भारतीय वैज्ञानिक समुदायाला अभिमान वाटेल असा मोठा बौद्धिक वारसा मागे ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या कणभौतिकशास्रज्ञ

प्राणघातक बुरशीचा पश्चिम घाटातील बेडकांवर जीवघेणा हल्ला

19 मार्च 2019

पावसाळा सुरु झाला आहे, आणि पश्चिम घाटांच्या हिरव्या टेकड्यांमध्ये बेडकांचा डराव डराव आवाज भरून राहिला आहे! हे बेडूक पावसात मजेत वेळ घालवतायत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचा हा समज चुकीचा असू शकेल! आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची एखादी भीषण लढाई ते लढत असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचा शत्रू कोणी शिकारी नाही, तर बॅट्रॅकोकायट्रिम डेंडरोबॅटीडिस  उर्फ बी.डी.  नावाची बुरशी आहे. हे रोगजंतू जगभरातील उभयचरांना त्रास देतात आणि प्राणघातक अश्या कायट्रिडिओमायकोसिस  नावाच्या बुरशी-संसर्गास कारणीभूत ठरतात. नुकत्याच झालेल्या अभ्यासात, प्लायमाउथ विद्यापीठ, यूके, जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ, यूएसए, इंपीरियल कॉलेज लंडन, यूके आणि टाटा समाजशास्त्र संस्था येथील संशोधकांनी उत्तर पश्चिमी घाटांच्या खडकाळ पठारांमध्ये बी.डी.च्या प्रसाराचा अभ्यास केला आहे.

जगभरात कायट्रिडिओमायकोसिस मुळे बेडूक मृत्यूमुखी पडत आहेत आणि या रोगामुळे अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पनामाच्या जंगलामध्ये आढळणारा, पनामा सोनेरी बेडूक, जो २००७ पासून जंगलांमधून लुप्त झाल्याचे दिसून आले आहे. पश्चिम घाटांमध्ये बी.डी. ची उपस्थिती २०११ पासून नोंदवली गेली आहे तर २०१३ मध्ये उत्तर पश्चिमी घाटांमधून कायट्रिडिओमायकोसिस च्या  पहिल्या संसर्गाची नोंद झाली. रॉयल सोसायटी ओपन सायन्स जर्नल  मध्ये प्रकाशित केलेल्या या अभ्यासात संशोधकांनी संबद्धता आणि वातावरण यांत विभिन्नता असलेल्या आणि शेती व पर्यटन यांचा प्रभाव असलेल्या पारिस्थितिक संस्थेत बी.डी. चा प्रसार करणाऱ्या घटकांचा शोध घेतला आहे.

दख्खन पठारावरील, समुद्रपातळीपासून ६७ मीटर ते ११७९ मीटर उंचीवर आढळणाऱ्या उभयचरांच्या २१ विविध जातिंमधील शेपटी नसलेले उभयचर (एनयूरन) आणि अंगरहित उभयचर (एपोडन्स) यांचे ११८ नमुने संशोधकांनी गोळा केले. बी.डी.चा संसर्ग झाला आहे का हे तपासण्यासाठी त्यांनी नमुन्यांच्या त्वचेवरील डीएनएचा अभ्यास केला. पश्चिम  घाट एक मोठी परिसंस्था असल्यामुळे संशोधकांनी तीची समुद्रसपाटीपासून ७०० मीटरपेक्षा कमी उंचीवर असलेले 'खालचे' आणि ७०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेले 'वरचे' अश्या दोन क्षेत्रांमध्ये विभागणी केली.

तपासणी केलेल्यांपैकी ७९% उभयचर बी.डी. मुळे ग्रस्त आहेत असे या अभ्यासात दिसून आले. शिवाय लुप्त होण्याचा धोका असलेल्या आंबोली बेडूक (झान्थोफ्राईन टायग्रिना), व्हाइट लिप्ड क्रिकेट फ्रॉग (फेझर्वाराय सीएफ. सह्याद्रीस) आणि कॅसिलियन्स या सरपटणाऱ्या अंगरहित उभयचरांच्या चार जातिंना बी.डी. चा संसर्ग (कायट्रिडिओमायकोसिस) झाल्याची नोंद या अभ्यासात प्रथमच केली आहे.

