भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक अमित अग्रवाल यांना वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) तर्फे शांति स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. हा सन्मान प्रा. अग्रवाल यांचे द्रायुयामिकी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि विशेषतः सूक्ष्म द्रायू साधनांत त्यांच्या प्रायोगिक, सैद्धांतिक व संख्यात्मक कामगिरीसाठी दिला गेला आहे.
शांति स्वरूप भटनागर पुरस्कार भारतात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. 'सीएसआयआर'चे संस्थापक संचालक शांति स्वरूप भटनागर यांच्या नावाने दिल्या जाणार्या या पुरस्कारात ५ लाख रुपये व प्रशस्ती पत्र प्रदान केले जाते. अतिशय आनंदित असलेले प्रा. अग्रवाल म्हणाले, "पुरस्कार मिळणे अत्यंत समाधानकारक आहे कारण त्यामुळे आमच्या संशोधनाचा दृष्टिकोन व मेहनत याला मान्यता मिळते". ते पुढे म्हणाले "माझ्या कुटुंबाचा अविरत आधार व माझ्या विद्यार्थ्यांचे श्रम यामुळेच मला हा सन्मान लाभला आहे. हा पुरस्कार मी त्यांनाच समर्पित करू इच्छितो."
द्रायुगतिशास्त्राचा भाग असलेले सूक्ष्म द्रायू व क्षुब्ध (टर्ब्यूलण्ट) प्रवाह यांचा अभ्यास हे प्रा. अग्रवाल यांचे कार्यक्षेत्र आहे. एक मिलीमिटर पेक्षा अरुंद नळीतून होणार्या द्रायूच्या प्रवाहाच्या अभ्यासाला सूक्ष्म द्रायूचा अभ्यास म्हणतात. क्षुब्ध प्रवाहात द्रायूच्या हालचालीत काळा प्रमाणे असे बदल होतात ज्यात दाब व वेग अतिशय अस्ताव्यस्तपणे बदलतात.
द्रायुगतिशास्त्राच्या प्रायोगिक व सैद्धांतिक ज्ञानाचा वापर करून प्रा. अग्रवाल आणि त्यांचे विद्यार्थी काही चित्तवेधक कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रा. अग्रवाल यांच्या मते "सर्व ठिकाणी दिसणारे प्रवाह अभ्यास करण्यायोग्य असतात - आपल्या शरीरातील रक्त प्रवाह, आजूबाजूच्या हवेचा प्रवाह, हवामानाचे प्रतिमान असो किंवा इतर औद्योगिक उपयोग. विष्यंदी द्रायूंच्या हालचालींचे वर्णन करणार्या पारंपारिक समीकरणाच्या (नेवीयर- स्टोक्स समीकरण) पलीकडे जाऊन ऊंच उडणारी विमाने, सूक्ष्म नळीतील वायू प्रवाह व इतर उच्च नडसेन अंक असलेल्या प्रवाह स्थितींचा उलगडा करणारे समीकरण आम्ही शोधत आहोत". ते पुढे म्हणतात, "सैद्धांतिक द्रायुगतिशास्त्रामुळे द्रायु प्रवाहातील समस्यांचे निराकरण करणारी समीकरणे उपलब्ध होत असल्यामुळे, ते द्रायुगतिशास्त्राचे आधारस्तंभ मानले जाते."
प्रा. अग्रवाल यांच्या सहकार्यांनी जीवशास्त्रात वापरली जाणारी अनेक सूक्ष्मसाधने विकसित केली आहेत. उदाहरणार्थ सुसज्ज प्रयोगशाळेचा वापर न करता रक्तातून प्लाझमा वेगळे करण्यासाठी संशोधकांनी एका नाण्याच्या आकाराचे सोपे साधन तयार केले आहे. हे साधन सेंट्रीफ्यूज तंत्रज्ञान वापरणार्या पद्धतींपेक्षा अधिक अचूक, वापरायला सोपे व जलद गतीने काम करते. या सूक्ष्मसाधनाला नेस्टा, यूके येथील लॉन्जीट्यूड प्राइझ डिस्कवरी अवॉर्ड मिळाले आहे व ते वापरण्याचा परवाना पुणे स्थित स्टार्टअप एम्ब्रियो बायोमायक्रोडिवायसेस प्रा. लि. यांना दिला आहे. ही कंपनी या साधनाला व्यावसायिक प्रमाणावर निर्माण करण्याची योजना करत आहे. त्यांनी विकसित केलेल्या इतर अत्याधुनिक व नाविन्यपूर्ण सूक्ष्मसाधनांपैकी एक जैविक नमूने वापरताना तापमानाचे नियंत्रण करते व दुसरे वापरुन पेशींच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी त्रिमितीय केंद्रीकरण करणे शक्य होते.
प्रा. अग्रवाल व त्यांच्या सहकार्यांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या शीतनासाठी कृत्रिम जेट व सूक्ष्मचॅनलवर पण संशोधन केले आहे. कृत्रिम जेट हा हवेचा क्षुब्ध प्रवाह असतो जो पटल (डायफ्राम) हलवल्यामुळे सूक्ष्म छिद्रातून आत ओढला व बाहेर फेकला जातो. हवेच्या जेटच्या स्पंदनी स्वरूपाला अत्यंत कमी ऊर्जा लागत असूनही उत्तम स्थानिक शीतन होते. सूक्ष्मचॅनल आधारित शीतन साधनात पाण्याचा (अथवा इतर शीतन द्रायुचा) प्रवाह अतिसूक्ष्म मार्गांमधून होतो आणि द्रायूंच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व त्याची घनता यांचे गुणोत्तर प्रमाण वाढल्याने गरम पृष्ठभागाची उष्णता कमी होते.
द्रायुत बुडलेल्या वस्तूंचा, जस थव्यात उडणारे पक्षी किंवा विमानांचा समूह, एकमेकावर होणाऱ्या प्रभावाचा प्रतिरूप आधारित अभ्यास प्रा. अग्रवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी केला आहे. प्रा. अग्रवाल यांना सुमारे एक डझन पेटेंट मिळाले आहेत आणि आंतरराष्ट्रीय मासिकात त्यांचे दीडशेपेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. प्रा. अग्रवाल वीसपेक्षा अधिक पी.एच.डी विद्यार्थी, पोस्ट डॉक्टरल संशोधक व प्रकल्प कर्मचार्यांचे मार्गदर्शन करतात व तीन प्रतिष्ठित मासिकांच्या संपादक मंडळात त्यांचा समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी प्रबोधिनी (आयएनएई) व भारतीय राष्ट्रीय विज्ञान प्रबोधिनी (एनएएसआय) या संस्थेत प्रा. अग्रवाल यांची फेलो म्हणून निवड झाली आहे.