भारतीय वैज्ञानिक समुदायाला अभिमान वाटेल असा मोठा बौद्धिक वारसा मागे ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या कणभौतिकशास्रज्ञ

मानव-वन्यजीव परस्परसंवादाचा अभ्यास: विसंवादाकडून सुसंवादाकडे जाण्याची गरज

मुंबई
26 ऑक्टोबर 2021
मानव-वन्यजीव परस्परसंवादाचा अभ्यास: विसंवादाकडून सुसंवादाकडे जाण्याची गरज

छायाचित्र: रुपेशकुमार व विकिमिडिया कॉमन्स

गुजरात राज्यातून दरवर्षी दलदलीत राहणाऱ्या मगरींनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या येतात. त्यात बरीच जीवितहानी होत असल्याचा दावाही केला जातो. परंतु, या जिल्ह्यांनी, मगरींच्या हल्ल्यांमुळे नव्हे तर तेथील स्थानिक लोक आणि मगरी यांच्यातील सकारात्मक संबंधांमुळे माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनुष्याच्या जीवाला धोका संभवत असला तरीही स्थानिक समुदाय दलदलीतील मगरींना परोपरीने संरक्षण देण्यात सक्रिय असतात इतकेच नाही तर मगरींच्या अधिवासासाठी गावोगावी तलावांमध्ये लहान लहान बेटे देखील तयार करतात. याच संदर्भात मगरी आणि मानवाच्या सहअस्तित्वासंबंधी अधिक माहिती मिळवण्यास गुजरातमधील स्वयंसेवी नेचर कॉन्झर्व्हन्सी येथील संशोधक अनिरुद्धकुमार वासवा आणि ब्रिटनमधील बर्कबेक युनिव्हर्सिटी, लंडन येथील, सायमन पुली यांनी स्थानिकांची भेट घेतली. अशा प्रकारे सहअस्तित्वाचा अभ्यास करणे सोपे काम नाही हे सुरवातीलाच लक्षात आल्यानंतर या विषयातील आव्हानांचा विचार करून त्यांनी मानव-वन्यजीव संबंधांविषयीच्या मतमतांतराच्या तसेच त्याचा अभ्यास करण्यासाठीच्या निरनिराळ्या पर्यायांचा उहापोह कॉन्झरवेशन बायोलॉजी (Conservation Biology) या नियतकालिकात एका निबंधाच्या माध्यमातून केला आहे.

गुजरातमधील खेडा, आणंद आणि वडोदरा या जिल्ह्यांत फिरून संशोधकांनी मगरींच्या हल्ल्याला बळी पडलेल्या किंवा  मानव-मगर संघर्षाचा भाग असलेल्या माणसांच्या मुलाखती घेतल्या. या संवादादरम्यान स्थानिक लोक हल्ल्यांबद्दलचे प्रश्न टाळत किंवा उडवाउडवीची उत्तरे देत असत. याशिवाय, लोकांशी संवाद साधून व प्रश्नोत्तरातून हवी असलेली माहिती मिळवणे हेदेखील संशोधकांसाठी अनेकदा आव्हानात्मक ठरत असे.

“मानव-वन्यजीव सहअस्तित्वाच्या अभ्यासाला शैक्षणिकदृष्ट्या कमी महत्व दिले जाते. आमचे उद्दीष्ट सहअस्तित्वाचा अभ्यास करण्याची गरज आणि याविषयातील आव्हानांवर व्यापक संवाद सुरू करणे हे होते." असे  या अभ्यासामध्ये भाग घेणार्‍या डॉ. सलोनी भाटिया सांगतात.

त्या भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी बॉम्बे) मधील पोस्टडॉक्टरल फेलो आहेत. वास्तविक, मानव-वन्यजीव संबंधांवरील संशोधन संघर्षाभिमुख आहे असे मागील काही वर्षातील अभ्यासानुसार दिसून येते. २०१९ मध्ये झालेल्या अभ्यासात असे आढळले की मानव-वन्यजीव संबंधांवरील प्रकाशित साहित्यापैकी जवळजवळ ७१% साहित्यामध्ये संघर्ष केंद्रस्थानी मानला गेला आहे, तर केवळ २% साहित्यामध्ये स्पष्टपणे सहअस्तित्वाविषयी चर्चा केली गेली आहे.

