जलाशयांच्या पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानाची नोंद व निरीक्षण करणारे आयआयटी मुंबईचे नवे वेब ॲप्लिकेशन - ‘इम्पार्ट’ - हवामानातील बदलांचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त.

वातानुकूलन यंत्रणा निवडताना तार्‍यांची मदत घ्या!

Read time: 1 min
मुंबई
16 ऑगस्ट 2018
छायाचित्र : आरती हळबे, गुब्बी लॅब्स

ऊर्जा कार्यक्षमपणे वापरणार्‍या उपकरणांमुळे कमी प्रदूषण होते आणि प्रदूषणामुळे पर्यावरणात होणारे बदल टाळता येतात. २००६ साली भारत सरकारने उपकरणांची ऊर्जा कार्यक्षमता प्रदर्शित करण्यासाठी उपकरणांवर 'स्टार रेटिंग' चिन्हे लावण्याची योजना सुरू केली. पुर्वी ऐच्छिक असलेली ही योजना काही मोजक्या उपकरणांसाठीच लागू होती, पण आता वातानुकूलन यंत्रणा व 'फ्रॉस्ट-फ्री' फ्रीज सारख्या काही उपकरणांसाठी ही चिन्हे वापरणे अनिवार्य केले आहे. नवीन उपकरण विकत घेताना ग्राहकांच्या निर्णयावर ह्या चिन्हांचा किती प्रभाव पडतो ह्याचा अभ्यास भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई ह्यांनी केला, ज्यात असे दिसून आले की साधारणपणे तारांकित वातानुकूलन यंत्रणा विकत घेणे ग्राहक पसंत करतात आणि ऊर्जा कार्यक्षम यंत्रणेसाठी अधिक किंमत मोजायला पण तयार असतात.

संख्याशास्त्र व प्रकल्प अंमलबजावणी मंत्रालयाच्या एका अहवालानुसार,भारतात वापरल्या जाणार्‍या एकूण विजेपैकी २२% वीज रहिवासी क्षेत्रात वापरली जाते. वर्तमान काळात वातानुकूलन यंत्रणा वापरणे लोकप्रिय होत आहे. ही यंत्रणा सर्वाधिक वीज वापरणार्‍या उपकरणांमध्ये मोजली जाते व तिच्या वापरामुळे विजेच्या बिलावर खूप मोठा प्रभाव पडू शकतो. कार्यक्षमपणे ऊर्जा वापरणारी वातानुकूलन यंत्रणा बसवल्यास विजेचा वापर आणि खर्च दोन्ही कमी होतात. ग्राहकांना ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी, कुठले उपकरण किती वीज वापरते ह्याबद्दल माहिती देणे ऊपयुक्त ठरू शकते. एक तारांकित (सगळ्यात कमी ऊर्जा कार्यक्षम) पासून पंचतारांकित (सर्वाधिक ऊर्जा कार्यक्षम) चिन्हे बघून, विविध उपकरणांची तुलना करून ग्राहक योग्य निर्णय घेऊ शकतात.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या 'सेंटर फॉर टेक्नॉलजी ऑल्टरनेटिव्ह्स फॉर रूरल एरियास' आणि 'इंटरडिसीप्लिनरी प्रोग्राम इन क्लायमेट स्टडीस' मधील संशोधकांनी प्राध्यापक आनंद राव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वरील अभ्यास केला आहे. १.५ टन विभाजित वातानुकूलन यंत्रणा निवडताना ग्राहकांचे कुठले निकष असतात ह्याचा अभ्यास संख्याशास्त्रातील त्यांनी साधने वापरुन केला. १४८ व्यक्तींनी विविध काल्पनिक परिस्थितीसाठी प्रत्येकी ८ प्रतिसाद दिले. अशा ११८४ प्रतिसादांचे संशोधकांनी विश्लेषण केले. वातानुकूलन प्रणालीची विविध वैशिष्ट्ये, जसे ब्रॅंड, एयर फिल्टर, आवाजाची पातळी, स्टार रेटिंग इत्यादी पैकी ग्राहक कशाला प्राधान्य देतात ह्याचे विश्लेषण त्यांनी केले.

सर्वेक्षणात भाग घेणार्‍या ७०% लोकांना स्टार रेटिंगबद्दल माहित होते, आणि ४८% लोकांचा विश्वास होता की अधिक रेटिंग असलेली उपकरणे कमी वीज वापरतात. असेही दिसले की ६९% व्यक्तींना २ तारांकित यंत्रणेपेक्षा ३ तारांकित यंत्रणा अधिक पसंत होती आणि ७८% व्यक्तींना २ तारांकित यंत्रणेपेक्षा पंचतारांकित यंत्रणा अधिक पसंत होती. त्याचबरोबर ८५% लोकांचे मत होते की यंत्रणेवर स्टार रेटिंग असायला हवे.
अभ्यासात असे निदर्शनास आले की स्टार रेटिंग असलेली वातानुकूलन यंत्रणा विकत घेण्यासाठी ग्राहक ₹१२५०० पर्यन्त जास्त रक्कम देण्यास तयार होते. ह्या विपरीत विशिष्ट ब्रॅंडसाठी फक्त ₹९००० जास्त द्यायची ग्राहकांची तयारी होती. त्याचबरोबर, ३ तारांकित यंत्रणेच्या तुलनेत पंचतारांकित यंत्रणा विकत घेण्यासाठी लागणारी अतिरिक्त रक्कम द्यायची ६२% ग्राहकांची तयारी होती. अभ्यासात असा निष्कर्ष निघाला की घरातील विजेचा मासिक वापर १०० किलोवॉटतास पेक्षा अधिक असेल तर ही अतिरिक्त गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी अभ्यासाच्या निष्कर्षांचा उपयोग कसा करता येईल ह्याबद्दल बोलताना अभ्यासाच्या लेखिका डॉ. मनीषा जैन म्हणाल्या, "वातानुकूलन यंत्रणांवरील स्टार रेटिंग आणि कार्यक्षमतेची इतर मानके प्रभावी ठरतात ह्याचा पुरावा आपल्याला अभ्यासात सापडला. आजपर्यंत अशा चिन्हांचा ग्राहकांच्या निर्णयावर किती प्रभाव पडतो ह्याचा अभ्यास फक्त गुणात्मक पद्धतीने केला गेला होता. पण ह्या अभ्यासामुळे आपल्याला प्रत्यक्ष अंकांच्या मदतीने चिन्हांचा प्रभाव समजतो."

नियमांनुसार निर्माण केलेले ग्राहक शिक्षण कार्यक्रम हळू हळू प्रभावी ठरत आहेत कारण भारतीय ग्राहक जागरूक होत आहे हे ह्या अभ्यासातून कळते. अभ्यासाचे लेखक म्हणतात, "वातानुकूलन यंत्रणांवरील स्टार रेटिंग आणि कार्यक्षमता निर्देशित करणारी इतर मानके असली की ग्राहक आपोआप ऊर्जा कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा विकत घेण्यास प्रवृत्त होतात. म्हणून सरकारने ह्या बाबतीत अधिक हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, फक्त मानके अधिक बळकट करायला पाहिजे". संशोधकांचा विचार आहे की हाच अभ्यास पुढे वाढवून कुटुंबाचे उत्पन्न, शिक्षण आणि इतर वैशिष्ट्ये ह्यांचा ऊर्जा कार्यक्षम यंत्रणा निवडण्याशी काय संबंध आहे ह्यावर संशोधन करावे म्हणजे ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशिष्ट कार्यक्रम निर्माण करता येतील.