वातंत्र्योत्तर काळात तिचे रुपांतर मृदापोषक, सरपण आणि चारा देणाऱ्या वृक्षलागवडीत झाल्याचे दिसून येते. त्याही पुढे १९७० नंतर वनीकरण प्रदर्शन आणि नागरिकांच्या करमणुकीसाठी उद्याने विकसित करण्याकडे कल झुकत गेल्याचे दिसते.

वनस्पतीशास्त्रज्ञ आणि उद्यानशास्त्रज्ञांच्या सुरुवातीच्या प्रकाशनांत या प्रयत्नांकडे यशोगाथा म्हणून पाहिले गेले. “मुळच्या उजाड टेकडीचे रूपांतर एका सुंदर निसर्गोद्यानात झाले आहे.” अशा वाक्यांतून हे सिद्ध होते.

परंतु या हस्ताक्षेपांपूर्वी या टेकड्यांचे “मूळ” स्वरूप कसे होते याबद्दल कितपत माहिती उपलब्ध आहे? खरं म्हणजे बऱ्यापैकी!

एकसुरी वृक्षलागवडीपूर्वीचा काळ

या टेकडीवर तुरळक आणि शुष्क परिस्थितीत वाढू शकणाऱ्या वनस्पती (xerophytic) असल्याची टिप्पणी मॉझेस एझिकेलने १९१७ मध्ये करून ठेवलेली आहे. त्याने या ठिकाणी निवडुंगासारख्या वनस्पती, पानझडी झुडुपे आणि वृक्ष, गवत तसेच अल्पजीवी वनस्पती असल्याची नोंदही केलेली आहे. भांबुर्डा-वेताळ टेकडीच्या संदर्भात बर्न्स १९३१ साली लिहितात, “येथील झाडांदरम्यान बरेच अंतर असल्यामुळे त्यांच्यामध्ये गवताच्या वाढीला भरपूर वाव मिळतो.”

येथे असलेल्या झाडांत साधारणपणे साळई (Boswellia serrata), धावडा (Anogeissus latifolia), मोई/शिमटी (Lannea coromandelica), ऐन(Terminalia tomentosa), गणेरी (Cochlospermum religiosum) आणि बिजा/बिबळा (Pterocarpus marsupium) यांचा समावेश होता.

१९२६ साली वेताळ टेकडीच्या (भांबुर्डा) आसपास असलेली वैशिष्ट्यपूर्ण गवताळ वनस्पती. सौजन्य: बर्न्स १९३१

वेताळ टेकडीच्या या छायाचित्रात तुरळक खुरटी झाडे आणि झुडुपांच्या खाली पसरलेले गवत स्पष्टपणे दिसत आहे. यातून हेही स्पष्ट होते की या विशिष्ट गवताळ परिसंस्था आहेत, ज्याठिकाणी झाडे-झुडुपे ही गवताळ पट्ट्यात विखुरलेली असतात. ती दाट जंगलांसारखे वृक्षाच्छादन तयार करीत नाहीत.

शिवाय, येथील सांस्कृतिक पुरावेही पूर्वी येथे गवत-प्रधान परिसंस्था होत्या हेच सिद्ध करतात. या ठिकाणी मायक्रोलिथ म्हणजे सूक्ष्मशिला(microlithis) सापडल्या (अशी दगडी हत्यारे धनगर वापरत असत) त्यावरून दिसून येते की गेल्या २,०००-३,००० वर्षांपासून या टेकड्यांचा वापर गुरे चारण्यासाठी होत असावा. तसेच वेताळ टेकडी आणि तिच्या आसपासच्या टेकड्यांवरील म्हसोबा, खंडोबा आणि वेताळ या पशुपालक दैवतांची मंदिरेही पुन्हा हाच संबंध अधोरेखित करतात.

ब्रिटीशकालीन वनाधिकाऱ्यांना गवतापेक्षा झाडे जास्त महत्त्वाची वाटत. गुरे चरायला नेल्यामुळे वनीकरणात अडथळा येतो असा त्यांचा समज होता. निसर्गतः विरळ झाडे असलेल्या परीसंस्थांपेक्षा दाट झाडी असलेल्या जंगलांना जास्त महत्त्व देण्याची आजही दिसणारी ही मानसिकता आपल्या शासकीय यंत्रणेत निश्चितपणे तेथूनच झिरपत आलेली आहे.

