भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.

वेदना होत असतील तर धनलाभामुळे मनःस्थिती सुधारण्याची शक्यता कमीच

Read time: 1 min
मुम्बई
3 मे 2022
वेदना होत असतील तर धनलाभामुळे मनःस्थिती सुधारण्याची शक्यता कमीच

आयुष्यात प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या शारीरिक वेदनेला कधी ना कधी तोंड द्यावे लागते. वेदनेमुळे आपल्या मनःस्थितीवरही परिणाम होतो. ज्या माणसांना दीर्घकाळ वेदना होत राहतात त्यांची मनःस्थिती खूपदा नकारात्मक असते असे संशोधनातून दिसून आले आहे. परंतु ज्या लोकांच्या वेदना डॉक्टरांना दाखवावे आणि निदान करून घ्यावे एवढ्या तीव्र नसतील म्हणजेच ज्यांच्या वेदना सब-क्लिनिकल किंवा सौम्य असतील त्यांच्या बाबतीतही असेच घडत असेल का?

दररोज काही प्रमाणात वेदना अनुभवणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मनःस्थितीवर आणि वागण्यावर आर्थिक स्वरूपातल्या बक्षिसांचा काय परिणाम होतो या विषयावरचा शोधनिबंध फ्रायबोर्ग विद्यापीठ, स्वित्झर्लंड, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे), भारत, झुरिक विद्यापीठ, स्वित्झर्लंड आणि हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका येथील संशोधकांच्या एकत्रित गटाने प्रसिद्ध केला आहे. संशोधकांच्या असे लक्षात आले की वेदना सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांची मनःस्थिती बक्षीसरूपी पैशामुळे सुधारत नाही. म्हणजेच एकंदर मनःस्थितीवर वेदनेचा नकारात्मक परिणाम होतो हे यातून दिसून आले. नेचर नियतकालिकाच्या मानवता आणि सामाजिक विज्ञान संवाद (ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस कम्युनिकेशन) या विभागात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला.

या संशोधनासाठी नमुन्यादाखल आलेल्या ७९ विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले. एका गटात कोणत्याही वेदना न होणाऱ्यांचा समावेश होता तर दुसऱ्या गटात सब-क्लिनिकल वेदना असलेल्या लोकांचा समावेश होता. सब-क्लिनिकल गटातल्या लोकांना होणाऱ्या वेदना या डोकेदुखी, पाठदुखी, हात किंवा पाय दुखणे, स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा छातीत दुखणे अशा स्वरूपाच्या होत्या. या अभ्यासासाठी संशोधकांनी फ्रायबोर्ग रिवॉर्ड टास्क किंवा फ्रायबोर्ग बक्षिसपात्र चाचणी या नावाने ओळखली जाणारी पद्धत निवडली. ही पद्धत यापूर्वी अशाच प्रकारच्या संशोधनासाठी वापरण्यात आली आहे. पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की, ज्या लोकांना दीर्घकाळ होणाऱ्या वेदनांचे निदान झाले आहे असे लोक दिलेली चाचणी नीट पार पाडू शकत नाहीत. या लोकांची मनःस्थितीही ज्या लोकांना वेदना होत नाहीत अशा लोकांच्या तुलनेत आर्थिक बक्षीस मिळाल्यावर फारशी सुधारत नाही.

फ्रायबोर्ग रिवॉर्ड टास्कमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना स्क्रीनवर तीन पिवळी वर्तुळे (कमी काठिण्यपातळी) किंवा सात पिवळी वर्तुळे (उच्च काठिण्यपातळी) दाखवण्यात आली. थोडावेळ थांबून त्यांना एक हिरवे वर्तुळ दाखवण्यात आले. हे हिरवे वर्तुळ या आधी बघितलेल्या पिवळ्या वर्तुळांपैकी एखाद्या वर्तुळाच्या नेमक्या जागी आले आहे का ते सहभागी व्यक्तींनी सांगायचे असते. त्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून किती पैसे मिळाले ते दाखवले जाते किंवा आत्तापर्यंत त्यांच्याकडे किती पैसे जमा झाले ते दाखवले जाते. इथे पहिली फेरी पूर्ण होते. अशा बारा फेऱ्या झाल्या की ही चाचणी पूर्ण होते.

यात सहभागी झालेल्या व्यक्तींना एकेका फेरीनंतर एकतर काहीही बक्षीस दिले गेले नाही किंवा लहानसे बक्षीस दिले किंवा मोठे बक्षीस दिले. बक्षिसाचे मूल्य किती जास्त असेल ते चाचणी किती कठीण आहे त्यावर ठरत होते. कमी काठिण्यपातळीची चाचणी पार पाडली की छोटे बक्षीस आणि जास्त काठिण्यपातळीची चाचणी पार पाडली तर मोठे बक्षीस मिळाले. जर बक्षीसच मिळणार नसेल तर निकालाचा स्क्रीन समोर न दिसता थेट पुढच्या चाचणीचा स्क्रीन दाखवला गेला.

