संशोधकांनी द्विमितीय पदार्थांचा वापर करून ट्रान्झिस्टर तयार केला आणि स्वायत्त यंत्रमानवांसाठी त्यावर आधारित अतिनिम्न ऊर्जाचालित कृत्रिम चेतापेशी सर्किट निर्माण केले.

ट्युमरपर्यन्त औषध पोहचवण्यासाठी नॅनोबबल

Read time: 1 min
मुंबई
19 फेब्रुवारी 2019
छायाचित्र : आरेदथ सिद्धार्थ, नंदिनी भोसले, हसन कुमार गुंडू, कम्युनिकेशन डिझाईन , आयडीसी, आयआयटी मुंबई

संशोधकांनी असे वाहक विकसित केले आहे जे अल्ट्रासाऊंडच्या मदतीने अधिक प्रभावीपणे औषध पोहचवू शकते.

कर्करोगाचे पहिले वैद्यकीय वर्णन १६०० क्रिस्तपूर्वमध्ये इजिप्ट देशात लिहिले गेले. आजही जगभरातील वैज्ञानिक या प्राणघातक आजारासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धत शोधत आहे. उपचारात एक मोठे आव्हान म्हणजे किमोथेरपीमध्ये वापरली जाणाररी औषधे फक्त कर्करोगाच्या पेशींवरच हल्ला करत नाहीत तर औषधांचा स्वस्थ पेशींवर पण प्रभाव पडतो आणि अनेक औषधे ट्युमरच्या पेशीच्या आत प्रवेश करू शकत नाहीत. एका अभ्यासात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी संयुक्त उपचार पद्धत प्रस्तावित केली आहे ज्यात अल्ट्रासाऊंड छायाचित्राचे मार्गदर्शन घेऊन घनरूपातील ट्युमर पर्यन्त एक नैसर्गिक लिपिडच्या मदतीने औषध पोहचवून त्यातील पेशी नष्ट करता येतील.

कर्करोग एक क्लिष्ट आजार आहे जो प्रत्येक रुग्णात विविध प्रकारचा असतो. अनेकदा एकच उपचार पद्धती सर्व रुग्णांवर लागू पडत नाही. एखाद्या आजारावर उपचार करण्यासाठी एकमेकांना पूरक अनेक उपचार पद्धती एकत्र वापरणे म्हणजे संयुक्त पद्धत. असे केल्याने मोठ्या प्रमाणावर आजारावर मात करण्याची शक्यता वाढते. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागात काम करणार्‍या प्रा. रिंटी बॅनर्जी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एका अभ्यासात अशीच एक संयुक्त उपचार पद्धत प्रस्तावित केली आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या उपचारामध्ये एक छोटा आणि एक मोठा असे दोन चेंडू एकेमेकांना चिकटलेले असतात. छोट्या चेंडूत औषध असते आणि दुप्पट आकाराचा मोठा चेंडू म्हणजे एक वायूचा बुडबुडा असतो. मोठ्या चेंडूचा आकार सुमारे ५०० नॅनोमिटर असतो आणि त्याला 'नॅनोबबल' म्हणतात, आणि औषध असणार्‍या चेंडूला 'नॅनोकॅप्सुल' म्हणतात. दोन्ही घटक एकत्र काम करून कर्करोगावर उपचार करतात.

नॅनोबबलचे दोन उद्देश असतात. पहिले म्हणजे ते अल्ट्रासाऊंड उपकरणाद्वारे दिसू शकते. म्हणून ती छायाचित्रे वापरुन जेव्हा बबल रक्तप्रवाहातून जाते तेव्हा त्याची स्थिती दिसू शकते. दुसरा उद्देश आहे कॅप्सुलमधील औषध प्रभावीपणे पोहचवणे. ट्युमर पेशींजवळ अल्ट्रासाऊंड लावले की हे नॅनोबबल विस्तारित आणि आकुंचित होतात आणि शेवटी फुटतात. यामुळे ट्युमरच्या ऊती सैल होतात. आता कॅप्सुल सहजपणे ट्युमरच्या आत प्रवेश करून खोलवर औषध पोहचवू शकते. एका दृष्टीने नॅनोकॅप्सुलचे काम अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी नॅनोबबल स्वतःचा त्याग करते.