परंतु आता ही मानसिकता वनविभागापुरती मर्यादित राहिलेली नसून ती सर्वत्रच दिसते आहे. वृक्षलागवड हा आजकालच्या पर्यावरणीय चळवळींचा, मुख्यत्वे वातावरण बदलाशी (climate change) लढण्याचा, प्रमुख मुद्दा बनला आहे.

हरितीकरणाचे ध्येय

गेल्या दशकात अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरी समूहांच्या नेतृत्त्वाखाली पुण्याच्या टेकड्यांवर वनीकरण करण्याची एक नवी लाट आली आहे ( येथे, येथे आणि येथे पहा). यात मुख्यत्वे ज्या वृक्षांची निवड केली गेली त्यांची यादी अशाच एका गटाकडून जाहीर करण्यात आली आहे. यातील काही मूळ भारतीय तर काही गिरिपुष्प (Gliricidia sepium) आणि सुबाभूळ (Leucaena leucocephala) यांसारख्या विदेशी प्रजाती आहेत. ज्यातील दुसरी (सुबाभूळ) ही जगातील सर्वाधिक आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते.

करंज (Pongamia pinnata) लागवडीसाठी बाणेर-पाषाण टेकडीवर खोदण्यात आलेले सलग समतल चर. सौजन्य: आशिष नेर्लेकर

लॉ कॉलेज टेकडीवर खैराच्या (Acacia catechu) झाडांदरम्यान खननयंत्राद्वारे खोदण्यात आलेले खड्डे. सौजन्य: आशिष नेर्लेकर

उपरोक्त बाबींच्या शीघ्र विश्लेषणातून काही गोष्टी स्पष्ट होतात:

  1. या टेकड्यांना अधिकाधिक हिरव्यागार करणे हे अशा उपक्रमांचे सगळ्यात पहले उद्दिष्ट आहे.
  2. वृक्ष लागवडीसाठी लागणारा निधी आणि या कार्यावर श्रद्धा असलेल्या, चांगल्या उद्देशाने काम करणाऱ्या लोकांचा स्वयंस्फूर्त सहभाग - या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत.
  3. वृक्षलागवडीसाठी मूळच्या प्रजाती निवडणे हे पर्यावरणीयदृष्ट्या चांगले आहे याची समज या लोकांमध्ये आहे. परंतु सध्या ते ज्या प्रजातींची लागवड करीत आहेत त्यांचे या टेकड्यांवर निसर्गतः उगवणाऱ्या प्रजातींशी अत्यल्प साम्य दिसून येते.

अशाप्रकारचे उपक्रम या परिसंस्थेच्या मुलभूत स्वरुपात बदल घडवून आणत आहेत, अर्थात विरळ वृक्ष आणि गवत यांच्या मिश्र परिसंस्थेचे रूपांतर दाट वनात करीत आहेत आणि या बदलांमुळे सध्या अस्तित्त्वात असलेली स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे. उदाहरणार्थ, १९९१ ते १९९७ दरम्यान येथे झालेल्या वनस्पती सर्वेक्षणांच्या अभ्यासातून येथील ७२ मूळ प्रजाती नामशेष झाल्याचे आढळून आले. ज्यात प्रामुख्याने कंदवर्गीय वनस्पती (दीपकाडी-Dipcadi montanum, खर्चुडी-Ceropegia bulbosa, शेपूट-हबेअमरी-Habenaria longicalcarata इत्यादी) आणि काही पानझडी वृक्षांचा (मोखा-Schrebera swietenioides, काकड-Garuga pinnata, चारोळी-Buchanania lanzan इत्यादी) समावेश होतो.

मोखा (Schrebera sweitenioides)-१९०२ आणि किर्कुंडी (Jatropha nana)-१८७८ यांचे वेताळ-चतुःशृंगी टेकड्यांवरून गोळा करण्यात आलेले नमुने. येथून त्यांचा सातत्याने ऱ्हास होत चालल्याचे दिसत आहे. सौजन्य: फर्ग्युसन कॉलेज, पुणे आणि रॉयल बॉटनिकल गार्डन, कीव.

