जलाशयांच्या पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानाची नोंद व निरीक्षण करणारे आयआयटी मुंबईचे नवे वेब ॲप्लिकेशन - ‘इम्पार्ट’ - हवामानातील बदलांचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त.

अपघातमुक्त सुरक्षित रस्ते हवेत म्हणून...

Read time: 1 min
मुंबई
27 एप्रिल 2021
अपघातमुक्त सुरक्षित रस्ते हवेत म्हणून...

छायाचित्र: अन्स्प्लाशच्या सौजन्याने अक्षय नानावटीने घेतलेले छायाचित्र

आजघडीला एकूण जगाचा विचार करता भारतात रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे होणाऱ्या दुर्दैवी मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात दररोज अंदाजे २९ मुले अपघातात मृत्यू पावतात तर दरवर्षी सुमारे दीड लाख लोक केवळ रस्त्यांवरील अपघातांमुळे मृत्यूमुखी पडतात. वाहन चालवतानाचे बेजाबदार वर्तन, खराब रस्ते आणि रहदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमधील शिथिलता हे घटक प्रामुख्याने अशा अपघातांना कारणीभूत ठरतात. याव्यतिरिक्त, भारतात वाहनांमध्ये ड्रायव्हिंगमधील मानवी चुका कमी होण्यास आणि रस्ते अपघात टाळण्यास मदत करणाऱ्या “प्रगत चालक सहाय्य प्रणाली” (Advanced Driver Assist Systems ADAS -एडीएएस) चा अभाव आहे. आपोआप होणारे गतिरोधन, धडक टाळण्यासाठी अगोदर मिळणारी चेतावणी आणि लेन मधूनच गाडी चालवण्यासाठी मिळणारे सहाय्य अशा वैशिष्ट्यांचा समावेश असेलेले एडीएएस हे विकसित देशांतील वाहनांत सर्वसाधारणपणे अंतर्भूत असलेले तंत्रज्ञान आहे.

नुकत्याच झालेल्या अभ्यासात, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी बॉम्बे) मधील डॉ. ॲना चार्ली आणि प्राध्यापक टॉम मॅथ्यू यांनी रस्ते अपघातास कारणीभूत असलेल्या बाबींचे विश्लेषण केले आहे. या अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे भारतातील ड्रायव्हिंगच्या परिस्थितीस अनुकूल ठरतील अशी एडीएएस विकसित करण्यास मदत होईल. हा अभ्यास ‘ट्रान्सपोर्टेशन लेटर्स’ या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला होता तसेच या अभ्यासास भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई च्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत अंशतः अर्थसहाय्य प्राप्त झाले होते.

पाश्चात्य देशांत प्रस्थापित असलेल्या एडीएएस प्रणाली जशाच्या तशा भारतीय बाजारात उपयुक्त ठरणार नाहीत. या प्रणाली ड्रायव्हिंगच्या पद्धती, रस्त्यावरील मार्गदर्शक चिन्हे आणि एखाद्या विशिष्ट ठिकाणी असलेल्या रहदारीच्या पायाभूत सुविधांनुसार तयार केलेल्या असतात.

“भारतातील ड्रायव्हिंगची पद्धत पाश्चात्य देशांपेक्षा खूपच वेगळी आहे. येथे बहुतेक अपघात वाहनचालकांनी अचानकपणे लेन  तोडून दुसऱ्या  लेनमध्ये घुसल्यामुळे आणि इतर वाहनांना वेगात मागे टाकण्याच्या प्रयत्नामुळे होतात. याउलट पाश्चात्य देशांत मात्र ड्रायव्हिंगची शिस्त कसोशीने पाळली जाते. म्हणूनच पाश्चात्य देशांपेक्षा वेगळी  पद्धत भारतात सुरक्षित विरुद्ध धोकादायक ड्रायव्हिंग ओळखण्यासाठी योजली पाहिजे,” असे रस्ता सुरक्षा विषयक तज्ज्ञ डॉ. चार्ली सांगतात.

संशोधकांनी याविषयावरील पूर्वीच्या अभ्यासापेक्षा निराळे मुद्दे विचारात घेतले. उदाहरणार्थ त्यांनी ड्रायव्हिंगच्या सवयी, रस्त्याची वळणे, तीव्र उताराचे रस्ते आणि दिवसाच्या ठराविक वेळची रहदारी यासारख्या रस्ता सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचे विश्लेषण केले. या अभ्यासासाठी त्यांनी विविध भूभागावरील रस्ते असलेला आणि वारंवार झालेल्या रस्ते अपघातांचा दीर्घ इतिहास असलेला ९४ किलोमीटर लांबीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग निवडला,. विशिष्ट ड्रायव्हिंगच्या सवयींचा अभ्यास करण्यासाठी द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या २३ मोटार चालकांची निवड केली. त्यांचे स्थान, रांगेचे प्राधान्य, वेग आणि प्रवेग यासारख्या घटकांच्या प्रत्यक्ष वेळच्या नोंदी घेतल्या. त्यानंतर, त्यांनी द्रुतगती मार्गाच्या १८८ तुकड्यांवरील (प्रत्येकी १ किलोमीटरचा एक तुकडा) सरासरी ड्रायव्हिंगच्या पद्धतींचा कसोशीने अभ्यास केला व प्राप्त निष्कर्षांच्या आधारे प्रत्येक प्रकारच्या रस्त्यावरील भूतकाळात झालेल्या अपघातांच्या घटनांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

