भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.

चाळींची रचना बदलल्यास ताजी हवा खेळती राहण्यास मदत

Read time: 1 min
मुंबई
21 नवेंबर 2018
अर्बझू  [ CC BY 2.0 ]

विद्यमान काळात शहरांचा जलद गतीने विस्तार होत आहे व घरांच्या किंमती वाढत असल्या तरी आकार मात्र लहान होत आहे. विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणार्‍या घरांत राहण्यासाठी वातावरण निकृष्ट असते व त्यातील तापमान आणि आर्द्रता मानक पातळीपेक्षा अधिक असते. अशा वातावरणात राहिल्यामुळे श्वसनाचे आजार, हृदयरोग, वारंवार होणारी अंगदुखी व डोकेदुखी इत्यादी होत असल्याचे माहिती असले तरी अशा घरात सुधारणा करण्यासाठी लागणारे तपशील व माहिती सहज उपलब्ध नाही. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी एका अभ्यासात खेळती हवा नसलेल्या चाळींमध्ये राहिल्यामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याचा शोध घेतला आणि त्या घरांची रचना बदलण्यासाठी प्रत्यक्ष अंमलात आणता येतील असे काही प्रस्ताव मांडले आहेत.

'हॅबिटॅट इंटरनॅशनल' मासिकात प्रकाशित झालेल्या ह्या अभ्यासात संशोधकांनी मुंबईच्या चार भागातील बॉम्बे डेवलपमेंट डिपार्टमेंट (बीडीडी) ह्यांनी बांधलेल्या विविध चाळीतील १२० घरांच्या जीवनमानाची पाहाणी केली. ह्या चाळीतील घरांचा आकार साधारण २०० वर्गफूट असून ती घरे एकाच व्यक्तीसाठी निर्माण केली होती. प्रत्येक घरात एक स्वयंपाकघर आहे व इमारतीच्या दोन टोकाला सामुदायिक टॉयलेट आहेत. घराचा लहान आकार, पर्याप्त देखरेख किंवा स्वच्छता नसणे, आजूबाजूच्या रस्त्यांमुळे होणारे प्रदूषण आणि खेळती हवा नसताना स्वयंपाकासाठी वापरले जाणारे केरोसीनसारखे इंधन ह्या सगळ्या घटकांचा तिथे राहणार्‍या लोकांच्या जीवनमानावर दुष्प्रभाव पडतो.

स्थानिक अधिकार्‍यांना ह्या भागातून आरोग्य सेवा केंद्रात येणार्‍या लोकांच्या संख्येत वाढ झालेली दिसत होती. हवेचा दर्जा चांगला नसल्यामुळे हे होत असल्याचा संशय त्यांना असला तरीही ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे आकडेवारी उपलब्ध नव्हती. चाळीतील रहिवाशी त्यांच्या आरोग्यासंबंधीची माहिती देण्यास तयार नव्हते. स्थानिक आरोग्य सेवा केंद्राला ते कितीदा भेट देतात एवढीच माहिती सांगायला ते तयार होते. संशोधकांनी हीच माहिती रहिवाशांच्या आरोग्याची पातळी दर्शवण्यासाठी वापरली.

हवेचा दर्जा दर्शवण्यासाठी संशोधकांनी 'स्थानिक सरासरी वय' (एलएमए) नावाची संज्ञा निवडली. ह्या अभ्यासाच्या प्रमुख, प्राध्यापिका रोनिता बर्धन म्हणतात, "हवेचे सरासरी वय म्हणजे हवा इमारतीच्या एका विशिष्ट भागात ज्या अवधीसाठी असते तो काळ." हवा खेळती आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी हा महत्त्वाचा घटक आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर एका खोलीतील हवा बदलण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे एलएमए. ज्या खोलीत हवा खेळती असते त्याचे एलएमए कमी असते, कारण ताजी हवा सतत आत येत राहते. प्रायोगिक अभ्यासात असे दिसून आले की खोलीची दारं आणि खिडक्या बंद असतील तर एलएमए सुमारे ४६ मिनिटे असते, आणि उघड्या असतील तर ते ३ मिनिटापर्यन्त कमी होऊ शकते. संशोधक म्हणतात की ही संज्ञा स्थानिक भाषेत, म्हणजेच मराठीत समजणे आणि समजावून सांगणे सोपे आहे.

एलएमएचे मूल्य शोधून काढण्यासाठी संशोधकांनी इमारतीची दिशा, आसपास असलेल्या बागा, रस्ते, इमारतीच्या आजूबाजूला असलेले अडथळे, इमारतीचे क्षेत्र, त्याच्या भिंतींची रुंदी व खिडक्या व दारांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण इत्यादी घटक विचारात घेतले. रहिवाशी किती वेळ आपली दारं खिडक्या उघड्या ठेवतात ह्याचे संशोधकांनी  सर्वेक्षण केले. काही घरात तापमान आणि आर्द्रता मापक यंत्र ठेवून ते आकडे व स्थानिक हवामान खात्याची माहिती वापरली. ही सर्व माहिती गणितीय प्रतिरूपात वापरुन संशोधकांनी एलएमए मूल्ये परिगणित केली.

अभ्यासात असे आढळून आले की ज्या घरात हवा खेळती नव्हती तिथल्या रहिवाशांच्या तुलनेत हवा खेळती असलेल्या घरातील रहिवाशांनी आरोग्य सेवा केंद्राला कमी भेटी दिल्या.  मात्र हवेचा ताजेपणा आणि आरोग्य सेवा केंद्राला दिलेल्या भेटींची संख्या ह्यात लक्षणीय संबंध आढळला नाही.

संशोधकांच्या लक्षात आले की इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या अडथळ्यांचा एलएमए मूल्यावर पडणारा  प्रभाव लक्षणीय आहे आणि अडथळे काढून टाकल्यास एलएमए मूल्य अर्धे होऊ शकते. इमारतीत हवा खेळती असल्यास हवेचा ताजेपणा सुधारतो. मात्र, संशोधकांच्या मते हे बदल घडवून आणायला धोरणे बदलावी लागतील व ताज्या हवेत राहण्याचे महत्त्व रहिवाशांना पटवून द्यावे लागेल.

अभ्यासाचे लेखक म्हणतात, "स्थानिक अधिकार्‍यांनी ह्यात सहभाग घेतला तर आम्हाला चाळीतील पर्यावरणाचा अधिक चांगला अभ्यास करता येईल. आम्हाला मनुष्य व जागा ह्यांच्या नात्याचा अभ्यास करता येईल आणि रहिवाशांना घराच्या रचनेचे महत्त्व पटवून देता येईल".

ह्या अभ्यासाचे निष्कर्ष आणि त्यात केलेल्या शिफारसी इमारतीची रचना बदलणार्‍या नियोजन अधिकार्‍यांसाठी खूप उपयोगाच्या ठरतील व त्या अंमलात आणल्या तर बीडीडी चाळीच्या रहिवाशांना अधिक आरोग्यदायी आयुष्य जगता येईल.