कॅप्सुल दोन प्रकारे कर्करोगावर नियंत्रण करायचा प्रयत्न करते. कॅप्सुलचे आवरण लिपिड नावाच्या पेशीपटलात आढळणार्‍या नैसर्गिक जैवरेणूपासून बनवले असते. कॅप्सुलला लिपोसोम म्हणतात आणि ते बायोकंपॅटिबल असतात, म्हणजेच शरीरासाठी विषारी नसतात. दोन पेशींच्या मध्ये असणार्‍या जागेतून जाता येण्यासाठी हे कॅप्सुल अतिसूक्ष्म (सुमारे २०० नॅनोमिटर) असावे लागतात. कर्करोगावर उपचार करणारे औषध कॅप्सुलच्या आत असते. प्रा. बॅनर्जी यांच्या सहकार्‍यांनी अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या उपचारासाठी उपयोगी 'पॅक्लिटॅक्सेल' नावाचे औषध वापरले. त्या व्यतिरिक्त, पेशी नष्ट करणारे फॉस्फेटिडिलसरी नावाचे ननैसर्गिक लिपिड पण त्यांनी वापरले.

वरील सर्व सिद्धान्त आणि पद्धती स्वतंत्रपणे अस्तित्वात असल्या तरीही त्या एकत्र वापरुन अनेक औषध पद्धतींसाठी एकच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात प्रा. बॅनर्जी आणि त्यांच्या सहकार्‍यांचे योगदान आहे.

प्रा. बॅनर्जी संशोधनाचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाल्या, "आमच्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच प्रो-एपॉपटिक जैवरेणू, औषध आणि नॅनोबबल एकत्रित असणारी ही स्मार्ट संयुक्त उपचार पद्धत वापरली गेली आहे." हे संशोधन नुकतेच 'सायंटिफीक रिपोर्ट्स' या मासिकात प्रकाशित झाले आहे.

नवीन संयुक्त उपचार पद्धत किती कार्यक्षमपणे ट्युमर वर प्रभावी ठरते याची चाचणी संशोधकांनी प्रयोगशाळेत वाढवलेल्या पेशींवर (इन-विट्रो) आणि प्राण्यांमध्ये (इन-वायवो) पण केली. परिणामात आढळून आले की एक किंवा अधिक घटक वगळलेल्या इतर कोणत्याही उप-संयुक्त उपचार पद्धतीच्या तुलनेत अल्ट्रासाऊंड वापरुन दिलेली संयुक्त उपचार पद्धत सगळ्यात प्रभावी ठरली. कर्करोगाच्या पेशींनी पटकन औषध शोषून घेतले ज्यामुळे  ट्युमरमध्ये औषधाची संहत तीव्रता वाढली आणि परिणामतः प्रभावीपणे कर्करोगाच्या पेशी नष्ट झाल्या किंवा ट्युमरचा आकार कमी झाला. इतर उपचार पद्धतींच्या तुलेनत संयुक्त उपचार पद्धत दिल्यानंतर १००% प्राणी जिवंत राहिले. वर्तमानात उपलब्ध असलेल्या अल्ट्रासाऊंड चित्रांच्या (सोनोव्यु) तुलनेत या पद्धतीत ट्युमरच्या ऊतींची अल्ट्रासाऊंड छायाचित्रे अधिक स्पष्ट होती.

ही उपचार पद्धती कर्करोगावर उपचार करण्यासाठी कशी वापरता येईल हे समजावून सांगताना प्रा. बॅनर्जी म्हणाल्या, "या उपचार पद्धतीत छायाचित्रांचे मार्गदर्शन घेऊन अल्ट्रासाऊंडचा वापर करून अचूकपणे ट्युमर पेशींपर्यंत औषध पोहचवता येते, आणि त्याच बरोबर आजाराची परिस्थिती पण तात्काळ तपासून बघता येते."

हा नवीन शोध कर्करोगाच्या उपचारासाठी वापरता येईल व यामुळे अल्ट्रासाऊंड छायाचित्रांच्या मदतीने कर्करोगासाठी असलेल्या इतर उपचार पद्धतींना चालना मिळेल. नॅनोबबल वापरल्याने कार्यक्षमता वाढत असल्यामुळे आणि अधिक चांगले चित्र बघता येत असल्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी विशिष्ट उपचाराचे नियोजन करता येईल.