तेल शुद्धीकरण कारखान्यातील अपशिष्ट पाणी वाळूमधून वाहिल्यानंतर त्यात प्रदूषकभक्षी जीवाणूंचे थर (बायोफिल्म) तयार झाले व या थराने पाण्यातील घातक संयुगे नष्ट केली.

एकात्मीक कचरा व्यवस्थापन: एक विश्लेषण

Read time: 1 min
मुंबई
9 फेब्रुवारी 2018
Photo : Jigu / Research Matters

भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई मध्ये केलेला अभ्यास दर्शवतो की एकात्मिक कचरा व्यवस्थापन केल्यास उघड्यावर कचरा टाकण्यामुळे होणारे प्रदूषण  कमी होऊ शकते 

मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, हे नगर व्यवस्थापकांपुढे असलेले एक मोठे आव्हान आहे. यावर तोडगा काढण्याच्या हेतूने भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई मधील संशोधकांनी कचरा व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला. अभ्यासात असे आढळून आले की संयुक्तपणे वेगवेगळ्या पद्धती वापरल्यास कचरा डेपोमध्ये उघड्यावर कचरा टाकल्यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टळू शकतात.

या अभ्यासाचे सहलेखक, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मुनीश चंदेल म्हणतात "कचरा व्यवस्थापनासंबंधी भारतात जास्त अभ्यास झालेला दिसत नाही. कचरा रिचवण्याच्या विविध पद्धती संयुक्तपणे वापरताना, कचरा निर्माण होण्यापासून त्याचा निचरा होईपर्यंत पर्यावरणाच्या विविध घटकांवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण या अभ्यासात केले आहे.”

उपलब्ध आकडेवारीनुसार मुंबई महापालिका हद्दीत दररोज सुमारे ९००० टन घनकचरा तयार होतो. ह्यातील बहुतांश कचरा मुंबई महानगरासाठी असलेल्या दोन डंपिंग ग्राउंड किंवा १ बायोरिअॅक्टर मध्ये पाठविला जातो. कित्येकदा  कचरा उघड्यावर जाळला जातो. त्यांतून विषारी वायू बाहेर पडतात. त्यामुळे श्वसन समस्या, हृदय व रक्तवाहिन्यांचे रोग, जन्मदोष इत्यादी त्रास उद्भवू  शकतात. याशिवाय कचऱ्याची मोठ्या प्रमाणावरील वाहतूक, हाताळणी आणि विल्हेवाट करताना हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. सल्फरडायऑक्साइडचे धूर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड (याला आम्ल वायू असेही म्हणतात),  तसेच कणीय पदार्थ आणि इतर विषारी द्रव्ये हवेत सोडली जातात.

कचरा अशा रीतीने उघड्यावर टाकण्यापेक्षा त्याचा निचरा करण्यासाठी इतर अनेक वैज्ञानिक पर्याय उपलब्ध आहेत. पेपर, प्लॅस्टिक, कपडे आणि कातडी यांच्यावर पुनर्प्रक्रिया करता येते. स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्याचा वापर सेंद्रिय खत बनवण्यासाठी करता येते. भस्मिकरण या पद्धतीत सेंद्रिय कचरा जाळला जातो. अकार्बिक भागाची राख तयार होते. राखेचाही उपयोग केला जाऊ शकतो. या ज्वलनादरम्यान जी उर्जा निर्मिती होते , तिचा वापर औष्णिक विद्युत निर्मिती साठी केला जाऊ शकतो. या मुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. या पद्धती निश्चितच समाजासाठी आणि पर्यावरणासाठी हितकारक आहेत.

कचरा व्यवस्थापनाच्या या सर्व पद्धती संयुक्तपणे वापरता आल्या तर अधिकच बरे. संशोधकांनी जीवन चक्र मूल्यांकन पद्धतीने कचरा व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचे मूल्यांकन केले आहे. ह्या तंत्रामध्ये कोणत्याही उत्पादनांचे, प्रक्रियेचे किंवा उपक्रमाचे त्यांच्या संपूर्ण जीवनचक्रात त्यांचा पर्यावरणावर कसा  परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो.

