भारतीय वैज्ञानिक समुदायाला अभिमान वाटेल असा मोठा बौद्धिक वारसा मागे ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या कणभौतिकशास्रज्ञ

हवामान बदलांमुळे भारतातील बंदरांवर होतोय परिणाम

मुंबई
31 ऑक्टोबर 2018

मानव प्रेरित वातावरणातील बदलांचा एक लक्षणीय परिणाम म्हणजे जगभरातील किनारपट्ट्यांमध्ये होणारा बदल. उत्तम किनारपट्ट्या असलेल्या अनेक शहरांना वारा आणि समुद्रातील लाटा आणि प्रवाह यांच्या तीव्रतेत व प्रकारात होणाऱ्या बदलांमुळे धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलाचा परिणाम नेमका कशाप्रकारे बंदरांवर होतो? या बदलणाऱ्या हवामानाच्या परिणामांचा सामना नेमका कशा प्रकारे करायला हवा? भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी वातावरणीय प्रतिरूपाचा  उपयोग करून, प्रामुख्याने पारादीप बंदराची किनारपट्टी लक्षात घेत, पूर्वी किनारपट्ट्या कशा होत्या व त्या कश्या रीतीने बदलू शकतील याचा अभ्यास केला आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात  वाऱ्याचा वेग व लाटांची उंची वाढू शकते तसेच किनारपट्टीवरील वाळूतही वाढ होऊ शकते.

खोल पाणी असलेले पारादीप बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोलकाता ते विशाखापट्टणम या दोन शहरांच्या  मार्गमध्यात वसलेले आहे.  पूर्वी दलदलीचा प्रदेश असलेल्या या भागात स्थानिक लोक मासेमारी करत आणि लाकूडफाटा गोळा करत. ६० वर्षांपूर्वी कार्यरत झालेले हे बंदर आज भारताचे आठव्या क्रमांकाचे बंदर आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत ही किनारपट्टी आणि हे बंदर स्थिर आहेत. परंतु अलीकडील वर्षांत हवामान बदलांमुळे इथे मातीची मोठ्या प्रमाणात झीज आणि भर होते आहे. इथे सरासरी हवामानातील जास्त कालावधीत (१० वर्षांहून अधिक)  होणारा बदल लक्षात घेतला आहे. यामध्ये समुद्र आणि जमिनीच्या तापमानात, वाऱ्याची तीव्रता व स्वरूप आणि पर्जन्यमान या घटकांमध्ये होणाऱ्या बदलांचा समावेश होतो.

"हवामानातील बदलाचा प्रभाव स्थानिक असून तो जागा किंवा प्रदेश यांवर अवलंबून असतो. जसे बदल इंग्लंड किंवा दुबईच्या किनारपट्ट्यांवर होतील तसेच बदल भारताच्या किनारपट्ट्यांवर होतील असे नाही. आपल्याला सुमारे ७००० किमी किनारपट्टी लाभलेली आहे आणि हवामानातील बदलांचा परिणाम हा संपूर्ण किनारपट्टीवर एकसारखाच असेल असे नाही", असे या अभ्यासाचे मुख्य संशोधक प्राध्यापक मकरंद देव यांनी नमूद केले आहे.

या अभ्यासाकरिता जे वातावरणीय प्रतिरूप वापरले आहे ते कॉर्डेक्स (कोऑर्डिनेटेड रिजनल क्लायमेट डाउनस्केलिंग एक्सपेरिमेंट) या प्रकल्पाद्वारे जागतिक हवामान संशोधन कार्यक्रमांतर्गत विकसित केले गेले. संशोधकांनी  दोन कालखंडांसाठी म्हणजे  १९८१ ते २००५ आणि २०११ ते २०३५, समुद्रातील लाटांचे सिम्युलेशन करून गाळ व मातीचे वहन आणि किनारपट्ट्यांमधील बदल कसे होतील याचा अंदाज वर्तवला. या अभ्यासामध्ये त्यांनी असे गृहीत धरले की पुढील २५ वर्षांत या किनारपट्टीवर कोणतेही बांधकाम किंवा विकासात्मक उपक्रम होणार नाहीत आणि ग्लोबल वॉर्मिंग मुळे समुद्र पातळीत झालेली वाढ किमान असेल. पारादीप बंदरात अपेक्षित असलेले बदल संशोधकांनी नमूद केले आहेत.