भारतातील बॅट्राकॉलॉजिस्ट ( उभयचरशास्त्रज्ञ) डॉ. के व्ही गुरुराजा म्हणतात, "बुरशीचा संसर्ग व्यापक प्रजातींपेक्षा  स्थानिक प्रजातींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. झऱ्यांपाशी राहणाऱ्या आणि दिवसा सक्रिय असलेल्या नाचणाऱ्या बेडकाची (मायक्रिक्सलिडे) मला चिंता वाटते. इतरांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये संसर्ग जास्त प्रमाणात दिसून आला आहे. जर त्यांच्यातील रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर पश्चिम घाटातून नष्ट होणारी ती पहिली प्रजाती ठरेल. मिनर्वार्या कॅपरेटा (कॅनरा क्रिकेट फ्रॉग) अश्या सर्वसामान्य बेडकांच्या जातिंमध्ये मी या संसर्गाचे निरीक्षण केले आहे, पण रात्री दिसणाऱ्या  बेडकांमध्ये संसर्ग क्वचितच दिसून आला आहे.”

संशोधकांना आढळले की 'वरच्या' प्रदेशांपेक्षा 'खालच्या' प्रदेशात बुरशीचे संक्रमण जास्त प्रमाणात होते. संशोधकांच्या मते खालच्या भागातील झरे असल्यामुळे पाण्याद्वारे बुरशीचे संक्रमण होण्यास अनुकूल मार्ग मिळतात. खालच्या प्रदेशांपैकी मानवी वसाहतींपासून लांब असलेल्या भागांत बी.डी. ची जास्त प्रमाणात वाढ झालेली दिसली. ‘वरच्या’  प्रदेशांत टेकड्या, दऱ्या आणि घाटांची भौतिक रचना संसर्ग पसरण्यास प्रतिबंध करते. संशोधनाचे परिणाम अशीही शक्यता दर्शवतात की पाणपक्षी टिटवी मार्फत देखील या बुरशीचा प्रसार होतो.

हवामान बदलांसह अनेक गंभीर धोके निर्माण झाल्यामुळे, पश्चिम घाटांसह जगभरातील उभयचरानां तग धरून राहण्याची अगदी अंधुकशी आशा राहिली आहे. म्हणूनच या बुरशीने पश्चिम घाटातील उभयचरांचा विनाश करू नये यासाठी ही बुरशी पसरण्याचे मार्ग समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की  "बी.डी. ची सौम्य लागण प्राणघातक कायट्रिडिओमायकोसिस  मध्ये कशी रूपांतरित होते ते संपूर्णपणे माहिती होईपर्यंत या बुरशीची उपस्थिती भविष्यातील संरक्षण धोरण निर्णयांमध्ये विचारात घ्यावी. संपूर्ण पश्चिम घाट क्षेत्रातील बी.डी.च्या उत्क्रांतीच्या इतिहासाचा अभ्यास या बुरशीच्या संसर्गाला आळा घालण्यास मदत करेल. रोगजंतूंच्या प्रसाराचे माध्यमे आणि रोग साध्या संसर्गापासून प्राणघातक कशामुळे होतो हे समजून घेणे अत्यंत निकडीचे बनले आहे."

सध्याची परिस्थिती अशी आहे की बी.डी. संसर्गाची माहिती नसणाऱ्या उत्साही निसर्गप्रेमींची संख्या अमाप झाली आहे. डॉ. गुरुराजा म्हणतात की या रोगाचा प्रसार एखाद्या व्यक्ती मार्फत देखील होऊ शकतो, त्यामुळे बेडकांचे निरीक्षण करण्यासाठी व हाताळण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारच्या सर्वेक्षण पद्धतींची गरज आहे.

पश्चिम घाटातील या बेडकांचे भवितव्य काय असेल? डॉ. गुरुराजा म्हणतात "आपल्याला अजूनही माहित नाही कि पश्चिम घाटात बेडकांच्या किती जाति आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात काय होईल याचा विचार करणे चिंताजनक आहे. बी.डी. पश्चिम घाटापुरता मर्यादित आहे, हे स्पष्ट असले तरी बी. डी. चे  संक्रमण थांबवण्यासाठी आपण इतर ठिकाणी वापरलेल्या पद्धती वापरू शकू असे नाही. हा प्रसार थांबविण्यासाठी आपल्याला आपल्या पद्धती विकसित करण्याची गरज आहे."

Marathi