प्रा. अमर्त्य मुखोपाध्याय यांना त्यांच्या कार्यासाठी टाटा ट्रान्सफॉर्मॅशन पुरस्काराने २०२४ डिसेंबर मध्ये गौरवण्यात आले.

करंडक वनस्पतींच्या (डायटम ) दोन नवीन प्रजाती सिक्किममध्ये आढळल्या

पुणे
6 ऑगस्ट 2019
करंडक वनस्पतींच्या (डायटम ) दोन नवीन प्रजाती सिक्किममध्ये  आढळल्या

बिघडलेल्या हवामानामुळे आणि कामात फारच व्यस्त राहिल्यामुळे, सिक्कीमचा दौरा योजल्याप्रमाणे झालाच नाही.  बहुतांश लोकांचा हिरमोड होतो, पण काहींना मात्र काहीतरी खास गवसते! असेच काहीसे बहुमोल, गेल्या वर्षी सिक्कीमला गेलेल्या डॉक्टर बालसुब्रमण्यम कार्तिक आणि त्यांच्यासोबत असलेल्या संशोधकांच्या गटाला सापडले. या प्रवासाची सुरुवात झाली सहकारी शास्त्रज्ञांना भेटण्याच्या उद्देशाने, पण सांगता मात्र झाली करंडक वनस्पतींच्या (डायटम) दोन नवीन प्रजाती शोधण्याने!

आघारकर संशोधन संस्थेत संशोधक म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर कार्तिक म्हणाले "आम्ही परत येत असताना रस्त्याच्या कडेला आम्हाला शेवाळ्याने आच्छदित एक खडक दिसला. कुतूहलापोटी, त्यातील काही शेवाळे आम्ही  खरवडले आणि आमच्या प्रयोगशाळेत आणले. या नमुन्यांचे सूक्ष्मदर्शकाखाली परिक्षण केल्यावर चक्क डायटमच्या दोन नवीन प्रजाती दिसल्या!” सिक्कीममध्ये प्रथमच निदर्शनास आलेल्या या प्रजातींचे त्यांनी स्टाउरोनिस सिक्कीमेन्सिस आणि स्टाउरोनिस लेपची असे नामकरण केले. या अभ्यासावरील निष्कर्ष बॉटनी लेटर्स  या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले असून या अभ्यासाला बायोटेक्नॉलॉजी विभागाचे अर्थसहाय्य लाभले आहे. संशोधकांच्या चमूमध्ये अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठातील अभ्यासकांचाही समावेश होता.

डायटम हे एकपेशीय, अतिसूक्ष्म प्रकारचे शैवाल असून सिलिकाने बनलेल्या पेशी भित्तिका हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. या शैवाल वनस्पतींचे विविध प्रकार आणि आकार आढळतात. या वनस्पती मुख्यतः ओलसर भागात वाढतात. सामान्यत: या वनस्पती नद्या, पाणथळ प्रदेश, समुद्र आणि मातीमध्ये आढळतात आणि अनेक जीवांसाठी अन्नाचा स्रोत असतात. या पर्यावरणाचे संकेतक म्हणून देखील काम करतात; या ज्या पाण्यात वाढतात त्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल संकेत देऊ शकतात.

“डायटम हे जागतिक ऑक्सिजन उत्पादनाच्या सुमारे २५% ऑक्सिजन बनवतात म्हणजे जणू काही आपल्या प्रत्येक चौथ्या श्वासातील ऑक्सिजन डायटम मार्फतच येतो” असे आघारकर संशोधन संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी च्या स्नातक असलेल्या नेहा वडमारे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “परंतु असे असूनही डायाटम च्या जैवविविधतेबद्दल अद्यापही पुरेशी माहिती उपलब्द्ध नाही. या शैवाल वनस्पतींच्या दहा लाखांपेक्षा जास्त प्रजाती असल्याचा अंदाज आहे पण आपल्याला माहित असलेल्या फक्त २० ते ३० हजार प्रजाती आहेत.

