जलाशयांच्या पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानाची नोंद व निरीक्षण करणारे आयआयटी मुंबईचे नवे वेब ॲप्लिकेशन - ‘इम्पार्ट’ - हवामानातील बदलांचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त.

संशोधकांनी क्षयरोगावर उपचार करणारे नवीन औषध विकसित केले आहे

Read time: 1 min
गुजरात
6 मे 2019
संशोधकांनी क्षयरोगावर उपचार करणारे नवीन औषध विकसित केले आहे

मायकोबॅक्टीरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा क्षयरोग जगात मृत्युचे एक प्रमुख कारण आहे. २०१७ साली जगभरात सुमारे १० दशलक्ष लोकांना क्षयरोग झाला आणि त्यापैकी १.६ दशलक्ष रुग्ण दगावले. या जीवाणूच्या काही जातिंवर विद्यमान औषधे निष्प्रभ ठरल्यामुळे भारतासारख्या देशात परिस्थिती अधिक गंभीर आहे. वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, गुजरात येथील संशोधकांनी अलीकडे केलेल्या एका अभ्यासात क्षयरोगावर उपचार करण्यासाठी औषध विकसित केले आहे आणि क्षयरोगासाठी जबाबदार जीवाणू आणि इतर प्रकारच्या जीवणूंवर ते औषध किती प्रभावी आहे याचा पण अभ्यास केला आहे.

जगभरातील संशोधक संगणकाच्या सहाय्याने नैसर्गिक संयुगे, रासायनिक एजेंट किंवा विविध औषधे एकत्र करून क्षयरोगावर मात करणारी नवीन औषधे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 'करंट कम्प्युटर-एडेड ड्रग डिझाइन' या मासिकात प्रकाशित झालेल्या सदर अभ्यासात संशोधकांनी 'अझोल' गटातील रासायनिक एजेंटचे संश्लेषण केले. हे एजेंट सूक्ष्मजीवाणूंमधील, प्रामुख्याने बुरशीमधील, मेदाचे संश्लेषण प्रतिबंधित करून त्यांना नष्ट करतात.

संश्लेषण केल्यानंतर निर्माण झालेली ही नवीन संयुगे क्षयरोग जीवाणू, चार इतर प्रकारचे जीवाणू आणि बुरशीच्या तीन जाती नष्ट करण्यात किती कार्यक्षम आहेत याचा संशोधकांनी अभ्यास केला. त्यांच्या असे लक्षात आले की या रसायनांची अगदी किमान संहत तीव्रता असली तरीही सूक्ष्मजीवाणूंची वाढ थांबते. दोन किंवा त्यापेक्षा अधिक रेणूंमधील आंतरक्रिया वर्तवणारी 'मॉलेक्युलर डॉकिंग' नावाची संगणकावर आधारित पद्धत वापरुन संशोधकांनी क्षयरोग जीवाणूंतील प्रथिन आणि रसायने यांच्यामधील आंतरक्रियेचा अभ्यास केला. कोणत्याही रसायनाला औषध म्हणून वापरण्यापूर्वी रसायनाचे शरीरात शोषण, वितरण, चयापचय, उत्सर्जन कसे होते याचा अभ्यास करणे आवश्यक असते. संशोधकांनी हे आवश्यक घटक वरील रसायनांबाबत पण तपासले.

संशोधकांना संश्लेषित संयुगापैकी सहा संयुगात सूक्ष्मजीवाणू नष्ट करण्याची लक्षणीय क्षमता आढळून आली आणि त्यापैकी एक संयुग क्षयरोग जीवाणू नष्ट करण्यात अत्यंत कार्यक्षम असल्याचे दिसले. संशोधकांचा विश्वास आहे की हे संयुग क्षयरोगासाठी औषध म्हणून विकसित करता येईल. ते म्हणतात, "आमच्या निष्कर्षामुळे भविष्यात क्षयरोगावर अधिक प्रभावी औषध निर्माण करण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध होतात."

आज औषध प्रतिरोधक क्षयरोगाविरुद्ध जागतिक लढाई सुरू असताना अशा अभ्यासांमुळे आपण लवकरच या रोगाला कायमचे नष्ट करण्यात यशस्वी होऊ.