लेखक पुढे असे स्पष्ट करतात की बहुतांश संवर्धनविषयक संशोधनाचा हेतू फक्त आकडेवारी मिळवण्याचा असतो उदा. संघर्षामुळे किती मृत्यू झाले, पिकांचे किती नुकसान झाले किंवा इतर आर्थिक नुकसान किती झाले इत्यादी. अशा प्रकारच्या अभ्यासामुळे मानव-वन्यजीव संघर्षामुळे होणाऱ्या परिणामांबद्दलची आपली जाणीव वाढेल, मात्र अशा पद्धतीने हा प्रश्न हाताळल्यास मानव आणि प्राणी या दोघांसाठी उद्भवणारी क्लेशकारक स्थिती आणि त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध सामाजिक-सांस्कृतिक स्तरावर केले जाणारे प्रयत्न यासारख्या बारकाव्यांकडे दुर्लक्ष होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्वांत, संघर्षाचे मूळ कारण, विविध संप्रदाय व संस्कृतीच्या लोकांचा वन्यजीवांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यांचे निसर्गाशी असलेले खास नाते याकडे देखील कानाडोळा केला जातो.

मानव-वन्यजीव संघर्षाच्या मानवावर होणाऱ्या प्रभावांचा अभ्यास करताना संशोधकांना असेही आढळून आले की, भारतासह जगाच्या इतर भागात, पाश्चिमात्य मूल्य प्रणाली चुकीच्या पद्धतीने लागू केली जात आहे. उदाहरणार्थ, मानसशास्त्र आणि वर्तनाशी संबंधित पाश्चात्य कल्पना व विचार मानव-वन्यजीव परस्परसंवादाच्या संशोधनात सर्रास वापरल्या जातात. परंतु, मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्षामुळे उद्भवणाऱ्या त्रासदायक परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकांना सहाय्यक ठरणाऱ्या स्थानिक पातळीवरील धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा व चालीरीतींकडे  मात्र दुर्लक्ष केले जाते.

वन्यजीवांना ही आघातांना सामोरे जावे लागते याचा पुरावा म्हणून संशोधक, मानव-वन्यजीव संघर्षामुळे उद्भवलेल्या आशियाई हत्तींमधील मानसिक तणावाचे उदाहरण देतात. तरीही, त्यांना असे आढळले आहे की संघर्षाचा प्राण्यांवर होणारा दुष्प्रभाव आणि त्याचा सामना करण्याची त्यांची पद्धत यावर खूप कमी संशोधन केले गेले आहे. केवळ मानवाधीष्ठीत दृष्टिकोनातून या प्रश्नाचा विचार केल्यास मानव-वन्यजीव सहअस्तित्वाविषयीची व्यापक समज येणे शक्य नाही. ही जाणीव केवळ संघर्षालाच नव्हे तर सहजीवनाच्या तटस्थ आणि सकारात्मक पैलूंना देखील लागू होते. लेखकांच्या मते, सहअस्तित्वाच्या संकल्पनेत “असे मानले पाहिजे की परिस्थितीशी जुळवून घेणारे केवळ मनुष्यच नसतात तर वन्य प्राण्यांमध्येदेखील मानवी अस्तित्वाशी जुळवून घेण्याची क्षमता असते.”

सद्य संशोधन पद्धतींविषयीची आणखी एक चिंता अशीही आहे की मानव-वन्यजीव संघर्षावर काम करणारे बरेच अभ्यासप्रकल्प प्रत्यक्ष जंगलात जाऊन पार पडले जातात, जेथे मानवी अस्तित्व अत्यंत कमी किंवा शून्य असते. लेखक पुढे असे स्पष्ट करतात की, वरील पद्धतीने आखलेले अभ्यासप्रकल्प निष्फळ ठरतात कारण, बरेचदा वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या बाहेर मानवी वस्ती असलेल्या भागात राहतात उदाहरणार्थ, ग्रामीण गुजरातच्या दलदलीच्या प्रदेशातील प्राणीजीवन. मानव-वन्यजीव संबंधाला अनेकदा द्वंद्व समजले जाते आणि संघर्षामुळे ते एकमेकापासून विभक्त झालेत असे चुकीचे मत मांडले जाते. हा संघर्ष खरोखरच समजून घ्यायचा असेल तर मानवी वावर असेलेले प्रदेश उदाहरणार्थ, कृषी क्षेत्रे किंवा अधिवास अतिक्रमण आणि जंगलतोड होत असलेली ठिकाणे तपासणे महत्वाचे आहे. लेखक हे कळकळीने सांगतात की आपल्या समजुतीत अमुलाग्र बदल होण्याची गरज आहे : संघर्ष हा सहअस्तित्वाचा स्वाभाविक भाग आहे तसेच, या सहअस्तित्वामध्ये मानव आणि वन्यजीव या दोघांच्या ही सामायिक अनुभवाचा वाटा असतो.