संशोधकांनी चाचणी घेण्यापूर्वी आणि बारा फेऱ्या पूर्ण झाल्यावर सहभागी व्यक्तींच्या मनःस्थितीचे मूल्यांकन केले. त्यासाठी सहभागी व्यक्तींना ० ते १०० मधले आकडे वापरून स्वतःचे मूल्यांकन करण्यास सांगण्यात आले. त्यात ० म्हणजे वाईट मनःस्थिती आणि १०० म्हणजे उत्तम मनःस्थिती असे धरायला सांगितले होते. मात्र त्यांना आकडे न दाखवता हसऱ्या चेहेऱ्याचे चित्र आणि दुःखी चेहेऱ्याचे चित्र दाखवण्यात आले.

ज्या व्यक्तींना वेदनेचे वैद्यकीय निदान झाले आहे अशा व्यक्तींची कामगिरी किंवा मनःस्थिती आर्थिक बक्षिसामुळे सुधारत नाही असे यापूर्वीच्या संशोधनातून असे दिसून आले आहे. म्हणून सब-क्लिनिकल गटातल्या व्यक्तींच्या मनःस्थितीवर आर्थिक बक्षिसाचा होणारा सकारात्मक परिणाम हा अजिबात वेदना होत नसलेल्या लोकांवर होणाऱ्या परिणामापेक्षा कमी असेल असा संशोधकांचा अंदाज होता. दिलेल्या चाचणीच्या काठिण्य पातळीचा वेदना, मनःस्थिती, प्रतिसाद आणि वर्तन यातल्या परस्परसंबंधावर परिणाम होतो का, हेही संशोधकांनी तपासून पाहिले.

स्वित्झर्लंडमध्ये विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या संशोधनासाठी निवडताना संशोधकांनी नैराश्य किंवा इतर मानसिक विकारांचा इतिहास नसलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली. सब-क्लिनिकल गटातील व्यक्तींनी प्रश्नावलीत लिहिल्याप्रमाणे त्यांना वेदनेची जाणवण्याइतकी लक्षणे होती. सब-क्लिनिकल आणि वेदना नसलेल्या गटांचे पुढे आणखी दोन गट पाडण्यात आले. ते त्यांना दिलेल्या चाचणीच्या काठिण्यपातळीला अनुसरून होते. निवडलेल्या सर्व व्यक्तींना एक चाचणी पार पाडायची होती. ती एकतर कमी काठिण्यपातळीची किंवा उच्च काठिण्यपातळीची होती.
 


आकृती १: कमी काठिण्यपातळी असलेल्या (३ वर्तुळे) फ्रायबोर्ग रिवॉर्ड टास्कची चाचणी (आकृती सौजन्य: सदर अभ्यासाचे लेखक)

सांख्यिकी सॉफ्टवेअर वापरून संशोधनाच्या निकालांचे विश्लेषण करण्यात आले. चाचणी घेण्याअगोदर कोणतीही वेदना नसलेल्या गटाच्या आणि सब-क्लिनिकल गटाच्या मनःस्थितीत फारसा फरक आढळला नाही. आर्थिक बक्षिसामुळे सब-क्लिनिकल गटातल्या व्यक्तींची मनःस्थिती तेवढी सुधारणार नाही जेवढी अजिबात वेदना होत नसलेल्या लोकांची मनःस्थिती सुधारेल असे गृहीतक होतेच. शिवाय सहभागी व्यक्तींना जास्त बक्षीस मिळाले तर त्यांची मनःस्थिती अधिक चांगली होईल अशी देखील संशोधकांची अपेक्षा होती. विश्लेषण केल्यावर असे लक्षात आले की, ज्या सहभागी व्यक्तींना कोणत्याही वेदना होत नव्हत्या त्यांना जास्त मोठे बक्षीस मिळाल्यावर त्यांच्या सरासरी मनःस्थितीचे निर्देशक आकडे मोठे होते. म्हणजेच त्यांच्या मनःस्थितीत सुधारणा झालेली दिसून आली. मात्र सब-क्लिनिकल वेदना होणाऱ्या गटात असे दिसून आले नाही. त्यांच्या मनःस्थितीत बक्षीसानुसार फारसा फरक पडला नाही. त्याखेरीज, सर्व सहभागी व्यक्ती जास्त काठिण्यपातळी असलेल्या चाचणीच्या तुलनेत कमी काठिण्यपातळीची चाचणी अधिक अचूकतेने पार पाडत होत्या, असेही संशोधकांच्या लक्षात आले.

“सब-क्लिनिकल गटातील लोकांमध्ये बक्षीस आणि वेदना यांचा परस्पर संबंध काय असतो याचा शोध घेणारे याप्रकारचे हे पहिले संशोधन आहे,” असे संशोधकांनी सांगितले. बक्षीस मिळाल्यावर होणाऱ्या प्रतिक्रियेवर आणि मनःस्थितीवर कोणतीही अतिरिक्त औषधे न घेता वेदनेचा कसा परिणाम होतो याबद्दलची मौल्यवान माहिती या संशोधनातून मिळते. यापुढील कामाच्या दिशेबद्दल बोलताना आयआयटी बॉम्बे येथील कॉग्निटिव्ह अँड बिहेवियरल न्यूरोसायन्स लॅब, मानवता आणि सामाजिक विज्ञान विभाग येथील प्राध्यापक रश्मी गुप्ता सांगतात, “भारतातल्या विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून अशाच चाचण्या घेण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे भिन्न सांस्कृतिक जडणघडणीमुळे पडणाऱ्या फरकाचा अभ्यास करता येईल.”