या अभ्यासगटातील संशोधकांना प्राप्त निरीक्षणांमध्ये काही ठराविक नमुने आढळून आले. मागील अपघात बहुतेकवेळा अशा रस्त्यावर झाले होते जे वळणदार, सपाट किंवा उतार असलेले होते. अशा तुकड्यांवर, वाहनचालक बर्‍याचदा लेन आणि वेग बदलतात. शिवाय असेही लक्षात आले की खूप तीव्र उतार असलेल्या रस्त्यांवर अपघाताच्या अशाही घटना बरेचदा घडतात ज्यांचा ड्रायव्हिंगच्या सवयींशी फारसा संबंध नसतो. अपघातांची शक्यता असलेले सर्वात महत्वाचे रस्ते सुरक्षा घटक ओळखण्यासाठी, त्यांनी प्रत्येक घटक आणि मागील अपघाताची माहिती या दरम्यानचा ‘परस्परसंबंध’ प्रस्थपित केला. म्हणजेच, एखाद्या विशिष्ठ कारणामुळे रस्ते अपघात होण्याची शक्यता किती होती?

संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की खासकरून रात्रीच्या वेळी वाहन चालवण्याच्या वेगात वारंवार बदल करणे तसेच भरदिवसा अचानक लेन  बदलणे, धोकादायक असते. तीव्र उतार असलेल्या रस्त्यांवर  देखील नेहमी अपघात घडू शकतात. भविष्यातील संभाव्य अपघातांविषयीचे मॉडेल तयार करण्यासाठी त्यांनी वर सांगितलेल्या घटकांचा उपयोग केला, आणि त्यांना मागील अपघातांशी संबंधित माहिती वापरुन सत्यापित केले. “पारंपारिक रस्ता सुरक्षा विश्लेषण प्रक्रिया ही ‘प्रतिक्रियाशील ’आहे ज्यात रस्ते अपघात विषयीची तपशीलवार माहिती उपलब्ध नसते आणि म्हणून त्यावरून चुकीच्या पद्धतीने निष्कर्ष निघतात. म्हणून त्याऐवजी, आम्ही रहदारी आणि ड्रायव्हिंगच्या सवयींबद्दल मिळालेल्या माहितीमधून ‘सरोगेट’ इव्हेंट्सचे  (संभाव्य अपघाताची चेतावणी देणारी लक्षणे ) पर्याय सुचवण्यासाठी ‘दूरदर्शी’ दृष्टीकोन वापरला,” असे प्राध्यापक मॅथ्यू म्हणतात. “आमचा दृष्टीकोन वापरल्यास  अपघाताची माहिती, जी विश्वसनीय नसू शकते, ती वापरण्याची मुळातच गरज नाहीशी होते. त्यामुळे जिथे अशी माहिती उपलब्धच नाही अशा नवीन रहदारी सुविधांसाठी देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो.” त्यांच्या मॉडेलचा उपयोग धोकादायक ड्रायव्हिंगच्या वर्तणुकींची मर्यादा ठरवण्यास केला जाऊ शकतो आणि त्याद्वारे एडीएएसला स्वयंचलित प्रतिरोधात्मक उपाय अवलंबण्यास मदत होऊ शकते.

हा अभ्यास एका द्रुतगती मार्गावर घेण्यात आला असला तरी त्यातून मिळालेल्या निष्कर्षांचा उपयोग शहरांतर्गत रस्त्यांवरील सुरक्षेसाठीही होऊ शकतो.

“महत्त्वाच्या घटकांवरील आमचे निष्कर्ष आणि त्यांतील अंतर्भूत धोके, सर्व प्रकारच्या रस्त्यांवर लागू होतात कारण ड्रायव्हिंगच्या सवयी समानच आहेत. फक्त प्रत्येक घटकाची धोकादायक पातळी वेगवेगळी असेल." असे डॉ. चार्ली म्हणतात. “उदाहरणार्थ, द्रुतगतीमार्गावर वाहनांना वेगाची मर्यादा शहरातल्यापेक्षा जास्त  असते. त्यामुळे ड्रायव्हिंगच्या क्षमतांच्या मर्यादा हे सर्व विचारात घेऊनच निर्धारित केल्या जातात.” असे त्या पुढे म्हणाल्या.

संशोधक सध्या त्यांचे अंदाज वर्तवणारे मॉडेल सुधारीत करत आहेत.

“आम्ही प्रामुख्याने प्रवासी वाहनांचा अभ्यास केला, परंतु ड्रायव्हिंगची पद्धत वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असते. दुचाकी किंवा ट्रक चालकांसाठी महत्वाच्या वाटणाऱ्या पद्धती मोटार चालकांसाठी तितक्या महत्त्वपूर्ण असतीलच असे नाही. आम्हाला पाऊस आणि दृश्यमानता यासारख्या पर्यावरणीय बाबींचा देखील अभ्यास करायचा आहे," असे डॉ. चार्ली म्हणतात.

विशेष म्हणजे २०१0 -२० ला रस्ते सुरक्षा कृतीचे दशक म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केले होते. संशोधन क्षेत्राच्या आघाडीवरील प्रयत्नांमुळे भविष्यात अधिक सुरक्षित रस्ते मिळण्याची आशा करू या.