डंपिंग ग्राउंड मध्ये कचरा टाकणे यासह कचरा व्यवस्थापनाच्या विविध पद्धती एकत्रितपणे वापरण्याच्या ६ पर्यायांचा तुलानात्मक अभ्यास संशोधकांनी केला. कचरा कुठल्या पद्धतीचा आहे, त्यातला किती भाग पुनश्चक्रण करण्यायोग्य आहे, किती भाग सेंद्रिय खत करायला वापरता येईल हे पाहून पुनश्चक्रण, सेंद्रिय खत निर्माण, वायुनिरपेक्ष पचन (ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ज्वलन करणे), भस्मीकरण या पद्धती वापरून कचऱ्याचा निचरा करण्यासाठीचे ६ संयुक्त पर्याय त्यांनी योजले. कणीय घटक, कार्बनडायऑक्साइड, मिथेन, डायऑक्साइन, आर्सेनिक, निकेल आणि नायट्रोजन ऑक्साइड यासारख्या २७ प्राचलांचा वापर करीत त्यांनी पर्यावरणावर होणारे सार्वत्रिक आणि स्थानिक परिणाम तपासले. ह्या घटकांचे वर्गीकरण, जागतिक तापमान वाढीवर परिणाम करणारे, आम्लीकरण करणारे, सुपोषणास (फॉस्फेट आणि नायट्रेटच्या अतिरिक्त जल प्रदूषणांमुळे जलपर्णीं सारख्या वनस्पतींची बेसुमार वाढ) कारणीभूत ठरणारे व विषक्त ठरणारे या वर्गांमध्ये केले.

मुंबईत निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी १६% कचरा पुनश्चक्रीकरण करण्यास योग्य असतो. या अभ्यासात संशोधकांनी अशा घटकांची वेगवेगळ्या(१०% ते ९०%) प्रमाणात पुनर्प्रक्रिया केल्यास त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासून पाहीला.

अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की घन कचरा व्यवस्थापनाची कुठलीही एक पद्धत सर्व प्रभाव क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत नाही. डंपिंग ग्राउंडमध्ये उघड्यावर कचरा टाकल्यास आम्ल वायू कमी तयार होत असला तरी सुपोषण वाढते. भस्मीकरणामुळे हरित वायू कमी प्रमाणात उत्सर्जित होतात, परंतु विषारी व आम्ल वायू बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढते. सेंद्रिय पद्धतीत सुपोषण आणि विषारी पदार्थ निर्माण होण्याची शक्यता कमी आढळली, परंतु सर्व प्रकारच्या कचऱ्यासाठी सेंद्रिय पद्धत वापरता येत नाही. लक्षात आलेली अजून एक गोष्ट अशी की डंपिंग ग्राउंडमध्ये मध्ये कचरा टाकायच्या आधी, त्यातील काही घटकांवर पुनर्प्रक्रिया केल्यास पर्यावरणाची होणारी हानी मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते. म्हणून, संशोधक प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने, सेंद्रिय खत निर्मिती , वायु निरपेक्ष पचन आणि कचरा जमिनीत जिरवणे या पद्धतींचा संयुक्त वापर करण्याची शिफारस करतात.

कचरा व्यवस्थापना बाबतचे धोरण ठरण्यासाठी हा व या पद्धतीचे अभ्यास मार्गदर्शक ठरू शकतात. “पर्यावरणावरील परिणाम पाहून वेगवेगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास कुठली पद्धत अवलंबणे योग्य आहे हे ठरवायला धोरण कर्त्यांना निश्चितच मदत मिळेल”, असा विश्वास प्रा. चंदेल यांना वाटतो.

विविध शहरांमध्ये कचऱ्यातील घटक आणि त्यांचे प्रमाण वेगवेगळे असु शकते, त्यामुळे तेथील स्थानिक घटकांनुसार त्या त्या ठिकाणच्या कचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या पद्धती संयुक्त पणे अवलंबता येतील. उघड्यावर कचरा टाकण्याच्या जोखीम समजून घेऊन समाजास व पर्यावरणास हितकारक असलेले धोरण ठरवून, ते प्रत्येक शहरात राबविणे आवश्यक आहे.