मानव-वन्यजीव सहअस्तित्वावरील संशोधनातील आव्हाने समजावून सांगण्याचा प्रयत्नही संशोधक करतात. सहअस्तित्वाचा अर्थ आणि ते कसे साध्य करता येईल हे समजून घेण्यासाठी मानव आणि प्राणी यांच्या वर्तनातील जटिल पैलूंचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील अनुभवांचे लेखन व विश्लेषण करण्यासाठी, विविध संप्रदाय आणि संस्कृतींच्या लोकांच्या वन्य प्राण्यांशी झालेल्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या चकमकी व त्याचे पीडादायक परिणाम आणि त्यायोगे झालेले पशुधन, अन्न किंवा पिकांचे प्रचंड विनाशकारी नुकसान या सर्वाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी बरेच प्रयत्न, वेळ आणि संसाधने लागतील. संशोधकांना विशिष्ठ जातीजमातीच्या लोकांचा अभ्यासगट ठरवून त्यांतर्गत विशिष्ट जनसमुदायासमवेत अनेक महिने किंवा काही वर्षे घालवून त्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि त्यांचे निसर्गाशी असलेले नाते समजून घ्यावे लागेल. यामुळे मानव-वन्यजीव परस्परसंवादाचे केवळ संख्यात्मक विश्लेषण करणाऱ्या अभ्यासाला फाटा देऊन त्याऐवजी मानव-वन्यजीवांच्या समुदायांच्या आंतरशास्त्रीय अभ्यासाकडे लक्ष वळविता येईल.

तथापि, अनेक नैतिक बाबी या प्रकारचे संशोधन मर्यादित होण्यास कारणीभूत ठरतात. काहीवेळा मानव-वन्यजीव संघर्षासंदर्भातील अनेक क्लेशदायक घटनांविषयी चर्चा करणे आणि लेखन करणे अप्रिय वाटू शकते. काही प्रकरणांमध्ये, या चर्चा वन्यजीवांची व्यापारासाठी शिकार करण्यासारख्या बेकायदेशीर कृत्यांबाबत असू शकतात, परंतु संशोधकांना, नैतिक मार्गदर्शक नियामक तत्त्वांचे पालन करणे अपरिहार्य असल्यामुळे ही माहिती सामान्य जनतेसमोर उघड करणे शक्य नसते.

प्रस्तुत शोधनिबंधात, संशोधक म्हणतात की हवामान बदल, उदयोन्मुख संसर्गजन्य रोग आणि पर्यावरणीय पुनर्संचयन यासारख्या मोठ्या मुद्द्यांचा संदर्भ ठेवून संवर्धन आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्व या विषयावरील अभ्यास केला गेला पाहिजे. हे घटक समुदायांच्या सामाजिक इतिहासाशी आणि मनुष्यांद्वारे होणाऱ्या जमीन आणि इतर संसाधनांच्या वापराशी कसे निगडीत असतात याचा अभ्यास देखील केला पाहिजे. पुढे ते कबूल करतात की, मुक्त आणि सर्वसमावेशक संशोधन आव्हानात्मक असू शकते. या क्षेत्रातील संशोधकांना ते असा सल्ला देतात की सर्वच बाबींचा खोलवर अभ्यास करण्याऐवजी असा व्यापक दृष्टीकोन ठेवावा ज्यात सहअस्तित्वात भूमिका बजावणारे विविध घटक ओळखून, त्यातील प्राणी आणि मनुष्यांनी अनुभवलेल्या वास्तविक स्थिती आणि त्यांच्या चिंता जाणून घ्याव्यात आणि शेवटी काही विशिष्ट बाबींवर लक्ष केंद्रित करावे जेथे अधिक सखोल संशोधन आवश्यक आहे.

संशोधक सहअस्तित्वास एक स्वयंपूर्ण आणि गतिशील अवस्था म्हणतात. जेथे मानव आणि वन्यजीव निसर्गातील समान भागीदार असतात आणि प्रतिकूल मानव-वन्यजीव संवाद प्रभावी आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य व्यवस्थापनाद्वारे कमी केले जातात. संघर्ष हा मानव-वन्यजीव समुदायाचा एक अविभाज्य भाग आहे आणि असे समुदाय कसे कार्य करतात आणि संघर्षाचा सामना कसा करतात हे समजून घेण्यासाठी त्या त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेणाऱ्या संशोधनाची आवश्यकता आहे हे कबूल करणे महत्वाचे आहे. तूर्तास, विचारातील हा बदल प्रत्यक्षात येण्यासाठी बराच प्रवास बाकी आहे. “सह-अस्तित्वाचा अभ्यास करण्याचे महत्व वैयक्तिक संशोधन करणाऱ्या संशोधकांना पटवून देण्याची गरज आहे. सहअस्तित्व म्हणजे काय याचा विचार करण्यास त्यांना उत्तेजन देऊन आवश्यक कौशल्ये शिकण्यासाठी तसेच या विषयात संशोधन करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याची गरज आहे. आम्हाला सामाजिक संस्थांनाही हे पटवून देण्याची गरज आहे की हा संशोधनाचा वैध विषय आहे ज्याआधारे अंतिमतः सुयोग्य धोरणे प्रस्तावित होऊ शकतील," असे डॉ भाटिया यांनी सांगितले.