उपरोक्तपैकी काही प्रजातींची वाढ सावलीत चांगल्याप्रकारे होत नसून त्यांना स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते हे देखील आता स्पष्ट झाले आहे. शिवाय समतल चर केल्याने मातीच्या सर्वात वरच्या थराला उपद्रव होतो आणि उथळ मातीत वाढणाऱ्या प्रजातींचा (उदा. कंदवर्गीय वनस्पती, गवत) नाश ओढवू शकतो तसेच भविष्यात उगवू शकणाऱ्या वानिस्पतींच्या बियादेखील यामुळे नष्ट होतात.

पुण्यातील टेकड्यांचे भविष्य

विरळ आणि खुरटी झाडे असलेल्या परिसंस्था या ‘जंगल’ नसल्यामुळे ‘उजाड’ आणि ‘नापीक’ असतात अशी संकल्पना झाल्यामुळे टेकड्यांचे संरक्षण, संधारण व उद्धार करण्यासाठी गर्द झाडी लावणे आवश्यक आहे असा दृष्टीकोन पुढे आलेला असण्याची शक्यता आहे. परंतु ऐतिहासिक पुरावे दर्शवतात की या टेकड्यांवर खूप पूर्वीपासून विरळ झाडे असलेल्या परिसंस्थाच होत्या. शुष्क वातावरणात वाढणाऱ्या आणि पातळ भूस्तराशी जुळवून घेतलेल्या वनसपतींसाठी या टेकड्या अगदी योग्य आहेत.

उन्हाळ्यात पानझडी वृक्षांची पाने झडतील आणि गवत वाळून जाईल. या टेकड्या वर्षभर हिरव्यागार दिसणार नाहीत. परंतु हेच तर या नैसर्गिक संस्थेचे जैविक स्वरूप आहे. टेकड्यांचे हरितीकरण करण्याच्या या अट्टहासापायी आपण हळूहळू अशा प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आणि त्याच बरोबर कदाचित त्यांच्यावर अवलंबून असलेली इतर जैवविविधताही गमावून बसू. जबाबदार नागरिक म्हणून, या टेकड्यांच्या नैसर्गिक रचनेत आपल्याला किती आणि कुठवर हस्तक्षेप करायचा आहे याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा. या प्रदेशातील समृद्ध पर्यावरणीय आणि सांस्कृतिक वारश्याचे भान आपण ठेवायला हवे. या टेकड्यांवरील मूळच्या वनस्पतींची माहिती उपलब्ध असल्यामुळे, येथे कोणत्या वनस्पतींची लागवड केली जाऊ शकते याची यादी आम्ही खाली देत आहोत. अशी लागवड करणे आवश्यक वाटलेच तर या यादीचा वापर करावा.

(यातील बऱ्याचशा प्रजाती या मंदगतीने वाढणाऱ्या आहेत. त्यामुळे परिणाम दिसेपर्यंत वेळ लागेल हे लक्षात घेऊन धीर बाळगावा. लागवड करतांना झाडे एकमेकांपासून लांब (कमी घनतेने) लावावीत. दोन रोपांमधील अंतर कमीतकमी १५-२० मीटर इतके असावे).

लागवड करण्यायोग्य वनस्पती

तक्ता सौजन्य: प्रियंका रुणवाल, आशिष नेर्लेकर

प्रियंका रुणवाल या पुण्याच्याच असून सध्या त्या राष्ट्रीय जैवविज्ञान केंद्र, बंगळूरू (National Centre for Biological Sciences, Bengaluru) येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्या शुष्क गवताळ प्रदेश आणि माळरानांच्या सामाजिक आणि पर्यावरणीय पैलूंचा अभ्यास करीत आहेत.

आशिष नेर्लेकर हे पुणेस्थित वनस्पतीशास्त्रज्ञ असून गवताळ प्रदेशांच्या अभ्यासाची त्यांना विशेष आवड आहे. पुण्यातील टेकड्यांवरील किर्कुंडी (Jatropha nana)या लुप्त होत असलेल्या वनस्पतीचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.

हा लेख प्रथम इंग्रजीत द वायर या संकेतस्थळावर प्रकाशित झाला होता.