स्टाउरोनिस  नावाच्या वंशामधील (जीनस) डायटमच्या या नवीन प्रजाती निम-जलीय ठिकाणी, शेवाळे असते तिथे व झाडाच्या फांद्यांवर आढळतात. जगभरात या वंशातील सुमारे १२०० प्रजाती आहेत, त्यातील जवळपास १२० प्रजाती भारतीय उपखंडात आढळतात. स्टाउरोनिस सिक्किमेन्सिस  हे नाव सिक्किम राज्याच्या नावावरून दिले आहे, जिथे ही प्रजाती प्रथम सापडली. डायटमच्या दुसऱ्या प्रजातीचे नाव स्टाउरोनिस लेपची, हे ‘लेपचा’  या सिक्कीममधील सर्वात जुन्या वांशावरून देण्यात आले.

डायटमच्या पेशी या साबणाच्या पेटी प्रमाणे असतात. त्यांची वरची मोठी झडप ही पेटीच्या झाकणाप्रमाणे आणि खालची छोटी झडप ही पेटीच्या तळासाराखी असते. डायटमच्या स्टाउरोनिस  वंशाच्या प्रजातींमध्ये झडपेच्या मध्यवर्ती भागात स्टाउरोस नावाची क्रूसासारखी एक विशिष्ट संरचना असते, ही रचना सिलिकाच्या जाड थरामुळे उठून दिसते. हे स्टाउरोस, स्टाउरोनिस  सिक्किमेन्सिस  मध्ये "एच" अक्षरासारखे दिसतात, तर स्टाउरोनिस लेपची  मध्ये ते रिबिनीच्या बो प्रमाणे दिसतात. या दोन्ही प्रजातींच्या झडपा या लांब व मध्यभागी फुगीर आणि दोन्ही टोकांना निमुळत्या असतात.  स्टाउरोनिस सिक्कीमेन्सिस  च्या झडपा या मध्यभागी थोडया चपटया असतात.

या दोन नवीन प्रजातींचा शोध हा ईशान्येकडील राज्यांमधे सापडलेल्या प्रजातींचा पहिला शोध नसून, गेल्या वर्षीही  डॉ. कार्तिक यांच्या पथकाने अरुणाचल प्रदेशातील तीन नवीन प्रजाती शोधल्या आहेत. त्यांचे प्रयत्न हे बायोटेक्नॉलॉजी विभागाने प्रायोजित केलेल्या 'ईशान्य भारतातील जैवसंसाधन व शाश्वत उपजीविका या मोठ्या प्रकल्पाचा एक भाग असून, या उपक्रमाचे उद्दीष्ट या प्रदेशातील समृद्ध जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करणे आहे. अलिकडेच या प्रदेशात बेडूक, सरडे आणि साप यांच्या  नवीन प्रजाती सापडल्या आहेत.

“प्रत्येक प्रजातीचे दस्तऐवजीकरण करणे महत्वाचे आहे, परंतु सध्याचे प्रयत्न संरक्षित भागात आणि काही विशिष्ट सस्तन प्राणी किंवा आर्किड्ससारख्या विशिष्ट जीवांच्या संरक्षण व दस्तऐवजीकरणाचवर केंद्रित आहेत,” असे बायोटेक्नोलोजी विभागाच्या या उपक्रमाचे समन्वयक, अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड एन्वायर्नमेंट, बेंगळुरू येथील डॉक्टर आर. गणेशन म्हणाले. मात्र सूक्ष्मजंतूंसह इतर, सहसा दुर्लक्षित जीवांमधील विविधता शोधण्यावरही भर दिला पाहिजे, कारण त्यांपैकी बऱ्याच जीवांचे औद्योगिक उपयोग आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते पुढे  म्हणाले, “ह्या उपक्रमाद्वारे भविष्यात, ईशान्येकडील राज्यांत जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करणारे कार्यकर्ते तयार होतील”.

डॉ. कार्तिक आणि त्यांच्या सहसंशोधकांना अशी आशा आहे की ईशान्येकडील राज्यांतील संशोधनामुळे  डायटम आणि इतर जीवांच्या अनेक नवीन प्रजाती शोधणे शक्य होईल. “आम्ही मिझोरम आणि मेघालय येथे असताना, तेथे  डायटमच्या अनेक नवीन प्रजाती, किंवा कदाचित नवीन वंश सुद्धा,  आमच्या बघण्यात आले आहेत आणि सध्या  आम्ही त्यांचे वर्णन करण्याच्या प्रक्रियेत आहोत", असे डॉ कार्तिक यांनी सांगितले.

Marathi