तारा ॲपद्वारे देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये घेतल्या गेलेल्या वाचनाच्या चाचण्यांमध्ये ७ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग.

मृद्‌गंध

Read time: 1 min 7 August, 2018 - 16:05

पहिला पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा सुगंध, आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जाणारा, अनेक गीतकारांच्या, लेखकांच्या भावनांना वाट मोकळी करून देणारा तो गंध, तो पहिला मृदगंध!

सुमारे १९६० च्या दरम्यान ऑस्ट्रेलियातील इसाबेल जॉय बेअर आणि रिचर्ड ग्रेनफेल थॉमस हे दोन खनिजतज्ज्ञ  मातीच्या सुगंधासाठी कारणीभूत असणारे संयुग वेगळे करू शकले. ग्रीक पौराणिक कथांमध्ये, देवांच्या शरीरात वाहणाऱ्या  द्रवावरून त्यांनी या सुगंधाला "पेट्रिचोर" असे नाव दिले.

आश्चर्याची गोष्ट आहे की या घटनेपूर्वीच, भारतातील उत्तर प्रदेश राज्यात, कनौज या खेड्यामध्ये लोकांनी हा मृदगंध बाटलीमध्ये साठवण्यात यश मिळवले होते आणि त्यांनी या सुगंधाला "मिट्टी का अत्तर " असे संबोधले होते. यासाठी ते लोक भाजून तयार केलेली मातीची एक तबकडी एप्रिल आणि मे या कडक उन्हाळाच्या महिन्यांत उन्हात तापवत आणि नंतर उर्ध् पतन (डिस्टिलेशन) क्रियेने अत्तर काढून ते साठवून ठेवत.

१९६४ मध्ये इसाबेल आणि ग्रेनफेल यांचा नेचर जर्नलमध्ये जो शोधनिबंध प्रसिद्ध झाला त्यामध्ये कनौज मधील लोकांचा अत्तर निर्मिती मधील योगदानाचा संदर्भ मिळतो . या दोघांनी "पेट्रिचोर" हे अनेक रसायनांचे मिश्रण असून ते वेगवेगळ्या ठिकाणांनुसार व विविध ऋतूंनुसार बदलते असे मत मांडले. परंतु वेगवेगळ्या ठिकाणी मातीचे भिन्न प्रकार असूनही पहिला पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा सुगंध सारखाच का असतो हे स्पष्ट झाले नव्हते.

जगभरात कुठल्याही मातीमध्ये आढळणारे ऍक्टिनोमायसेट्स हे विशिष्ट प्रकारचे जिवाणू या सुगंधासाठी कारणीभूत असतात आणि हेच जिवाणू क्षयरोगाविरुद्ध लागणारे प्रतिजैविक स्ट्रेप्टोमायसिन देखील तयार करतात.

गरम आणि कोरड्या वातावरणात हे जिवाणू निष्क्रिय होतात आणि त्याचे तयार झालेले बीजाणू जिओस्मिन (भूसुम) नावाचे संयुग स्रवतात. बीटाला येणारा मातीचा गंध आणि कॅटफिशला असणारी चिवट चव ही या जिओस्मिनमुळे आलेली असते. माणसाचे नाक जिओस्मिन अगदी सूक्ष्म प्रमाणात देखील ओळखू शकते.  पाच भाग प्रती ट्रिलियन - म्हणजेच चार ऑलिम्पिक मैदानाच्या आकाराच्या जलतरण तलावात १ थेंब जिओस्मिन,  इतक्या कमी प्रमाणात देखील आपल्याला त्याचा वास येऊ शकतो.

अलीकडच्या काळात, मातीचा गंध हवेमध्ये कसा मिसळतो याचे उत्तर मॅसाच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील संशोधकांना  सापडले आहे. पावसाचे थेंब मातीवर पडतात तेव्हा काही प्रमाणात हवा मातीत अडकते. या हवेचे बुडबुडे होऊन अतिशय वेगाने वर येतात आणि फुटतात, तेव्हा अतिशय सूक्ष्म आकाराचे कण (एअरोसोल) हवेत मिसळतात आणि मातीचा सुगंध पसरवतात.

इसाबेल आणि रिचर्ड्स या शोधानंतर प्रसिद्ध झाले आणि या कामासाठी त्यांना आजपर्यंत ओळखले जाते. परंतु या दोघांपूर्वी कनौज मध्ये हा सुगंध शोधणाऱ्या संशोधकांना मात्र आपण  विसरलो आहोत. कनौजचा सुगंधी द्रव्ये बनवण्याचा उद्योग आज दिवसेंदिवस मागे पडत आहे आणि ५० मिली "मिट्टी का अत्तर" साठी ₹१००० एवढी जास्त रक्कम मोजावी लागत आहे.