अभ्यासाची व्याप्ती समजावून सांगताना प्राध्यापक देव म्हणतात "किनारपट्टीवर होणारा हवामानातील बदलाचा परिणाम हा फक्त महासागराच्या घटकांपुरताच मर्यादित नसतो. आपल्याला सामाजिक-आर्थिक घटक जसे कि भविष्यात किनाऱ्यालगत वाढणारी लोकसंख्या, वाढणारे रस्ते, पायाभूत सुविधा, पर्यटन इत्यादींचा देखील अभ्यास करायला हवा."

पारादीप बंदरावर येत्या २५ वर्षांत वाऱ्याचा वेग सरासरी १९% आणि लाटांची उंची ३२% नी वाढेल असे भाकीत संशोधकांनी केले आहे. लहान लाटांपेक्षा उंच लाटा जास्त प्रमाणात पाहायला मिळतील आणि लाटांची दिशाही बदलायची शक्यता आहे. त्यांनी असाही अंदाज वर्तवला आहे की लाटांबरोबर समुद्रकिनारी वाहून येणाऱ्या रेतीचे प्रमाण  ३७% निव्वळ तर २४% एकूण एवढे वाढू शकते.

बंदरांवर आदळणाऱ्या लाटांच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि किनाऱ्याची झीज कमी करण्यासाठी बऱ्याच बंदरांवर बंधारे बांधण्यात येतात. पारादीप बंदरावर देखील २ बंधारे बांधण्यात आले आहेत; एक उत्तर दिशेला सुमारे ५०० मीटर लांबीचा आणि दुसरा दक्षिण दिशेला सुमारे १२०० मीटर लांबीचा. संशोधकांचा असा अंदाज आहे कि हवामानातील बदलांमुळे बंधाऱ्याच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या किनारपट्टीची झीज आत्ताच्या तुलनेत ४ ते ८ मीटरनी जास्त होऊ शकते.

झीज कमी व्हावी यासाठी बंदर प्राधिकरणाने पारादीप बंदरापासून काही अंतरावर १६०० मीटर लांबीचा अजून एक बंधारा बांधायला सुरुवात केली आहे. संशोधकांना विश्वास वाटतो की त्यांच्या या अभ्यासाचा उपयोग प्राधिकरण अधिकाऱ्यांना खर्चाचा अंदाज बांधून योग्य धोरण बनवण्यासाठी होईल. लवकरच पारादीप बंदराच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करण्याचे संशोधकांनी योजले आहे.

समुद्रकिनाऱ्यावर हवामान बदलाचा होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी संशोधकांनी काही पर्यायी धोरणे सुचवली आहेत. ते म्हणतात, या भागांत मानवी हस्तक्षेप कमी केल्यास, विकासात्मक उपक्रम  व पर्यावरण संरक्षण यामध्ये संतुलन राखल्यास व किनारपट्टीच्या झोन नियमांचे पालन केल्यास आपल्या किनाऱ्यांचे रक्षण करण्यात निश्चितच हातभार लागेल. प्रस्तावित जलसिंचन प्रकल्पांचे मूल्यांकन करताना पाणी साठून क्षारता वाढणार नाही ना याची खात्री करावी असे संशोधक सुचवतात. समुद्रकिनाऱ्यांच्या वाळूची झालेली झीज रोखण्यासाठी भराव घालणे, किनारे स्वच्छ ठेवणे,  वृक्षारोपण करणे व खारफुटी संवर्धन यांसारख्या उपक्रम राबवून हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा परिणाम आपण नियंत्रित ठेवू शकतो.

प्राध्यापक देव सुचवतात, “लोकांनी हे लक्षात घ्यायला हवे की भविष्यात हवामानात बदल होऊन बव्हंशी हवामान अधिक तीव्र होईल. म्हणूनच किनारपट्टी परिस्थितीकी साठीचे नियोजन करताना  हवामान बदलाचा विचार केला पाहिजे. दुष्परिणाम कमी करण्यासाठीच्या योजना राबविताना भूतकाळातील वातावरण परिस्थिती च्या माहितीवर अवलंबून न राहता बदल लक्षात घेऊन योजना करायला हव्यात.”